प्रतीक सुनील येतावडेकरआज बरेच दिवसानी सलग वाचून काढलेलं पुस्तक... प्रा.मंडलिक,सायरा आणि ओंकारनाथ यांच्या भोवती फिरणारं कथानक. व.पुंच्या खास शैलीतील लिखाण आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं भाष्य आणि मनात चाललेल्या अनेक विचारांच्या अवर्तनाचा घेतलेला वेध !!! तू भ्रमात आहासी वाया.
Namrata Pimpale Dangareथोडसं,
"तू भ्रमत आहासी वाया" विषयी...😊
`वसंत पुरूषोत्तम काळे` यांचं हे पुस्तक.
आता `या` लेखकाबद्दल काय लिहायचं?🤔
म्हणजे खूप काही आहे लिहण्यासाठी आणि मागे #ठिकरी बद्दल लिहलं तेव्हा भली मोठी यादी ही केली होती यांच्या पुस्तकांची...
पण आता परत तेच तेच काय लिहायचं?...
तर,
साधारणतः 1955 _ 60 चा काळ...
गाडगीळ_ गोखले_ भावे_माडगुळकर या लेखकांनी मराठी कथेचे विश्व पूर्णपणे भारून टाकले होते.
याच काळात वपु हे नाव लोकप्रिय होऊ लागलं ते त्यांच्या सहजगर्भ शैलीमुळे.
नेमकेपणा, शब्दातला मोजकेपणा, साधेपणा, ओघवती शैली, आणि जीवनातले अस्सल अनुभव आणि त्यातले मानसीक पातळीवर रंगणारे नाट्य ही त्यांच्या लेखनाची खासीयत.
एकच म्हणेन,
`वपु` ...
सिर्फ नाम ही काफी है...😇
तू भ्रमत आहसी वाया...
🔸️सायरा, ओंकारनाथ आणि प्रा.मंडलीक या पात्रांभोवती फिरणारी ही कथा पण नेहमीच्या त्रिकोणात अडकलेली ही प्रेमकथा नाही.
🔸️प्रा.मांडलीक, सायराच्या गुरुस्थानी तर ओंकारनाथ ऑफिसमधले बाॅस.
🔸पण मग सायरा कोण?
तर...
"जैसा दीपे दीपु लाविजे।
तेथ आदील कोण हें नोळखिजे।
तैसा सर्वस्वे जो मज भजें।
तो मी होऊनी ठाकी।"
🔸️सायरा, धर्माने मुसलमान पण खऱ्या अर्थाने निधर्मी.
"नातरीं येथेच दिवा।
नेलिया सेजिया गांवा।
तो तेंथे तरी पाडवा।
दीपचि कीं।।"
याप्रमाणे सगळीकडे स्वतःमधली प्रसन्नता वाटणारी सायरा.
🔸स्वतःच्या बळावर नौकरी करत शिकलेली आणि दिसायला अगदीच साधारण अशी ही मुलगी.
🔸स्वतःचे प्रश्न सोडवत असतांनाच इतरांनमधेही प्रभावितपणे बदल घडवत असते.
🔸ओंकारनाथ काय होते आणि काय झालेत? त्याच्यातील होत जाणाऱ्या बदलाला कारणीभूत असलेली सायरा हे बदल कसे घडवून आणते आणि का?
🔸ज्ञानेश्वरी, गीता, कबीर यांचे दाखले देणारी सायरा, तिचे आयुष्य, ओंकारनाथ_ विनिताची कथा हे सगळं कसं आस्वादापलिकडचा आनंद देऊन जातात.
🔸️प्लॅस्टिकच्या फूलावर फिदा असलेला ओंकारनाथ ते खऱ्या चैतन्यमय फुलाच्या प्रेमात पडलेला ओंकारनाथ, हे सांगणारा हा प्रवास म्हणजेच तू भ्रमत आहासी वाया...
🔺पूर्णपणे involve होऊन पुस्तक वाचलं तरंच ते कळणार.
🔺नाहीतर सायरा उगीचच नेहमीच इतरांना सल्ले देत असते अशीही प्रतिक्रियाही माझ्या वाचनात आली😔
आता अश्या प्रतिक्रियेवर काय बोलावे...?😶
आताच्या या corona च्या काळात आपल्या सगळ्यांनाच कळून चूकलंय की जगण्यासाठी काय अत्यावश्यक आहे आणि काय नाही.
निरर्थक जगण्याला काहीच अर्थ उरत नाही.
आताच्या situation साठी सुध्दा,
Bang on आहे हे पुस्तक 🎯
#तूभ्रमतआहासीवाया
#वाचनवेड
#mustread
#bethechange
#वपु
😊
२८.०५.२१
योगेश उगलेसायरा. विलक्षण. केवळ विलक्षण. फुलासारखी दरवळणारी. धुक्यासारखी ओघळणारी. वीजेसारखी तळपणारीही. वपुंच्या सिध्दहस्त लेखणीतून जन्माला आलेली या कादंबरीची नायिका सायरा म्हणजे एक वेगळं रसायन आहे. तिचे अवलोकन करणारा वाचक तिच्यात विरघळून जातो. आकलनाच्या मर्यादा ओलांडून अनुभूतीच्या नव्या प्रदेशात सायरा आपल्याला घेऊन जाते. ही सायरा नक्की कोण आहे? तुमच्या-माझ्यासारखीच वाटत असणारी ही मुलगी क्षणात कबीराची प्रीती, ज्ञानेशाची भक्ती आणि ओशोची वृत्ती होऊन जाते, तेव्हा ती कुणासारखीच असत नाही. ती असते तिच्यासारखी. फक्त तिच्यासारखी. `पुढे स्नेह पाझरे.. मागे चालती अक्षरे..!` या ओवीला संजीवन देणारी आणि `ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय` या दोह्याचा भावार्थ होणारी सायरा वाचकाला तिच्या प्रेमात पडायला भाग पाडते..
तिच्या आयुष्यात जो कुणी येईल, ती त्याच्यासारखी होऊन जाते. नंतर तो माणूस कधी सायरामय होऊन जातो, ते त्याचं त्यालाही कळत नाही. परिस्थिती कोणतीही असो, प्रत्येक वेळी सायरा आपला अंदाज खोटा ठरवते. तिचं दुःख पेलण्याचं सामर्थ्य जसं विलक्षण, तसंच तिचं रडणंही विलक्षण. तिचं फुलणंही विलक्षण. सदैव दरवळत राहणंही विलक्षण. म्हणून तिला आनंदाबरोबर अश्रूंचाही महोत्सव करता येतो. तिला प्रत्येक क्षण काठोकाठ जगता येतो. भावनांना कुरवाळता येतं. जिथे जाईल तिथे ती सुगंध घेऊन जाते. तिच्या सान्निध्यात येणारा माणूस भारावून जातो. तिच्या विचारांची उंची वेगळी आहे. तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण जगावेगळा आहे. सायरा म्हणजे वस्तूंच्या सौख्यात रममाण होऊन `जगणं` विसरणाऱ्यांच्या जीवनात प्राण फुंकणारं संजीवन आहे..
वपुंच्या कादंबरीतील ही नायिका आदर्शवत वाटते म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करायला गेलं तर तेही शक्य होत नाही. कारण सायरा प्रत्येक वेळी मर्मावरच बोट ठेवते. आपल्याला आपल्या वर्तुळाबाहेर जाऊन विचार करायला भाग पाडते. बोलता बोलता ज्ञानेश्वर, कबीर, बुध्द, ओशो यांचे विचार पेरत जाते. सायरा कधी अंतर्मुख करते तर कधी अवाक् करते. `प्रतिक्षणी आनंदी राहण्याचा वसा घेतला तर कोजागिरी मावळत नाही` हे सांगणारी सायरा अगदी जवळची वाटते. तर `मित्रांपासून सख्ख्या नातेवाईकांपर्यंत आपण ज्यांना ज्यांना जवळचे मानतो किंवा जे जे आपल्याला जवळ करतात, ती निव्वळ गरजांची स्पर्धा असते` असं बोलणारी सायरा ज्ञानेश्वरांच्या `तू भ्रमत आहासी वाया` या ओवीच्या उंचीवर उभी असते. प्रत्येक ओळीतून सायरा मनापर्यंत पाझरत जाते. कादंबरी संपते. सायरा संपत नाही. सायरा काही मागत नाही. जागत राहून प्रत्येक क्षणातील सौरभ गोळा करण्याचा विचार पेरत जाते. पुस्तकाच्या पानांपासून प्राणांपर्यंत अंतर्बाह्य व्यापून उरते..
कादंबरी छोटी. त्यातील गोष्टही छोटीच. पण मोठी आहे ती या कादंबरीतील विचारगंगा. तो प्रवाह निर्मळ आहे. त्यात आपण आपलं प्रतिबिंब पाहू शकतो, तसेच नितळ पाण्याखालचा तळही पाहू शकतो. त्यातील जीवनरसाच्या आपल्याला हव्या तितक्या ओंजळी भरभरुन घेऊ शकतो. वपुंची प्रत्येक कादंबरी, प्रत्येक कथा आणि प्रत्येक प्रकारचं लेखन अतिशय उत्तुंग आहे. परंतु `तू भ्रमत आहासी वाया` ही कादंबरी म्हणजे निदान माझ्यासाठी गौरीशंकर आहे. प्रत्येकाने ही कादंबरी वाचावी, असं मी सांगणार नाही. पण प्रत्येक वाचणाऱ्याने ती अनुभवायला हवी..
© योगेश उगले
13.01.20
MOHINI KARANDEजीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारी आवडलेली कादंबरी.
MALVANKAR SIDDHUमला हेच म्हणायचं होतं पण मला शब्दच सापडले नाही. हे न सापडलेले शब्द म्हणजे व.पु.काळे याचे लेखन. व.पु.काळेंची प्रत्येक कलाकृती वाचताना याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.
व.पु.काळे यांनी कथा फार लिहिल्या, त्या तुलनेत कादंबरी बोटावर मोजण्याइतक्याच लिहिल्या. त्यातीलच एक म्हणजे `तू भ्रमत आहासी वाया` ही कादंबरी. ही म्हणजे वपुंच्या सर्वोत्तम कलाकृतीचा नमुनाच म्हणजे आजकाल मराठीत म्हणतात तसं मास्टरपीसच म्हणा ना!
माला फेरके जुग भयो, पंडित हुआ न कोय
ढाई अक्षर `प्रेम` का पढे सो पंडित होय
कबीरांच्या या दोह्याची प्रचिती `तू भ्रमत आहासी वाया` वाचल्यावर जाणवली नाही तर नवलच.
आता जरा कादंबरी कडे वळतो. कादंबरीची सुरुवात होते ती `सायरा` आणि प्रा. मंडलिक यांच्या संवादापासुन. सायरा हे कादंबरीच एक मध्यवर्ती पात्र आहे. सायराचा प्रेमभंग कादंबरीच्या सुरुवातीला होतो. ती पंजक वरती प्रेम करते. पण नंतर पंकज तिला नकार देतो. त्यामुळे हे दुःख ती प्रा. मंडलिक सांगताना म्हणते, "माझ्याशी लग्न करशील का?" हे पंकजनं नजरेत डोकावून विचारलं आणि, "माझं लग्न ठरलं आहे." हे त्यानं नजर चुकवून सांगितलं. अशाप्रकारे सायराची समजुत काढताना प्रा. मंडलिक जीवनाच तत्वज्ञान मांडतात. तत्वज्ञानाच्या माध्यमातून सर्व पात्र संवाद साधताना आपल्याला कादंबरीभर पाहायला मिळते. पण हे संवाद कुठेही रटाळ होत नाहीत, उलट कादंबरी एका विशिष्ट उंचीवर नेण्यास हे संवाद कारणीभूत ठरतात.
कादंबरीच्या कथानकात सायरा एका कंपनीत स्टेनो म्हणून काम करते. ओंकारनाथ त्या कंपनीचे बॉस असतात. ते तिचं प्रेमभंगाच्या काळातील सायराचं वागणं पाहत असतात. हळुहळू सायरा प्रेमभंग स्वीकारुन आयुष्य जगण्याचा प्रयत्न करु लागते. ती रोज नविन फुलं घेते. ती फुलं तिच्या टेबलावरील फुलदाणीत ठेवते त्या फुलांच्या सुगंधात दिवसभर काम करते. संध्याकाळी काम संपलं की सकाळची फुलं आता कोमेजून जात असत. ती कोमेजली फुलं घेऊन सायरा त्यांना समुद्रात जलसमाधी देत असे. उलट आपल्या बॉसच्या टेबलावर खोटी फुलं होती ती कधीच कोमेजून जात नसतं. पण त्या फुलांना गंध नाही त्यामुळे तिला वाईट वाटे. असं ती एकदा ओंकारनाथांना सांगतेही, पण ओंकारनाथाना तिचं हे बोलणं पटतं नाही.
पुढे हळुहळू सायरा आणि ओंकारनाथांमध्ये बर्याच विषयाच्या चर्चा होतात. प्रा. मंडलिकांबरोबरही सायराच्या बर्याच चर्चा होतात. एकदा सायरा प्राध्यापकांना विचारते की, "पुरुषाचं वस्तुनिष्ठ चित्रण करणं शक्य आहे का?" प्राध्यापक म्हणतात, "निसर्गानं स्त्री आणि पुरुष असे दोनच घटक निर्माण केले. ह्या दोघा घटकांचं वस्तुनिष्ठ चित्रण करण्यासाठी तिसरा घटक हवा होता तर योग्य उत्तर मिळेल." ते पुढे उदाहरण देतात, `बाई नॉर्मली म्हणेल पुरुष लंपट असतातच आणि पुरुष सांगू लागला तर ते समर्थन ठरेल. ह्या व्यतिरिक्त कोणी दुसरी प्रतिक्रिया सांगू शकणार नाही.`
पुढे सायरा आणि ओंकारनाथांची मैत्री होते. तेव्हा ते एकदा समुद्र किनार्यावर जातात. तिथे एक संवाद त्यांच्यात होतो. सायरा म्हणते, "अॉफिस म्हणा, घर म्हणा तिथं वास्तुपेक्षा आपण मोठं असतो. मालकिचा अहंकार तिथं बोलतो. आपण क्षुद्र आहोत ह्याची जाणीव स्वतःला करुन देण्यासाठी समुद्राजवळ बसायचं असतं." त्यावर ओंकारनाथ सायराला विचारतात, "निसर्गाची प्रत्येक निर्मिती भव्यच असते. तरीसुद्धा, तुमच्या मते अतिभव्य काय?" सायरा उत्तर देते, "माणूस." ओंकारनाथ आश्चर्यचकित होऊन विचारतात, "आता एवढ्यात तर तुम्ही माणूस क्षुद्र आहे म्हणालात." त्यावर सायरा म्हणते, "हा महासागर, ते क्षितिज, आकाश मोजता येणार नाही. पण आपल्या एवढ्याशा डोळ्याला ते दिसतं." "मेंदू हेच एक प्रचंड विश्व आणि त्याच्याही पलीकडे मन."
ओंकारनाथ दिवसेंदिवस सायरामुळे प्रभावित होत राहतात. कधी ते व्यथितही होतात. ओंकारनाथांकडे पैसे असतात. बायको असते. या जीवनात सुख ज्या मापदंडानी मोजतात, ती सर्व मापदंडे ओंकारनाथांकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तरी ते सुखी नसतात. या कादंबरीत ओंकारनाथांच्या बायकोची ही एक बाजू असते. शिवाय ओंकारनाथांचा एक जुना विश्वासु सहकारी याचीही एक गोष्ट आहे. तसेच सायरा आणि प्रा. मंडलिकाच्या नात्याची कहाणी सुद्धा या कादंबरीत उलगडते. या सर्व गोष्टी कादंबरीला अजुन सशक्त करतात. कादंबरीतीत पुढे ओंकारनाथ आणि सायराचं काय होतं हे वाचनीय आहे. त्यामुळे ही कादंबरी आपाल्याला एक सुंदर वाचनानंद देते यात शंका नाही.
Manoj Chandrakala Vasantrao Mohale `तू एकदा रडून घे.तुला बर वाटेल.` तिन चमकून प्रा.मांडलीकडे पाहल.ते त्याच्या शांत,धीरगंभीर आवाजात म्हणाले,रडणं म्हणजे दुबळेपणाच लक्षण नव्हे.मोकळेपणी रडायला धैर्य लागतं.. माणूस स्वतःच्या वयला घाबरतो.सायरा अस तीच नावं..अजुन कुठल्या शब्दात तुम्हाला ह्या छोट्या कादंबरी विषयी अजून कस काय बरं सांगु ? वपुकाळे माझे.आवडते लेखक..वाचतांना अस काही होत कि Ak 47 गोळी सारखी नाही एक सारखी गोळी धाड धाड झाळत असेल.तसं वपु लिहितात वाचतांना..मला सारख होत.चागलाच श्वास वर खाली होतो..अप्रतिम लिखाण..सायरा बदल अजुन वाचावं वाटत जस काही ओंकारनाथ याना जे वाटत तसच होत अजून सायरा विषयी जाणून घ्यावं वाटत..पंकज बदल सुद्धा तसच होत बर का..जेव्हा आपण वाचलं तेव्हा आपल्याला समजेल😉 तर मग वाट नका पाहू नक्की वाचून काढा..फार कमी 84 पान आहेत पण एक एक पानावर..काळजाला भिडणारे शब्द आहेत नेहमी प्रमाणे..समजलं😋..नाही तर ..तू भ्रमात आहासी वाया..समजेल नाही..याच भ्रमात राहाल..धन्यवाद 🙏....