- DAINIK LOKMAT 09-01-2005
यशोधरा भोसले यांचा ‘बंजाऱ्याचे घर’ हा ललित लेखसंग्रह विविध गुणांनी संपन्न आहे. प्रसिद्ध लेखिका माधवी देसाई यांच्या या कन्या. या संग्रहातील पाचही लेख यशोधरा भोसले यांचे वास्तव्य झालेल्या घरासंबंधीच्या आहेत. या लेखामध्ये स्मरणरंजन आहे. आत्मकथन आहे. त्यातून प्रकट होणारी मानसिकता खूप काही सोसून पचवलेल्या प्रगल्भ परिपक्वतेची आहे.
घराशी निगडित असलेल्या त्या-त्या वेळच्या भाविश्वात घेऊन जाणारे हे लेख आहेत. आयुष्याच एकेका ठप्प्याशी रेंगाळणारे आहेत. त्या-त्या टप्प्यांवरील व्यक्तींवर लक्ष केंद्रित करणारे आहेत. लेखिकेचे हे पहिलेच पुस्तक असूनही लेखन, वर्णन, शैलीतील सहजता व सफाई लुब्ध करणारी आहे. एका स्त्रीमधून वेगळी दृष्टी या लेखांना लाभली आहे. अनेक रंग या घरांना आणि घरातल्या माणसांना लाभलेले आहेत.
कलावंतांचे मन आणि नजर या लेखातील अगणित तपशीलातून दिसते. घराभोवतालच्या निसर्गाची चैतन्यशील रूपे नजरेसमोर येतात, तशीच एखाद्या चित्रकृतीची सौंदर्यस्थळेही सहजपणे शब्दरूप धारण करतात, ‘बंजाऱ्याचे घर’ मधील शेवटचे घर वगळता बाकीच्या सर्व घरांशी लेखिकेचा वैयक्तिक संबंध आल्यामुळे त्यातील तपशीलांना व्यापक संदर्भ लाभलेला आहे. चित्रतपस्वी, भालजी पेंढारकर (आजोबा), लीलाबाई पेंढारकर (आजी), माधवी देसाई-काटकर (आई), काटकर (वडील), मीरा तारळेकर (बहीण), रणजित देसाई (पितृतुल्य दादा), प्रभाकर पेंढारकर (मामा) आणि जाई (कन्या) या कुटुंबीयांसमवेत इतरही व्यक्तींचे उल्लेख येतात. पहिले घर आहे ते गावाकडचे पिढ्यान् पिढ्या पासूनचे शंभर वर्षंचे या घरात पूर्वजांच्या पिढ्या वर्षानुवर्षे वाढल्या. लेखिकेचे या घरात पाय ठेवताच सगळे ताण कमी होऊन जातात. चिडचिड् कमी होते. दुसरे घर भेटते ते माहेरचे गोव्यातले बांदोड्याचे. काटकरांशी लग्न करून गोव्यात आल्यावर येथील सुखासीन जीवनाला उबगलेल्या माधवीताई मुंबईसारख्या शहरात नशीब अजमावायला पतीसह गाव सोडतात. कल्याणजवळच्या मोहोन्याच्या कंपनीच्या क्वार्टरमध्ये चार खोल्यांत हौसेने घर सजवतात.
परंतु काटकरांच्या मृत्यूनंतर आणि रणजित देसार्इंच्या कोवाडच्या घरातून बाहेर पडल्यावर, बेळगावमधल्या अल्प वास्तव्यानंतर आपल्या मूळ सासरच्या घरी गोमंतकात येण्याचा निर्णय माधवी घेतात आणि वर्षानुवर्षे बंद असलेल्या बांदोड्यातल्या देवळाच्या परिसरातल्या या घराला घरपण येते. तिसरे घर आहे ते कोवाडमधले रणजित देसाई यांचा खानदानी वाडा. काटकरांच्यानंतर रणजित देसाई लेखिकेचे वडील, गुरू, मित्र आणि मार्गदर्शकही बनतात. त्यांच्या बद्दलचे मनोभाव येथे संयतपणे प्रकट झाले आहेत.
चौथे घर आहे ते चित्रकार रमेशच्या स्टुडिओमधले.’ ‘१२ ए-रेशम’ हा टेन परसेंट कोट्यातील फ्लॅट लेखिकेला मिळालेला असतो. या फ्लॅटमध्ये राहताना त्या घराचे आणि आपले सूर चांगले जुळून आल्याचे समाधान त्यांच्या लेखामधून व्यक्त होते. अशाप्रकारे एक प्रदीर्घ प्रवास या घरांद्वारे लेखिकेप्रमाणेच वाचकांनाही घडतो.
-प्रा. शिवाजी पाटील
- DAINIK SAKAL 23-03-2003
स्त्री मनाचा गुंता उकलणारं ललित लेखन...
‘घर’ या विषयाभोवती घुटमळणाऱ्या ललित लेखांचं पुस्तक आहे ‘बंजाऱ्याचे घर’. यशोधरा भोसलेंनी ते लिहिलं. पुस्तकात ‘घर’ विषयाची एक कथाही आहे. शेवटी ‘कुणी घर देता कां घर?’ असा टाहो फोडणाऱ्या नटसम्राटाची आंतरिक घालमेल घेऊन येणारं हे पुस्तक ‘घर’ या विषयाशी जोडलेल्या स्त्री मनाचा गुंताही उकलतं. व्हर्जिनिया वुल्फनी ‘ए रूम ऑफ वन्स ओन’ची कल्पना मांडली होती. पंजाबी कवयित्री अमृता प्रीतमनी तीच कल्पना ‘चौथा कमरा’ म्हणून स्पष्ट केली आहे. शांताबाई शेळकेंनी ‘चोली का अपना दामन’ म्हणून समाजाच्या आसमंतातील स्त्री मनाचा अवकाश वर्णिला होता. यशोधरा भोसले आजोळ, माहेर, सासर, मित्र अशी घरांची स्थित्यंतरं अनुभवतात. जीवनात कोसळलेलं आकाश पेलत यशोधरा भोसले आपलं आकाश, अंगण, आसमंत निर्माण करतात. जीवनातल्या प्रतिकूल क्षणी आपली असणारी माणसं जेव्हा दुरावतात तेव्हा दगडमातीची निर्जीव वाटणारी घरंच ऊब देतात. कधी काळी स्वत: बंजारा असलेला मुख्यमंत्री यशोधरा भोसलेंसारख्या निराधार परागंदा स्त्रीस मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून देतो तेव्हा ती आई-बाबांची पुण्याई म्हणूनच; पण या साऱ्या प्रवासात लेखिकेस सावरतात ती घरंच तेच तिचे खरे गणगोत.
‘बंजाऱ्याचे घर’ जीवनाच्या अवघड वळणावर स्त्रीस बळ देणाऱ्या घराच्या घरंदाजपणाची स्वगतंच होतं! घर बोलतंय की, लेखिका असा कधी कधी भ्रम पडावा अशा एकात्मिक लालित्याने लिहिलेले घरांसंबंधी ललित लेख वाचताना वाचकाला स्वत:चं घरदेखील मनी-मानसी बोलू-डोलू लागल्याच्या अपसूक भास होऊ लागतो. हे असतं यशोधरा भोसले यांच्या ललित नि संवेदी शैलीचं यश. पुस्तक वाचताना लेखिका कधी काळी उभारीच्या वयात इंग्रजीमय झाली होती. हे खरं नाही वाटत. साऱ्या घरांच्या वर्णनामागे एक अंधुक, अलिखित सूत्र जाणवतं. जागतिकीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या घरानं मनुष्यपण मारलं, हवा, पाणी, परिसर, विद्रूप, विरूप होऊ लागलेला आहे. अशा स्थितीत घराचं घरपण आपण जपलं-जोपासलं तरच सुख-समृद्धी, स्वास्थ्य, संस्कार, संस्कृतीचं पंचशील सुरक्षित राहणार हे समजविणारे हे ललित लेख! सुंदर तितकेच सामाजिक भान देणारे!!
‘बंजाऱ्याचे घर’ लेखिकेनी ऋणमोचन भावनेनं केलेलं लेखन आहे. त्यात कृतज्ञता आहे तशी कणवही. गावाकडचं घर पहिल्या भेटीतच आपलं होतं. कौलारू, कृष्णवेलींनी वेढलेलं. आजीच्या मायेनं मंतरलेलं हे मातृधर्मी घर. म्हणूनच लेखिकेला त्याचं कोण अप्रूप? घर आपलं असलं की, यायला निमित्त नाही लागत. ते नित्यनेमाने आपणाकडे आपल्या माणसांना ओढत राहतं. जंगलाच्या कुशीत दडलेलं हे घर. या घरातली माणसं पण घरासारखीच आतून-बाहेरून एक. साकाळलेलं आयुष्य मोकळं करणारं हे घर लेखिकेला म्हणून तर आप्त, स्वकीय, आत्मीय वाटत. राहतं मावशी, रखवालदार भीम, त्याची मुलं सारी कशी स्वभाव गर्द, मनानं हिरवी स्वभावानं गुलमोहर, बोगनच्या फुलासारखी जर्द!
दुसरं घर लेखिकेचं गोव्यातलं आजोळ, बांदोड्याचं सभामंडप, नगारखाना, आगरशाळा, असं ऐसपैस चौसोपी. महालक्ष्मी मंदिराच्या ओवऱ्यांनी वेढलेलं, भट-भिक्षुकांच्या घरांनी घेरलेलं. चिऱ्यांचा गडगा, पाण्याचं तळं... लेखिका घर सजीव करते ती शब्द वर्णनांनी नाही, तर आठवणींच्या शिंपणांनी, पोर्तुगीजी थाटाचं हे घर अगडबंब कुलूप-किल्लीनी; पण प्राचीन असल्याच्या खुणा उठवतं. उतरती कौलं, अर्धगोल महिरपी दरवाजे, खिडक्या, देवळी, दगडं साऱ्यांनी हे घर आपणास केव्हा भूतकाळात घेऊन जातं ते कळलं नाही. खेड्यातलं असलं तर खानदानी कोंदणात वसलेलं नि म्हणून लोभसही!
कोवाडचं घर तिसरं. स्वामीकार रणजित देसार्इंचं, हे बांदोड्यासारखच खानदानी घर; पण याची चेहरेपट्टी वेगळी नाही म्हणून तरी कर्नाटकी मुलखाच्या सीमेवर वसलेलं. या घरानं लेखिकेचं हरवलेलं मराठीपण बहाल केलं. भाषा, साहित्य, कलेचे संस्कारांनी भरलेलं घर. पायाखालची वाळू सरकलेल्या भुसभुशीत दिवसात मायमराठीबरोबर याच घरानी सुप्त कलेचे धुमारे फुलवले. आपल्या रणजितदादांचं तुटलेपण लेखिकेनं अनुभवलं ते हेच घर. साऱ्या विस्कटलेल्या आयुष्याचे धागेदोरे जोडणारे हे घर; पण कसं सुन्न ...मौन ...‘यार की कोई खबर लाता नही’ असं काव्यात्मक, भावस्पर्शी शीर्षक देऊन यशोधरा भोसले यांनी एका उद्ध्वस्त जीवनाची अबोल करुण कहाणीच पेश केली आहे.
‘कोलाज हे चौथं घर. कोलाज ही एक चित्रशैली. आपल्या ठिगळ जोडीच्या आयुष्यात भेटलेल्या चित्रकार मित्राचं हे घर. मुकुंदनगर, चेंबूर, मुंबईचा परिसर ज्यांना माहिती आहे त्यांना कोलाज वाचताना लेखिकेच्या निरीक्षण नि:शब्द सामर्थ्याची कल्पना यावी. ‘बंजाऱ्याचे घर’ पुस्तक म्हणजे चित्रशैलीचा सुंदर नमुना. या पुस्तकाचं सारं सौंदर्य शैलीत सामावलंय.
पत्ता हरवलेल्या घराआधीचं ‘१२-ए रेशम’ हे घर महानगरातील फ्लॅट संस्कृतीचं व्यवच्छेदक रूप. पैसा, प्रतिष्ठा सर्वत्र असलेल्या महानगरात मुख्यमंत्री मोठा की बिल्डर? मुख्यमंत्री कोट्यातील घर मिळवण्याचं दिव्य पार केल्यानंतर मिळालेलं हे घर लेखिकेला आपली जागा, आपलं जग मिळवून देत.
या पुस्तकातील प्रत्येक लेखास लाभलेली सूचक, समर्पक, शीर्षकं या पुस्तकाचं आगळं वैशिष्ट्य. या प्रत्येक कथात्मक लेखाच्या सुरुवातीस व शेवटी मनोज आचार्य यांची रेखाटनं पुस्तकास बोलकी करतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठात हिरवे, निळे, पिवळे जर्द रंग ओतून निसर्गाचं गहिरंपण चित्रकारांनी असं चित्रित केलंय की, त्या घरांची ओढ वाचकांना दाटून आल्याशिवाय राहत नाही.
‘बंजाऱ्याचे घर’मधील ‘पत्ता हरवलेलं घर’ ही एक स्वतंत्र कथा आहे. कथेची विषयक पार्श्वभूमी घर असली तरी दोन पुरुषांमधील वैशिक संबंधांची ही कथा. एक गंभीर विषय पेलणारी कहाणी. कथात्मक ललित लेखांबरोबर देणं औचित्यपूर्ण खचितच नाही. लेखिकेनं संग्रहभर कथा होईपर्यंत या कथेसाठी थांबायला हवं होतं. हे पुस्तक सदरचा अपवाद वगळता समाज व व्यक्तीसंबंधांची ललित अंगांनी केलेली मांडणी असली, तरी त्यामागची सल सतत वाचकास अस्वस्थ करत राहते.
- Jyotsna Aphale
हे पुस्तक वाचले आहे अप्रतिम
- Sharmila Phadke
माझं अत्यंत आवडीचं पुस्तक
- सौदामिनी कौशिक
मला खूप वेगवेगळ्या कारणांनी हे पुस्तक आवडलं होतं
- MAHARASHTRA TIMES 06-05-2004
तरल, हृदयस्पर्शी ‘बंजाऱ्याचे घर’...
हा ललित लेखसंग्रह वाचताना, स्वत:चे स्वत्व जपण्यासाठी धडपडणाऱ्या लेखिकेचा परिचय होतो. हे पुस्तक आत्मनिवेदनपर आहे. स्त्रीला सत्वाचे संरक्षण व ‘स्व’त्वाचे संवर्धन करता येईल, असा तिच्या स्वत:चा अवकाशाचा तुकडा प्रत्येक ‘घर’ बनावे, या सदिच्छेतून स्वास्थ्य देणाऱ्या घरांच्या आठवणी लेखिकेने जागवल्या आहेत.
यातील ‘माहेर’ या लेखात लेखिका गोव्यातील आईच्या निवासाविषयी जसे लिहिते, तशीच ती दिवंगत पपांच्या मोहोनेच्या सेवानिवासातील आठवणी लिहिते. ‘यार की कोई खबर लाता नहीं’ मध्ये ती आपल्या आईने केलेल्या पुनर्विवाहामुळे लाभलेल्या रणजितदादांच्या आठवणी लिहिते. ‘कोलाज’मध्ये आपले चित्रकलाप्रेम पुन्हा चेतवणारा चित्रकार मित्र रमेश याच्या झोपडपट्टीतील घराचे तर ‘१२-ए, रेशम’ मध्ये आईच्या नावावर सरकारी कोट्यातून घर मिळवताना झालेल्या फरफटीचे भेदक वर्णन करते. ‘बंजाऱ्याचे घर’मध्ये तिला लिहिते केलेल्या दुर्गम घराचे वर्णन ती करते. ही सारीच वर्णने लक्षवेधी होतात. उदाहरणार्थ, ‘बंजाऱ्याचे घर’मध्ये तिला लिहिते केलेल्या दुर्गम घराचे वर्णन ती करते. ही सारीच वर्णने लक्षवेधी होतात. उदाहरणार्थ, ‘बंजाऱ्याचे घर’मधील कुंपणालगतचा हडकुळा आंबा तिला ‘मला कडे घे’ म्हणत हात वर करून भोकांड पसरणाऱ्या लहानग्यासारखा दिसतो, तेव्हा लेखिकेबरोबर वाचकालाही खुदकन हसू येते!
‘पत्ता हरवलेले घर’ मुंबईच्या आयुष्यातील बकालपणा, ढासळती नीतिमूल्ये यांचे भोवळ आणणारे दर्शन घडवते.
-नीला उपाध्ये
- DAINIK GOMANTAK 08-06-2003
‘चौथा कमरा’ शोधण्याचा केलेला प्रयत्न...
यशोधरा भोसले या लेखिकेचे हे पहिलेच पुस्तक. आत्मनिवेदनपर ललित लेखांचा हा संग्रह आहे. लेखिका प्रस्तावनेतच सांगते, की ‘आयुष्यातील अत्यंत अवघड वळणांवर काही घरे मला सामोरी येत गेली. या घरांनी मला हक्कांची सावली दिली, निवारा दिला अन् त्या काळात अतिशय गरजेचे असणारे स्थैर्य व स्वास्थ्य मिळवून दिले. त्यांचे ते ऋण काही अंशी तरी फेडण्याची निकड मला प्रकर्षाने वाटत राहिली. त्यातून हे लिखाण उमटत गेले.’
या प्रस्तावनेतूनच पुस्तकाचे लेखातील स्वरूप, उद्देश व तयाच्या सीमारेषा स्पष्ट होतात. प्रत्येक लेखातील पार्श्वभूमी, त्यात येणारी पात्रे, त्यात घडलेले प्रसंग (अनेक अंशी) मराठी माणसाला सुपरिचित असल्यामुळे लेखिकेचे हे पहिले पुस्तक राहतच नाही. पुस्तकात मांडलेल्या सर्व समस्या, प्रकट होणारे जीवनदर्शन, सतत झगडा, भीती, हतबलता, विसंवाद हे सर्व वाचकांच्या जिव्हाळ्याचे विषय होतात. लेखिकेच्या वेदनेत वाचक घसुमटतो. तिच्या समस्या समजल्यावर कासावीस होतो. तिच्या झगड्यात त्यालाही स्फुरण चढतं व शेवटी तिच्या झालेल्या विजयाने त्याला समाधानाचे सुस्कारे सोडावेसे वाटतात. वाचकांनी या लेखिकेच्या लिखाणाशी इतके एकरूप, इतके तन्मय होण्याचे कारण लेखिकेच्या लिखाणाच्या नैपुण्यतेबरोबरच तिची सर्व जवळची माणसं मराठी मनाच्या ओळखीची, जवळची आहेत, हेही असेल. आजोबा-आजी, भालजी पेंढारकर व लीला पेंढारकर, आई माधवी देसाई, पितृतुल्य रणजित देसाई, सर्वच जण साहित्य आणि कला प्रांतातले शिरोमणी. त्यांची आवड. त्यांचे सर्जनशील गुण झिरपत आलेले यशोधरा भोसलेंच्या साहित्यात स्पष्टपणे जाणवतात. लिखाणात इतका सहजपणा आहे, की हे लेखिकेचं पहिलं पुस्तक आहे. हे कुठंही जाणवत नाही. घरासंबंधी प्रसिद्ध लेखिका अमृता प्रितम म्हणतात, ‘‘भारतीय स्त्रीला ‘चौथा कमरा’ कधीच मिळत नाही. ती राहते पतीच्या घरात. जिथे पहिला दर्शनी कमरा असतो. पुरुषमंडळींचा, दुसरा रसोई पकवण्याचा, म्हणजेच स्वयंपाकघर आणि तिसरा नवऱ्याची शेज सजवण्याचा. आपल्या देशातल्या स्त्रीला स्वत:चा असा हक्काचा एखादा लहानसा कोपरा, कोनाडा कुठे असतो?’’ या चौथ्या कमऱ्याचा शोध लेखिकेने प्रत्येक लेखात घेतल्याचे जाणवते. कडु-गोड आठवणींचा खजिना बहाल करणाऱ्या या घरांमध्ये पहिले घर आहे, बंजाऱ्याचे. लेखिकेच्या पूर्वजांच्या पिढ्या वर्षानुवर्षे सुखाने जगवणारे घर! आजीचे घर. त्या घराच्या दगडा-छपराच्या, कुत्र्या-मांजरांच्या, शेताभाताच्या, रानावनाच्या आठवणी कॅनव्हाससारख्या उलगडत जातात. नक्षत्रांनी फुललेल्या आकाशात, सप्तर्षीचा पहिलेला अद्भुत खेळ; कात टाकलेल्या सापाची रात्रीची भटकंती, परंतु या सर्व पाठशिवणीतूनच व्यापून उरलेली एकच जाणीव, ‘माझी इथून निघायची वेळ झाली आहे!’ सत्तावीस पानी या लेखात निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, प्राणीचित्र इतक्या आकर्षक, मोहक ढंगात रंगवजेजे आढळतात, की वाचतानाच मन गुंग होते.
‘माहेर’ या लेखात वडिलांच्या गोव्यातल्या घराचा आलेख आहे. कोकणी भाषेच्या मुलाम्यात रंगलेला हा लेख. बांदोड्याचे घर, देऊळ, भात-खाचरं या सर्वांची वर्णनं यात येतात. वडील मुंबईला नोकरीला लागल्यावर, कामगार वसाहतीत मिळालेली क्वार्टर, तिथली माणसं, हवा, रीतीरिवाज, बालपण, वडिलांनी केलेले लाड, त्यांची शिस्त, अकबर अलीजमधून आणलेला बर्थ डे केक, सुखाचे, आनंदाचे दिवस... अन् वडील वारल्यानंतर लेखिकेच्या आईनं जगाकडून खाल्लेल्या फटक्यानंतर मोडलेल्या अवस्थेत गोव्याला परतलेल्या कुटुंबाच्या आठवणी, ही सर्व ‘माहेरची घरे’ या लेखात काळजाला निश्चितच चटका लावतात.
मग एक दिवस उजाडतो, तो पितृतुल्य दादा, रणजित देसाई यांच्या घरात घालवलेल्या दिवसांच्या आठवणींचा घमघमाट घेऊन. कोवाडच्या भूतकाळाच्या धुक्यात विरून नाहीशा झालेल्या या आठवणी पुन्हा पुन्हा कशा जाग्या होत राहतात? प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आदर आणि स्थान असणारे व्यक्तिमत्त्व! रणजित देसाई! आई माधवी देसाई यांनी प्रौढपाणी रणजित देसार्इंशी लग्न करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने सर्व आप्तमंडळी, समाज, परिसर ढवळून निघाला; पण ‘त्यांच्या’ मुली व ‘यांच्या’ मुली मिळून पाच मुली त्या घरात साखरेसारख्या विरघळून गेल्या. त्या घरची श्रीमंती, लहानपणापासून भक्ती केलेल्या लेखकाच्या, वडिलांच्या रुपात लाभलेला सहवास, त्या घरातील प्राण्यांची, नोकर-चाकरांची फौज, तिथल्या वास्तूत घडलेली मुलींची मंगलकार्ये, बाळंतपणे, नातवंडापंनी घातलेले धुडगूस, तिथली पुस्तके, अँटिक्स, चित्रे, दुर्मिळ चिजा व सर्वांबरोबर वात्सल्याची चढलेली झिंग एका फटक्यानिशी उतरवली जाते. कोणाची चूक, कोणाचा अपराध कळत नाही; पण ‘त्यांच्या’ मुली केवळ दु:स्वप्नासारखे सगळे नासून जाते. मागे उरतात जीव जाळणाऱ्या आठवणींचे अवशेष!
संपूर्ण पुस्तकात अतिशय उत्तमरित्या जमून आलेला हा लेख. अतिशय जिव्हाळ्याचा अशासाठीही वाटतो, की त्यातील मुख्य व्यक्तिरेखा आपल्याही जिव्हाळ्याची असते. वडील, गुरू, कोरडेपणाने वळवलेली पाठ लेखिकेला शतश: विदीर्ण करून टाकते, ‘‘यार की कोई खबर लाता नही’ मध्ये.
‘कोलाज’मध्ये आयुष्याच्या बदलत्या परिस्थितीपायी संपलेली चित्रकला वार्प बंधनं तोडून मोकळं झाल्यानंतर परत हातातून उतलेली ती जादू! या सर्व प्रवासात भेटलेला एक मनस्वी चित्रकार, या सर्वांची कहाणी आहे, नेहमीच्याच गूढ, चित्रमय भाषेत सांगितलेली!
‘१२-अे’, ‘रेशम’मध्ये घरातल्या पोरीला घेऊन फ्लॅटकरीता वणवणारी लेखिका, मंत्रालयात घातलेल्या खेपा, तिथे झालेली कुतरओढ, बिल्डरने केलेली फसवणूक आणि शेवटी अनंत ओढाताणीनंतर मिळालेले घर व झालेला प्रचंड आनंद यांची काहणी येते. अनेक ठिकाणी श्वास रोखायला लावणारा असा हा लेख आहे. शेवटच्या ‘पत्ता हरवलेले घर’ मध्ये मात्र एक कहाणी आहे. मॉनची. झोपडपट्टीची पार्श्वभूमी असलेली. अनेक माणसं. त्यांच्या अनेक कहाण्या. प्रत्येक जण परिस्थितीच्या, काळाच्या हातातलं खेळणं! शरणागत! अन् शेवटची शरणागत... शशी आपल्या माणसाला विकृतीच्या आहारी जाताना पाहणारी!
सुरेख रेखाचित्रांनी सजवलेलं हे पुस्तक वाचताना मनाला आणखी एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे लेखिका, तिची आई, बहिणी या सर्वांनी परिस्थितीचे प्रचंड तडाखे सहन केले. त्यांच्या संसाराची वाताहत झाली. नवनवीन आसरे शोधण्यात आयुष्यातली बरीच शक्ती खर्च झाली. हे पुस्तक या सर्व आसऱ्यांचे असले, तरी झालेल्या त्या अन्यायाबद्दल कुठेही चकार शब्द काढलेला नाही. प्रसिद्धीचे माध्यम हातात आहे, म्हणून कुठेही सहानुभूतीची भीक मागितलेली नाही. दयेसाठी गळा काढलेला नाही. संयमपूर्ण विवेकाने मागील सर्व विषयांचे दफन केले आहे. अत्यंत गरजेचे तेवढे तेही पुसटसे उल्लेख करून सोडून दिले आहेत. अत्यंत वाचनीय असे हे पुस्तक आहे.
-सौ. अंजली आमोणकर
- DAINIK LOKSATTA 18-05-2003
शाश्वताच्या शोधाचं हितगुज...
‘‘भारतीय स्त्रीला चौथा कमरा कधीच मिळत नाही. पाहिला कमरा पुरुष मंडळींच्या बैठकीचा, दुसरा रसोई पकवण्याचा आणि तिसरा नवऱ्याची शेज सजवण्याचा. आपल्या देशातल्या स्त्रीला स्वत:चा हक्काचा एखादा लहानसा कोपरा असतोच कुठे?- अमृता प्रीतम.
‘‘बंजाऱ्याचं घर’’च्या मनोगतात वरील वाक्यं उद्धृत केलेली आहेत. या चौकटीत राहूनच आपल्यापुरता स्वतंत्र असा अवकाशाचा तुकडा मिळवण्याची लेखिकेची धडपड म्हणजे प्रस्तुत ललित लेखंचा संग्रह. भर तापलेल्या दुपारी एकांड्या पक्ष्याचं चिवचिवणं आणि त्याला कुणी ओ देत असेल का? या प्रश्नातून प्रत्ययाला येणारी लेखिकेची संवेदनशील संपूर्ण पुस्तकभर जाणवत आहे.
ललित लेखांचा संग्रह असं या पुस्तकाला म्हटलं आहे. ललित लेख आणि कथा यातल्या सीमारेषा किती पुसट आहेत. याचीच जाणीव ‘बंजाऱ्याचं घर’ वाचताना येते. एखाद्या विशिष्ट प्रसंगात, एखाद्या घटनेमुळे, कुण्या व्यक्तीला बघितल्यानंतर मनात उठणारे तरंग असं ललित लेखाचं वर्णन करता येईल. कथा त्या विचारांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या विषयाचा भूतकाळ सांगते. त्याच्याशी संबंधित व्यक्तींच्या मनातली भावनांची आंदोलनं दाखवते. ‘बंजाऱ्याचं घर’मधलं प्रत्येक प्रकरण ललित लेख आणि कथा यांच्यामध्ये रेंगाळतं- नुकत्याच वयात येणाऱ्या पोरीला ओटीवर काय चाललंय याची उत्सुकताही असावी आणि तिथं पुरुष मंडळींसमोर जायची लाजही वाटावी, तसंच काहीसं लेख आणि कथांमध्ये पण कथेच्या उंबरठ्यावर घोटाळणारं हे लेखन झालं आहे. ललित याचा अर्थ मोहक, सुंदर. हे लालित्य बंजाऱ्याच्या घरात ठासून भरलं आहे.
यातला प्रत्येक लेख म्हणजे एकेका घराची कथा आहे. घर आणि घरात राहणारी माणंस एकमेकांत इतकी मिसळून गेली आहेत! कित्येकदा त्या वास्तूलाच एखाद्या जीर्ण पण प्रेमळ आजोबांचं रूप प्राप्त होतं. लेखिकेला घर नावाची केवळ दगडविटांच्या भिंतीचं मकान अभिप्रेत नाही, तर घरात अनुस्यूत असणारा जिव्हाळा आणि आधार ती शोधते आहे. यात गोवा किंवा कोबाडचे प्रशस्त वाडे आहेत, एखाद्या झोपडपट्टीतली चिमुकली खोलीही आहे. त्या खोलीतला अंधार कलाकाराच्या कुंचल्यानं उजळून निघालाय. घर घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या यातायातीचंही मनाचा वेध घेणारं चित्रण यात आहे.
ही सारं घरं आपलीशी वाटणारी, तरीही इथून उठून परकेपणानं कधी तरी दूर जायला लागलेलं. काही ऋणानुबंध असेच असतात- मोजक्याच क्षणांचे पण तेवढ्यापुरता सारा अवकाश व्यापून टाकणारे.
‘बंजाऱ्याचे घर’ हे शीर्षक म्हणूनही अन्वयार्थक ठरणारं. स्त्रीला आपलं स्वत:चं घर सापडतं का? आधी वडिलांचं मग नवऱ्याचं, नंतर कदाचित मुलाचं. प्रत्येक ठिकाणी जीव लावावा आणि रमवावा लागतोच. त्यातही गरजा थोड्या वेगळ्या असल्या तर... तर हीही घरं वाट्याला येत नाहीत किंवा आलेली सोडून द्यावी लागतात. बाईचा जन्म म्हणून पाचवीला पूजलेल्या या ‘बंजारा’ पणाचा आणि त्यातही शाश्वताचा आधार शोधू पाहणाऱ्या स्त्रीत्त्वाच्या या संवेदनशील कथा आहेत.