Krrish Patil
विजयनगर साम्राज्य म्हणजे भारतीय हिंदू संस्कृतीचा,हिंदवी स्वराज्य स्थापनेचा महोन्नत महामेरू म्हणून ओळखले जाते. धर्म, संस्कृती, नृत्य, नाट्य, साहित्य, संगीत या संदर्भांत या साम्राज्याचे फार मोठे योगदान आहे. या साम्राज्याच्या इतिहासातील सर्व सम्राटात कृष्णदेवराय हा अतुलनीय असा सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरची सेना दिग्विजयी गणली गेली. श्री चैतन्य महाप्रभू, वल्लभाचार्य, संत कनकदास, संत पुरंदरदास आदी सत्पुरुषांना त्याने सन्मानित केले. प्रख्यात मध्वाचार्य श्री व्यासतीर्थ हे त्याचे गुरू होते. कृष्णदेवराय हा केवळ लष्करी बाण्याचा सम्राट नव्हता, तो लोकहितदक्ष राजाही होता. त्याने आपल्या प्रजेच्या सुखासाठी, लोकहितासाठी अनेक कामे केली. त्याच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्याविषयी तत्कालीन परकीय पोर्तुगीज प्रवाशांच्या वृत्तांतातून विश्वसनीय माहिती व तपशील उपलब्ध झाले आहेत. या प्रवाशांनी विजयनगरला भेट देऊन तेथे काही दिवस वास्तव्य केले होते. तसेच कृष्णदेवरायाने खोदलेल्या शिलालेखातूनही त्याच्या कार्याची माहिती मिळते. विजयनगरपासून बेळगाव, गोवा, कटक ते श्रीलंकेपर्यंत त्याने राज्य केले. कन्नड, तेलुगु, तमिळ, संस्कृत या विविध भाषांतून त्याचे मनोज्ञ असे ग्रंथलेखन केले. आंध्रचा भोजराजा म्हणून त्याची ख्याती सर्वदूर दरवळली होती. त्याच्या दरबारात महान असे अष्टदिग्गज कवी होते. तेलुगु कालिदास म्हणून सर्वश्रुत असलेल्या श्रीनाथ कवीची त्याने सुवर्णतुला केली. अवघ्या एकोणीस वर्षांच्या कारकिर्दीत त्याने तिसाहून अधिक लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या. त्याने लिहिलेल्या अमुक्तमाल्यदा या काव्यग्रंथाची गणना तेलुगूतल्या सर्वश्रेष्ठ अशा पंचकाव्यात होते. शस्त्र आणि शास्त्र यांच्यावर अभूतपूर्व हुकमत गाजवणारा असा दुसरा सम्राट झाला नाही.
Manjusha Thatte Joglekarमधल्या काळात ही कादंबरी वाचून झाली आणि खरं सांगते मन फार विषण्ण झालं...
काही काळ मनात एक प्रकारची पोकळी तयार झाली. काय हे, एवढ्या मोठ्या, दिग्विजयी साम्राज्याची ही अशी अवस्था व्हावी !
हा सम्राट श्रीकृष्णदेवराय स्वतः एक धर्मात्मा राजा होता. तो सम्राट असताना धर्माची पताका अतिशय उंच रोवली गेली होती, शिवाय तो एक साहित्यिक होता. अत्युत्तम कवी, उत्तम वादक होता. कानडी, तेलगू, तामिळ, संस्कृत या भाषांमध्ये याने लिहिलेले ग्रंथ आहेत. संगीत, साहित्य, नृत्य, संस्कृती, नाट्य, तसेच धर्म म्हणजेच शस्त्र आणि शास्त्र यांचा उत्तम असा हा जाणकार होता. या सगळ्या क्षेत्रांत याचं अतुलनीय योगदान आहे.
अतिशय उत्तम शासक असणार्या या राजाच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी आज कुठल्या अवस्थेत आहे, हे सर्वांना माहीत आहे. का घडावं असं ! या विचारांनी मन दुःखी झालं होतं. पण आज हंपी मुस्लिम अतिरेक्यांच्या राजवटीत नाही आणि आपण काळाच्या ओघात खूप पुढे आलो आहोत असा विचार करून मनाला समजावलं.
एक कलाकार कोमल मनाचा, भावनाशील असतो आणि भावनेच्या भरात तो खूप वेळा अतिशय नाजूक क्षणी चुकीचे निर्णय घेतो. हा सम्राट जो एक कलाकारही होता, याच्या बाबतीतही हेच घडलं आणि ज्यावेळी आपली चूक त्याला समजली, तेव्हा त्याला बसलेल्या प्रचंड धक्क्यातून हा सम्राट कधी सावरूच शकला नाही. आणि तिथेच हा सम्राट आणि त्या बरोबरीने त्याचं विजयनगर साम्राज्यही लयाला गेलं.
आज हंपी आपल्यासमोर आहे...
Dilip Moghekar Very well book.I Read it
Kaushik Lele विजयनगरचं साम्राज्य हे भारतीय इतिहासातलं सुवर्णपान. हरिहर-बुक्क या बंधुद्वयांनी मुसलमानी आक्रमणाला विरोध करत हिंदूधर्मीयांचं स्वतंत्र राज्य स्थापन केलं. त्या पुढच्या राजांनी त्याला साम्राज्याचं स्वरूप आणलं. या साम्राज्याच्या भौगोलिक सीमा रुंदावण्याचं आणि त्याला समृद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवण्याचं काम केलं ते कर्तृत्ववान राजा कृष्णदेवराय याने. हे पुस्तक या कृष्णदेवरायाचं हे कादंबरीमय चरित्र आहे.
हा राजा होता तरी कसा, हे थोडक्यात सांगतो म्हणजे हे चरित्र वाचण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागून राहील.
आपल्या एकोणीस वर्षाच्या कारकिर्दीत राजाने राज्याच्या सीमा संपूर्ण दक्षिण भारतभर आणि श्रीलंकेतही पोचवल्या. कटक प्रांतही त्याने जिंकलेला.आदिलशहाचा पराभव करून रायचूर प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्याच्या या पराक्रमामुळेच आदिलशहा, कुतुबशहा, निजामशहा यांच्या दक्षिण भारतातल्या विस्ताराला आळा बसला होता.
पण तो नुस्ता साम्राज्यवादी नव्हता तर उत्तम प्रजापालक होता. शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरोवर, कालवे बांधणे; सारा वसुलीमधला अन्याय दूर करणे याबाबत तो जागरूक होता.
साहित्य, संगीत,कला यांना त्याने उदार राजाश्रय दिला. कन्नड, तेलुगू, तमिळ आणि संस्कृत भाषेतले कितीतरी कवी त्याच्या राजदरबारी होते. "अष्टदिग्गजलु" अशी उपाधी असणारे आठ तेलुगू महाकवी राजाच्या दरबारी होते. राजा बहुभाषिक, रसिक आणि स्वतः कवी होता. कन्नड असूनही "अमुक्त माल्यदा" हे मधुराभक्तीवर आधारित तेलुगू महाकाव्य कृष्णदेवरायाने लिहिले ज्याची गणना तेलुगुतल्या सर्वश्रेष्ठ अशा पंचकाव्यात होते. काव्य आणि वीरता ; शस्त्र आणि शास्त्र यांचा असा मिलाफ दुर्मिळच.
त्याच्या कारकीर्दीत वेगवेगळ्या ठिकाणी अतिभव्य आणि शिल्पकलेनी नटलेली मंदिरं, गोपुरं बांधून हिंदुधर्मीयांच्या गौरवस्थानात भर टाकली गेली.
या कादंबरीत राजाच्या आगमनाची वर्दी देणारी ललकारी अशी दिलीये
श्रीमत समस्त भुवनाश्रय राजाधिराज राजपरमेश्वर
पूर्व पश्चिम दक्षिण समुद्राधीश्वर
अरि राजाराम गंडभेरुंड
यदुकुल संजात
तुळूव वंशोद्भव
नरासारायडू तनय
श्री विरुपाक्ष पद्माधारक
हिंदुधर्म प्रतिष्ठापनाचार्य
गो-ब्राह्मण प्रतिपालनाचार्य श्रीकृष्णदेवराय ...
कन्नड राज्यारमारमण बहुपराक्
कर्नाटकरत्न सिंहासनाधीश्वर बहुपराक् ...
साहित्य समारांगण सूत्रधार ...
अशा या बहुआयामी कर्तृत्ववान सम्राटाने राज्य कसं वाढवलं, अंतर्गत कालाहांचा सामना कसा केला, महाअमात्य तिम्मरसू यांच्या दक्षतेचा यात सिंहाचा वाटा कसा होता, गुरू व्यासराय आणि गुरुबंधु संत पुरंदारदास यांचं मार्गदर्शन कसं मिळालं, नातेवाईकांनी केलेल्या कपटानेच या राजाचं राजपद कसं गेलं हे सगळं वाचण्यासारखंच आहे.
चरित्राची शैली ऐतिहासिक कादंबऱ्यांना साजेशी रसाळ, ओघवती, काव्यमय आहेच. कुठेही विनाकारण प्रसंगला ताणलेलं नाहीये. योग्य ऐतिहासिक पार्श्वभूमी दिलेली आहे पण संदर्भांची चर्चा लांबवून कथेचा ओघ रोखला नाहीये.
हे पुस्तक वाचताना शिवाजी महाराज आणि कृष्णदेवराय यांची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज नाही आणि माझा इतिहासाचा अभ्यास जुजबीच आहे तरीही मला जाणवलेले काही मुद्दे असे -
कृष्णदेवरायाला साम्राज्य आयते मिळाले होते; शिवाजी महाराजांनी ते शून्यातून निर्माण केले. कृष्णदेवरायाने साहित्य-संगीत-कला इ. ना उदार आश्रय दिला आणि त्यावर भरपूर खर्च केला. महाराजांना तितकी स्वस्थता दुर्दैवाने मिळाली नाही.
पूर्ण देशाला मुसलमानी सत्तेपासून मोकळं करून, दिल्लीपर्यंत साम्राज्य विस्तार करायची "थोरली मसलत" महाराजांचं स्वप्न होतं. पण राया मात्र दक्षिण भारतावर संतुष्ट वाटतो.
महाराज जास्त राजकारणचतुर वाटतात. इंग्रज आणि पोर्तुगीजांचा कावाही त्यांनी ओळखला होता. राया मात्र पोर्तुगीज लोकांशी मैत्री जपून होता. बंदुका, घोडे यांच्यासाठी त्यांच्यावर अवलंबून होता. गोव्यात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांकडे काणाडोळा केलेला दिसतो.
शांततेच्या काळात स्वतःची ताकद वाढवायचे प्रयत्न महाराजांनी केले. स्वतःचं आरमार बनवलं. हा राया मात्र शांततेच्या काळात नवीन युद्धतंत्रज्ञान, विज्ञान याकडे लक्ष न देता साहित्यचर्चेत त्यांना प्रोत्साहन देण्यात रममाण झाला.
राया आणि त्याची प्रजा हिंदु धर्माभिमानी असली तरी महाराजांनी प्रत्येक मावळ्यात व पूर्ण रायतेत निर्माण केलेली "हिंदवी स्वराजयाची" आस, धग मात्र वेगळीच. म्हणूनच राया पायउतार झाल्यावर काहीच वर्षांत सिंहासनाच्या लोभापायी झालेल्या सुंदोपसुंदीत साम्राजाचा अंत झाला. उलट महाराजांच्या मृत्यूनंतर गृहकलह होऊनही महाराष्ट्र पुढची २५ वर्षं औरंगजेबाला पुरून उरला. आणि पुढे पेशव्यांनी महाराजांची "थोरली मसलत" पूर्ण केली. आज साडे तीनशे वर्षांनीही "हिंदवी स्वराज्याची" धग मराठी रक्तात सळसळते आहे.
असो माझी मल्लिनाथी पुरे. महान व्यक्ती आपापल्या काळात कालानुरूप महानच असतात. त्यांचं चरीत्र वाचणं नेहमीच मार्गदर्शक असतं.
LOKPRABHA 24-7-2015विजयनगरचं साम्राज्य म्हणजे तत्कालीन वैभवाचा, कला-तत्त्वज्ञानाच्या पातळीवरचा तत्कालीन समाजाचा कळसाध्याय. त्याच्यामागे भक्कमपणे जे राजे उभे होते त्यातला एक म्हणजे सोळाव्या शतकातला कृष्णदेवराय हा राजा. त्याच्या कारकीर्दीत विजयनगर साम्राज्याची आणखीनच भरभराट झाली. त्याचे साम्राज्य कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, केरळ असे पसरलेले होते. त्यामुळे कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम या भाषांमध्ये त्याच्यावर भरपूर लिहिले गेले आहे. पण मराठीत मात्र त्याच्यावर फारसे लेखन झालेले नाही. हे लक्षात घेऊन मराठी वाचकांना कृष्णदेवरायाचा परिचय करून देण्यासाठी डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी ही कादंबरी लिहिली आहे. हा इतिहास नाही, पण इतिहासातल्या संदर्भांचा वापर करत केलेले कादंबरीलेखन आहे. ऐतिहासिक संदर्भांचा उपयोग करून घेत मांडलेले कृष्णदेवरायाचे चरित्र आहे. अल्लाउद्दिन खिलजीपासून सुरू झालेल्या मुस्लीम राजेशाहीपुढे हरिहर आणि बुक्क यांनी उभारलेल्या विजयनगरच्या साम्राज्याने आव्हान उभे केले होते. या साम्राज्यात कृष्णदेवराय एखाद्या सूर्यासारखा तळपला. त्याची तुलना इतिहासकारांनी राम, धर्म, चंद्रगुप्त मौर्य, विक्रमादित्य, पुलकेशी यांच्याशी केली आहे. ती सार्थ कशी आहे ते या कादंबरीतून जाणवते. कृष्णदेवरायाचा काळ मांडणारी ही कादंबरी वाचनीय झाली आहे.
DAINIK GOMANTAK SHABDASOHALA 16-11-2014विजयनगर साम्राज्य भारतीय हिंदुसंस्कृतीचा हिंदवी स्वराज्यस्थापनेचा ‘महोन्नत महामेरू’ म्हणून ओळखले जाते. या साम्राज्याच्या इतिहासातील सर्व सम्राटांमध्ये ‘कृष्णदेवराय’ हा दिग्विजयी सम्राट खरोखर अतुलनीय असा होता. याच सम्राटाची झळाळती जीवनागाथा डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी ‘कृष्णदेवराय’ या चरित्रात्मक ललितरम्य कादंबरीतून समर्थपणे उलगडली आहे.
अतिशय बुद्धिमान, विद्वान, तितकाच सर्जनशील प्रजाहितदक्ष तितकाच उत्तम राजकारणी चाणाक्ष शूर सेनानी असा हा राजा अर्थातच फार लोकप्रिय होता. अनेक लहानमोठ्या प्रसंगाच्या वर्णनामधून या सम्राटाची सर्व गुणवैशिष्ट्ये वाचकांसमोर आणण्यात लेखक यशस्वी ठरले आहेत.
विजयनगरपासून बेळगाव, गोवा, कटक ते श्रीलंकेपर्यंत कृष्णदेवरायने राज्य केले. श्री चैतन्य महाप्रभर, वल्लभाचार्य, संत कनकदास, संत पुरंदरदास आदी सत्पुरुषांना त्याने सन्मानित केले. काव्य-शास्त्र चर्चा हा त्याचा फार आवडीचा विषय त्यांच्या ‘भुवनविजयम’ महालात प्रतिभासंपन्न अष्टदिग्गज कवींची, पंडितांची होणारी काव्य, नाट्य, साहित्य, कला याविषयी चर्चा ऐकण्यासाठी, त्यात सहभागी होण्यासाठी दूर दूर वरून येणारे कवी, पंडित, श्रोते जन धन्य धन्य होत, सन्मानित होऊन जात! कृष्णदेवराय हे उत्तम वीणावादक होते.
आपल्या चारही राण्या आणि महालातील सर्वांनीच सुखी, आनंदी व समाधानी असावे, यावर त्यांचा कटाक्ष असे. या राण्याही काव्य-शास्त्र पारंगत होत्या. राजांच्या आगळ्या व्यक्तिमत्वावर लोभावून आणि राजकीय कारणामुळेही त्यांच्या जीवनात आलेल्या या चौघींनीही त्यांच्यावर जीव ओतून प्रेम केले व तितकेच प्रेम त्यांना राजाकडूनही लाभत राहिले.
कन्नड, तेलगू, तमीळ, संस्कृत या विविध भाषांतून कृष्णदेवरायांनी उत्तम ग्रंथलेखन केले. त्यांनी लिहिलेल्या ‘अमुक्तमाल्यदा’ या काव्यग्रंथाची गणना तेलगुतील सर्वश्रेष्ठ अशा पंचकाव्यात होते. आंध्रचा भोजराजा म्हणून त्याची ख्याती दूरवर पसरलेली होती.
अत्यंत वैभव संपन्न अशा विजयनगर साम्राज्यात शिल्पकलेचे अद्वितीय नमुने म्हणता येतील अशी सुंदर मंदिरे त्याच्या कारकिर्दीत उभारली गेली. बाजारात धान्याच्या राशी ओतून ज्याप्रमाणे विक्री होते, त्याप्रमाणे त्याच्या राज्यात हिरे-माणकांच्या राशी ओतून विक्री होत असे. अवघ्या एकोणीस वर्षांच्या कारकिर्दीत त्याने तीसहून अधिक लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या! शास्त्र आणि शस्त्र यावर अशी अभूतपूर्व हुकूमत गाजवणाऱ्या या सम्राटाची विस्तृत जीवनगाथा वाचताना अनेकवेळा आपण विस्मित होत राहतो!