DAINIK TARUN BHARAT (MUMBAI)उमलत्या कळ्यांचा अद्भुत सुगंध...
‘उगवती मने’ हा आनंद यादव यांचा कथासंग्रह आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो.
मानवी जीवनात संसारामध्ये ‘मूल असणे’ या घटनेला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. घरात मूल असेल तर संसार बहरतो, फुलतो, नसेल तर सर्व जीवनावर कोमेजलेली कळा येते. एकटं जगण्यापेक्षा आई-बाप, बहीण-भाऊ अशा गोतावळ्यात जगणे किती समृद्धीचे आहे हे ज्याचे त्यानेच अनुभव घेऊन पाहायचे असते.
घराघरातील, आसपासची, निरनिराळ्या वयाची, वेगवेगळ्या परिस्थितीतील मुलं, त्यांच्या भावना, त्यांचे अजाण वर्तन, त्यांचे मुक्त विचार याने आपले प्रौढ मन नेहमीच गोंधळात पडते.
परिस्थितीने गांजलेला, दिवसभर उपाशीपोटी वणवण करणारा बाळक्या अन् त्याच्या आईची त्याच्या पोटाला दोन घास देता यावेत म्हणून चाललेली धडपड आपले मन कासावीस करते.
आबा उठत का नाहीत या प्रश्नाचे वेड्यावाकड्या यशवंताजवळ उत्तर नसते. तर आता याचे पुढे कसे होईल हा प्रश्न आपल्या मनात घोळत राहतो.
वंशाला दिवा हवा म्हणून कर्मठ आजीने केलेले अग्निदिव्य आपल्याला निरुत्तर करते. सटवीने मांडलेल्या डावात शेवटी दत्तू पार चीतपट होतो. मुलाची आई लहानपणी गेल्याने बापलेक दोघांचीही होणारी फरफट आपल्याला व्यथित करते. असे गरिबीने आणि खेडेगावातल्या वातावरणाने निर्माण झालेल्या मुलांच्या भावविश्वाचे दर्शन आपल्याला चकित करते.
शहरी स्पर्श असलेली ‘सार्वचा पुत्र’ ही गोष्ट वडीलकीच्या अभिमानाचे गर्वहरण करणारी आहे. खरंतर मुलंच प्रौढ व्यक्तींना खूप शिकवत असतात. त्यांना नव्या वाटेने विचार करायला भाग पाडतात. बालमनाचे एक स्वतंत्र समृद्ध विश्व असते पण त्याची चाहूल घेण्याएवढा मनाचा मोठेपणा आपल्याजवळ हवा.
बालमनाची विविध रूपे अनोख्या शैलीत इथे सामोरी येतात. सूक्ष्म, सखोल पातळीवरचा जीवन व्यापार अनुभवतात आपले जून, निबर मनही कोवळे होऊन जाते. उमलत्या कळ्यांचा हा अद्भुत सुगंध कितीतरी वेळ मनाशी रेंगाळत राहतो.
-रजनी वैद्य
DAINIK KESARI 26-10-2003कोवळ्या बालमनांच्या कथा...
मराठी साहित्यात डॉ. आनंद यादव हे एक महत्त्वपूर्ण असे नाव आहे. ‘उगवती मने’ हा त्यांचा अलीकडे प्रकाशित झालेला कथासंग्रह आहे. या पूर्वी ‘खळाळ’, ‘डवरणी’, ‘उखडलेली झाडे’, ‘आदिताल’, ‘घरजावई’, ‘माळावरची मैना’ इत्यादी कथासंग्रही त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. १९६० नंतर मराठी साहित्यात जो ग्रामीण साहित्याचा प्रवाह आला, त्यामुळे ग्रामीण कथाकार म्हणून डॉ. आनंद यादव यांचे योगदान खूप मोठे आहे.
‘उगवती मने’ या कथासंग्रहातून ग्रामीण जीवनाचे विविध पैलू दिसून येतात. ग्रामीण माणसांची सुख-दु:ख हा त्यांच्या कथांचा केंद्रबिंदू आहे. जीवनातल्या ताणतणावांना, संघर्षाला सामोऱ्या जाणाऱ्या या कुटुंबातील बालमनाची विविध रूपे तयांनी टिपलेली आहेत. आजूबाजूच्या परिसराचा, घडणाऱ्या घटनांचा, माणसाच्या कृती-उक्तीचा बालमनावर कसा परिणाम होतो, अनेकविध घटनांचे अर्थ ते कसे लावतात. याचे प्रत्ययकारी चित्रण कथांतून येते. फ्रॉईडने माणसाच्या मनाची जाणीव, अर्धजाणीव आणि नेणीव असे तीन स्तर कल्पिलेले आहेत. या नेणिवेच्या स्तरावरचे अबोधमन डॉ. आनंद यादव यांनी उलगडून दाखविलेले आहे.
कुटुंबात मूल असणे हा एक समृद्ध करणारा अनुभव असतो. त्या मुलाच्या जगण्यात पुन: पुन्हा आपणही जगत असतो. ही बालमने प्रौढ मनाला दर क्षणाला वेगळे अनुभव देतात. त्यांचे स्वत:चेही एक आगळेवेगळे बालविश्व असते. या कोवळ्या बालमनाचे दर्शन या संग्रहातील कथांतून होते.
संग्रहातील सगळ्याच कथांमधून ग्रामीण परिसर येतो. ग्रामीण माणसाचे जीवन, त्यांची जीवनशैली, नियतीचा खेळ, नशिबाचा घोळ, दारिद्र्य, उपासमार, अज्ञान, निरक्षरता यांना लपेटून या कथा लिहिलेल्या आहेत, असे असूनही या माणसांच्या जगण्याचा आवेश मात्र अभंग आहे.
‘अन’ या कथेतला बाळक्या वडिलांच्या पश्चात आईने दुसऱ्याशी ठेवलेले संबंध पाहून सैरभर होतो. ‘बाप्पा’ कथेतला छोटा यशवंता तिरडीवर ठेवलेल्या वडिलांच्या अंतिम दर्शन घेताना सहजपणे ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणतो. काळा धागा मधली म्हातारी महादेवी फक्त मरण येत नाही म्हणून जगत असते, पण घरात जन्मलेल्या पणतवाचे मुख पाहताच पुन्हा हर्षभरीत होते. आपले सरलेले आयुष्य पुन्हा एकदा मागे वळून पाहू लागते. ‘चित्रपट’ ही मूल होत नसलेल्या सरू आणि दत्तू या जोडप्याची कथा हृदयद्रावक आहे. ‘पोरकं घर’ मधला गोंदा बायको गेल्यावर लहान मुलाला सांभाळायला कुणीतरी बाईमाणूस हवे आहे म्हणून पुन्हा लग्न करायला निघतो, पण त्याला कळून चुकलेले असते की या पोरक्या मुलाला सावत्र बहीण भाऊ झाल्यावर ते अधिकच पोरकं होणार आहे. ‘कंदुरी’ कथेत घरातल्या शेरडासाठी जीव टाकणारा हेंदू येतो. ‘पाखर’ या कथेत नामा, गुंडा, शिध्या ही गावातल्या जनीवर प्रेम करणारी मुलं तिच्या लग्नात अनेक आठवणींना मनातल्या मनात उजाळा देत अबोलपणे आपले प्रेम व्यक्त करतात. ‘दाट किर्र गवत’ या कथेत छोटा आन्ध मृत्यू पावलेल्या छोट्या मैत्रिणीच्या आठवणीत गुंतून पुन: पुन्हा जगत असतो. ‘उपाशी जा’ या कथेतील ऐन दिवाळीच्या दिवशी भुकेने अर्धमेले झालेल्या भिक्या, शंकऱ्या, रत्नी या लहानग्या जीवांची घालमेल हृदयाला पीळ पडणारी आहे.
या सर्वच कथांतील प्रसंग, पात्र, निसर्ग, परिसर, बोलीभाषा ग्रामीण आहेत. ग्रामीण बोलीभाषेमुळे कथाविषय झालेल्या ग्रामीण जीवनानुभवाला वास्तवाचे भाव आलेले आहेत. सहजता, नेमकेपणा, चित्रमयता ही आनंद यादव यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. अस्सल जीवनानुभव आणि कलात्मक मांडणी यांचा समतोल आनंद यादव यांनी साधलेला आहे.
‘उगवती मने’ या कथासंग्रहातून ग्रामीण बालविश्वाच्या मनोभूमिकेचा घेतलेला वेध परिणामकारक आहे. या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके आहे. फळातून फुटलेला कोंब मानवी जीवनाविषय बरेच काही सांगून जातो. एकूणच हा कथासंग्रह वास्तवाचे भान देणारा आहे. वाचनीय आहे.
-ज्योत्स्ना आफळे
DAINIK LOKSATTA 17-08-2003छोट्यांच्या मोठ्या मनाची चित्रे...
आजूबाजूच्या समाजात वावरत असताना एखादे सर्जनशील मन अनुभवांचं गाठोडं हाती घेत, निसर्ग आणि प्रत्यक्ष जीवन यांची सांगड घालत जाते. निसर्गातले उमलते रूजते कोंब आणि आसपासची निरागस मुले यातील साधर्म्य ते मन शोधत राहते. विविध वयोगटातील भिन्न परिस्थितीतील मुले, त्यांचे वर्तन, त्यांच्या भावना यांचा मागोवा शब्दांकित करायचा मोह टाळता येत नाही. अशाच काही अबोध बालमनांचा वेध डॉ. आनंद यादव यांनी आपल्या ‘उगवती मने’ या कथासंग्रहातून मोकळेपणाने घेतलेला आहे. डॉ. यादव यांचे ग्रामीण भागांशी, तिथल्या समस्यांशी फळत्या-फुलत्या निसर्गाशी आणि तिथल्या जीवनाशी अतूट नाते आहे. त्यांच्या संवदेनशील मनाने या बालमनाची टिपलेली ही रूपे, त्या साऱ्या व्यक्तिरेखा मनाला वेढून राहतात, असेही काही जगणे असते, असेही त्यांचे प्रश्न असतात, याचे भान या साऱ्याच कथा देतात.
‘ऊन’ कथेतला बाळ्या, दारिद्र्याची पासोडीच अंगावर बाळगणारा, अन्नाला मोताद, वडील नसल्याने पोटाची भुकेने आईने कुणीलातरी जवळ केलेले, तो घरी आला की बाळक्याला घराबाहेर घालवले जायचे. भुकेच्या जाणिवेबरोबर गोंधळलेल्या मनाने वावरणारा बाळक्या आईने घर उघडावे यासाठी आकांत करणारा बाळक्या, त्याचे मनातले कंगोरे अस्वस्थ करून टाकतात.
आई-वडिलांविना पोरक्या असलेल्या यशवंताचा जीवापाड सांभाळ करणारे आबा. भाऊबंदकीपासून आपली मालमत्ता आपल्या पाच वर्षांच्या नातवासाठी दूर ठेवणारे हे आजोबा. त्यांच्या मृत्यू नातवाच्या अबोध मनाला जाणवतच नाही. अखेरच्या प्रवासासाठी छान कपड्यातील, फुलांच्या राशीतली आबांची मूर्ती पाहून त्याला प्रेमाचे भरते येते. अन् अभावितपणे तो ओरडतो, ‘गणपती बाप्पा मोरया’ लेखकाने केलेला कथेचा शेवटही समर्पक आहे. ‘‘त्याचा माणसाएवढा उंच गणपती पाण्यात पडायला चालला होता.’’ ‘काळा धागा’ या कथेतल्या महादेवीच्या मनातली आंदोलने ज्या प्रभावीपणे कथेत व्यक्त झालेली आहे, त्याच प्रभावीपणे अपत्याची वाट पाहणाऱ्या सरू आणि दत्तूच्या मनातली स्पंदनेही लेखकाने सहजपणे चित्रित केली आहेत. सरूने मृत मुलाला जन्म दिल्यानंतर दु:खी झालेला दत्तू डॉक्टरांकडून स्वत:च्या पुरुषत्वाविषयी शंका घेतच बाहेर पडतो. पिंजऱ्यातला पोपट आणि पाळलेले मोतीराम माकड वास्तवाची जाणीव त्याला करून देतात. त्यांच्या भुकेल्या नजेरतील तृप्ती त्याचे मन थंड करीत जाते.
‘पोरकं घर’ या कथेतल्या महादेवाच्या मनातील दोलने वाचताना पुरुषांच्या मनाचा तळ किती गहिरवलेला असतो, त्यांच्या मनातले कढ किती तीव्र असतात, याचाही प्रत्यय येतो. दुसऱ्या अपत्याला जन्म देताना पत्नीचा झालेला मृत्यू महादेवाला अस्वस्थ करतो. प्रथम अपत्याच सांभाळ करताना येणाऱ्या समस्यांना तोंड देताना कावलेला महादेव एक डोळ्याने आंधळ्या मुलीशी तडजोड म्हणून लग्न करायला तयार होतो. आपल्या छोट्या पोरग्याला लग्नाचे सांगताना तो आपला आपणच अंतर्मुख होत जातो. दुसऱ्या मुलाची वाट पाहणारा, पहिल्या रोगट मुलावर रागवणारा ‘दिवा’ कथेतला बाबू, पत्नीने मुलीला जन्म दिल्यावर रोगट मुलगा हाच आपला वंशाचा दिवा हे पटून त्याच्याशी वागण्यात बदल करणारा बाबू, हा समाजातील एका वृत्तीचे प्रतिनिधित्व करणारा आहे.
‘पाखर’मधल्या जनीला काळ्या जमिनीसारखा दिसणारा नवरा आई-बापांनी बघून दिल्याचे सोयरसुतक अजिबात नव्हते. आपल्याच नादात ‘लग्ना’चा आनंद घेणारी जनी आणि झाडावरून रानावनात उडणारी पाखरं यांचे एक सुंदर चित्रण या कथेत केलेले आढळते.
भिंत खचल्यामुळे त्या खाली गाडल्या गेलेल्या पोरावरची माती दूर करताना सातप्पाची मानसिकता, ‘पावसाचं पोर’ झालेल्या शाम्याला सतावणारी मुलं, पण त्या थट्टेचाही मनमुराद आनंद लुटणारा तो, ही सारी व्यक्तिचित्रणं आनंद यादव यांच्या या कथेतून भेटायला येतात. या साऱ्या व्यक्तिरेखा आपल्याला आपल्या जीवनात वारंवार भेटत असतात, असे या कथावाचनातून जाणवत राहते.
या साऱ्या कथासंग्रहात अधीमधी प्रौढ प्रगल्भ मने भेटतात. पण त्यापेक्षा निर्व्याज अबोध बालमनाचा प्रत्ययही यातून अधिक प्रमाणात येतो. या छोट्या मुलांच्या मनोव्यापारातून प्रौढांनादेखील खूप काही शिकायला मिळते. त्यांचा प्रत्येक प्रश्न हा जगण्याशी निगडीत असतो. त्याला पडलेले कोडेदेखील आपल्याला कोड्यात टाकू शकते. त्यांच्या निरागसतेचं मूर्तिमंत चित्र मुखपृष्ठावर आहे.
‘उगवत्या मनांना’ निसर्गप्रतिमांची, ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. चंगळवादी संस्कृतीत वाढलेल्यांना जीवनात असेही काही प्रश्न असू शकतात, याचे भान हे पुस्तक नक्कीच देते. ग्रामीण जीवन, परंपरा यात वावरणाऱ्या या व्यक्ती त्यांचे जगणेच अंतर्मुख करतात. उमलत्या मनामधल्या पुरुष आणि बालमनातले कल्लोळ जाणून घेताना, त्यातले नाट्यपूर्ण अनुभव वाचताना मन अस्वस्थ होते. बहुजन समाजाची भाषा, त्या बोलीचा सहज सोपा आविष्कार आनंद यादव यांच्या पुस्तकातून घडतो. त्यामुळेच हे प्रसंग वाचत राहावेसे वाटतात.
-स्वाती खंडकर
DAINIK SAMANA 07-12-2003बालमनाची स्पंदने टिपणाऱ्या गावरान कथा...
‘उगवती मने’ हा आनंद यादव यांचा कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केला आहे. एकूण १५ कथांचा समावेश या संग्रहात आहे. बहुतांश कथा या बालमनाच्या कोवळ्या स्पंदनांशी निगडित आहेत.
ग्रामीण भागातल्या वास्तवात घडलेल्या या कथा वाचताना वाचकाचं मनही कुठेतरी कोवळीक जपू लागलं तर ते लेखकाच्या कथावस्तूचं, मांडणीचं आणि उभ्या केलेल्या प्रत्ययकारी वास्तवाचं द्योतक आहे. बालमनाचं विश्व हे त्याच्या स्वतंत्र अनुभवाशी निगडित असल्याने त्यांच्या विश्वाचं वेगळेपण हे स्वतंत्रपणेच जपण्यासारखं, हा अनुभव अनेक कथांतून येतो. या कथांतील पात्रांदेखील ग्रामीण मनाची स्पंदनं टिपणारी. राधी, श्यामा, संतराम, सगुणा, दत्तू, बाळक्या अशा वैशिष्ट्यपूर्ण नावांची पात्रं आपल्याला या कथांत भेटतात.
गावात आढळणारे भावाभावांचे नातेसंबंध, परस्परांचा वाटणारा दु:स्वास याचं एक आगळं चित्रण ‘दिवा’ कथेत आढळतं. पाचव्यांदा गर्भार असलेली सगुणा, तिचा अशक्त देह, दोन पोरं वर्सावर्साची होऊन मेलेली. उरलेला नाऱ्या हा मुलगा व राधी ही मुलगी. राधी चटपटीत देखणी आणि हुशार. मात्र नाऱ्या हा मुलगा असूनही रोगिष्ट, हातापायाच्या काड्या झालेला आणि सदैव माती खाणारा! म्हणूनच बाप बाबू सदैव नाऱ्यावर डाफरत राहणारा. भावाला असलेल्या दणकट मुलांबद्दल मनात असूया बाळगणारा बाबू आपल्यालाही वंशाचा दिवा घर उजळणारा लाभेल या आशेत असताना सगुणाला परत मुलगीच होते आणि निराश झालेला बाबू कधी नव्हे तो नाऱ्याला (माती खातो म्हणून नेहमी मारणारा) न मारता उचलून घेतो, आधी लेकीला दूर सारतो. नव्या मुलीकडे तर पाहतही नाही.
‘उन’ कथेतील आईचे कदमशी असलेले संबंध न आवडणारा बाळक्या, वडील गेल्याचेही न कळलेला ‘बाप्पा’ कथेतील यशवंता मनाच्या कप्प्यात कुठेतरी घर करून राहतात. या कथांतील प्रसंगदेखील ग्रामीण सवयींवर, ग्रामीण अनुभवांवर बेतलेले. ‘ऊन’ कथेतील बाळक्या सुईचं टोक सरळ ढेकणांच्या पाठीत आत घुसवून ढेकणं ओवायचा उद्योग सुरू करतो. ‘काळा धागा’ कथेतील हे वर्णन - आकडी दुधाचा चहा पिऊन महादेवी आतल्या अंगानं परसात गेली. ‘भिंत’ कथेतील हे वर्णन खेड्याचं - माणसं उठून नशीब काढण्यासाठी शहरगावाकडं जातेली. उरलेली कशीतरी प्रचंड वारूळातल्या चुकारीच्या गोरलीगत जगतेली.
वर्णनं करताना वापरलेली भाषा, त्यातल्या उपमादेखील गावाशी प्रतारणा होऊ न देणाऱ्या. ‘एखादं टरफल सोलून टाकावं तशी नारायणाला टाकून गाडी लांब जाताना दिसत होती.’ ‘बोलणाऱ्यांनी काखेत बसलेल्या राधीचं कौतुक केलं, गालाचं गचवारं काढलं.’ ‘जे स्वप्न बाबूनं खूप तंद्री लावून बघितलं, पण शेवटी त्याच्या मनासमोरचं ते चित्र ढेकळांच्या लगुरीगत ढासळलं.’ ‘आभाळाघरचे वैरी’ कथेतल्या ओव्या, ‘पावसाचं पोर’मधलं हे जेवणाचं वर्णन - ‘बोलता बोलता दोघांचीही पोरं पोहणी पडली. भाकऱ्या सोडल्या शाम्याकडे. दीड भाकरी नि तुरीच्या डाळीची उसळ होती. पोटात दुपारची भूक कोळकोळत होती.’
एकंदरीत सर्व कथांत समोर चित्र उभं राहील असं वास्तववादी चित्र, त्याला साजेशी भाषा आणि पात्रांची रेखाटलेली अचूक चित्रणं, त्यांच्या भावनांची आंदोलने टिपणारी, त्यानुसार मुलांची होणारी प्रतिक्रियेगत कृती हे सारं वाचताना आनंद यादव यांचं अचूक निरीक्षण आणि लेखनसामर्थ्य तर जाणवतंच, पण कथा बांधण्याची धाटणी वाचकाला आवडून जाते, एवढं खरं.
‘रसिकलाल मारू’ यांचं आतल्या आशयाला पूरक असं मुखपृष्ठ त्याची रंगसंगती खूप काही सांगून जाते.
-सायली ढवळे
DAINIK SAKAL 12-10-2003अबोध मनांचा वेध...
डॉ. आनंद यादव यांनी ‘उगवती मने’ या कथासंग्रहात अबोध मनांचा वेध फार सुरेखरीत्या घेतला आहे. त्यांनी अगदी मोकळेपणाने बालमनाची विविध रूपे येथे टिपली आहेत. बालमनाचे चित्रण मराठी कथेत काही कमी नाही, पण ते प्राधान्याने ‘रोमँटिक’ पद्धतीने झाले आहे. पण असेही जगणे असू शकते, त्यांचेही काही प्रश्न असू शकतात याचे वास्तव भान देणाऱ्या या कथा आहेत.
‘ऊन’मधील बाळक्याच्या मनातील कंगोरे अस्वस्थ करून टाकतात. वडील नाहीत. आईने पोटासाठी दुसऱ्याशी संबंध जोडलेले. हा माणूस आला की बाळक्या घराबाहेर. गोंधळलेल्या बाळक्याचा आईने घरात घ्यावे म्हणून चाललेला आकांत गलबलून टाकणारा आहे. ‘बाप्पा’मध्ये पोरक्या यशवंताचा जिवापाड सांभाळ करणाऱ्या आबांचा मृत्यू त्याला कळतच नाही. छान कपड्यातील आबांना फुले वाहून उचलले जाते, तेव्हा तो अभावितपणे ओरडतो - ‘गणपतीबाप्पा मोरया’. त्याचे हे वर्तन अजाणपणे घडलेले असते. अपत्यासाठी ‘काळा धागा’मधील महादेवीच्या मनातील दोलने आणि ‘चितपट’मधील सरू-दत्तू यांच्या मनाची स्पंदने प्रभावीपणे चित्रित झाली आहेत. ‘दिवा’मधील रोगट मुलावर सतत कातावणारा बाबू दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर वंशाचा दिवा म्हणून त्याच मुलाशी किती वेगळ्या प्रकारे वागू लागतो याचे चित्रण करताना लेखक समाजातील एका प्रवृत्तीवरच भाष्य करतो. कुळकुळीत नवरा असला तरी आपल्याच नादात लग्नाचा आनंद घेणारी जनी व मुक्त विहरणारी पाखरे यांचे ‘पाखरं’मधील चित्रण, ‘भिंत’ खचून त्याखाली गाडलेल्या पोरावरची माती दूर करणाऱ्या साताप्पाची मानसिकता, ‘पावसाचे पोर’ झालेल्या शाम्याला मुले सतावत असूनही त्याचा मनमुराद आनंद लुटण्याचा स्वभाव येथे चित्रित झाला आहे. जगण्याचा लसलसता कोंब आणि आयुष्यात वाट्याला आलेली कासाविशी यांचे नाट्यमय दर्शन या कथांमधून होते.
-सुजाता शेणई
NEWSPAPER REVIEW‘उगवती मने’ हा आनंद यादव यांचा कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिध्द केले आहे.
एकुण १५ कथांचा सामावेश या संग्रहात आहे.बहुतांश कथा या बालमनाच्या कोवळ्या स्पंदनांशी निगडित आहेत.
ग्रामीण भागातल्या वास्तवात घडलेल्या या कथा वाचताना वाचकाचं मनही कुठेतरी कोवळीक जपू लागलं तर ते लेखकाच्या कथावस्तूचं, मांडणीचं आणि उभ्या केलेल्या प्रत्ययकारी वास्तवाचं द्योतक आहे. बालमनाचं विश्व हे स्वतंत्र अनुभवाशी निगडित असल्याने त्यांच्या विश्वाचं वेगळेपण हे स्वतंत्रपणेच जपण्यासारखं, हा अनूभव अनेक कथांतील पात्रंदेखील
बालमनाची स्पंदने
टिपणाऱ्या गावरान कथा
ग्रामीण मनाची स्पंदनं टिपणारी. राधी, श्यामा, संतराम, सगुणा, दत्तू, बाळक्या अश्या वैशिष्टयपूर्ण नावांची पात्रं आपल्याला या कथांत भेटतात.
गावात आढळणारे भावभावांचे नातेसबंध, परस्परांचा वाटणारा दु;स्वास याचं एक आगळं चित्रण ‘दिवा’ कथेत आढळतं. पाचव्यांदा गर्भार असलेली सगुणा, तिचा अशक्त देह, दोन पोरं वर्सावर्साची होऊन मेलेली. उरलेला हा मुलगा व राधी ही मुलगी. राधी चटपटीत देखणी आणि हुशार. मात्र नाऱ्या हा मुलगा असूनही रोगिष्ट, हातापायाच्या काड्या झालेला आणि सदैव माती खाणारा! म्हणूनच बाप बाबू सदैव नाऱ्यावर डाफरत राहणारा. भावाला असलेल्या दणकट मुलांबद्दल मनात असूया बाळगणारा बाबू आपल्यालाही वंशाचा दिवा घर उजळणारा लाभेल या आशेत असताना सगुणाला परत मुलगीच होते आणि निराश झालेला बाबू कधी नव्हे तो नाऱ्याला (माती खातो म्हणून नेहमी मारणारा) न मारता उचलून घेतो, आधी लेकीला दूर सारतो. नव्या मुलीकडे तर पाहतही नाही.
‘ऊन’ कथेतील आईचे कदमशी असलेले संबंध न आवडणारा बाळक्या, वडिल गेल्याचेही न कळलेला ‘बाप्पा’ कथेतील यशवंता मनाच्या कप्पात कुठेतरी घर करुन राहतात. या कथांतील प्रसंगदेखील ग्रामीण सवयींवर, ग्रामीण अनुभवांवर बेतलेले. ‘ऊन’ कथेतील बाळक्या सुईचं टोक सरळ ढेकणांच्या पाठीत आत घुसवून ढेकणं ओवायचा उद्योग सुरु करतो. ‘काळा धागा’ कथेतील
हे वर्णन- आकडी दुधाचा चहा पिऊन महादेवी आतल्या अंगानं परसात गेली. ‘भिंत’ कथेतील हे वर्णन खेड्याचं-माणसं उठून नशीब काढण्यासाठी शहरगावकडं जातेली. उरलेली कशीतरी प्रचंड वारुळातल्या चुकारीच्या गोरलीगत जगतेली.
वर्णनं करताना वापरलेली भाषा, त्यातल्या उपमादेखील गावाशी प्रतारणा होऊ न देणाऱ्या. ‘एखादं टरफल सोलून टाकावं कशी नारायणाला टाकून गाडी लांब जाताना दिसत होती.’
- सायली ढवळे