- SAPTAHIK SAKAL 09-09-2006
मनोरुग्ण महिलेची कहाणी...
पारु मदन नाईक या साहित्यक्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या लेखिकेने वेगळा विषय निवडून कादंबरी लिहिली आहे. याचे कौतुक वाटते. मनोरुग्ण स्त्रीच्या जगण्याचे सहानुभूतिपूर्ण शब्दांत चित्र रेखाटणारी ही कादंबरी आहे. व्यक्तिचित्रणप्रधान असलेल्या या कादंबरीचे शीर्षक नायिकेच्या नावावर आधारित आहे. ‘मोहिनी’ हीच कादंबरीची नायिका.
मोहिनीच्या विवाहसोहळ्यापासून कादंबरीची सुरुवात होते. लेखिकेने सुरुवात कुतूहलपूर्ण पद्धतीने केली आहे. प्रसंगचित्रण, संवाद, सूक्ष्म नाट्य यांच्या मदतीने मोहिनीचे व्यक्तिचित्रण टळक होत गेले आहे. मोहिनीचे देखणे रूप, अल्लड, निष्पाप स्वभाव, इनामदार वडिलांची लाडकी लेक... ही तिची मुख्य ओळख. जवळच्या गावच्या प्रतापराव इनामदारांची लाडकी पत्नी होण्याचे भाग्यही तिला लाभते. प्रतापराव मान्यवर सतारवादक, प्रतिष्ठित घराण्यातले. यामुळे मोहिनी सुखात असते. ती स्वत: सतार शिकतेही. कालांतराने तिला दोन मुली होतात. पुढे तिसरा मुलगा होतो आणि तो चार महिन्यांचा होऊन जातो. तो धक्का मोहिनी पचवू शकत नाही. मुलाचा-रामचा मृत्यू ही घटना ती मान्यच करत नाही. येथून तिचे मनोरुग्ण म्हणून जगणे सुरू होते. त्यात लादलेले एकटेपण, हिंस्रता, इतरांना मारहाण इत्यादी प्रसंगांचा पुन्हा पुन्हा अनुभव येत राहतो. या गोष्टी सातत्याने सुरू झाल्यावर मोहिनीला औषधोपचार सुरू होतात. सुरुवातीला मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये नेऊनही मोहिनी बरी होत नाही, तेव्हा तिला काही काळानंतर येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. दरम्यान तिच्या अनावर वागण्यामुळे तिला बांधून ठेवण्याचे प्रयोग घरच्या मंडळींनी करून पाहिलेले असतात. आजारपणाचा बराच काळ असाच गेल्यामुळे ‘केस’ ‘क्रॉनिक’ झालेली असते.
येरवडा मेंटल हॉस्पिटलमधील वातावरण कादंबरीत जिवंत करण्यात लेखिकेला सर्वसाधारणपणे यश आले आहे. विविध डॉक्टर्स, विविध रुग्ण, त्या रुग्णांच्या परस्परसंबंधांची हकिगत... कादंबरीत या गोष्टींना जागा मिळाली आहे. मोहिनीचे स्पेशल वॉर्डमध्ये न रमणे, नंतर तिला मैत्रिणींची मिळणारी सोबत - या बदलांचा परिणामही सूक्ष्म रीतीने वर्णन केला आहे. तिच्या घरंदाजपणाची ओळख मिटवून टाकणारे तिचे वागणे, त्यामागील निराशा, तसेच तिला प्रेमाने भेटणारे भाऊ-भावजय या प्रसंगांचे चित्रण यात येते. पुढे द्रविडबाई या सामाजिक कार्यकर्त्या तिची केस हाताळण्यात पुढाकार घेतात. त्यांच्या प्रेमळ वागणुकीने मोहिनीत सुधारणा होत जाते. मात्र दरम्यान प्रतापरावांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. ते मोहिनीशी घटस्फोट घेतात. यामुळे मोहिनीची संसारात परत जायची स्वप्ने कोसळतात. तरीही भाऊवहिनी तिला माहेरी घेऊन जातात. मनोरुग्णाला लागणारी जिव्हाळ्याची वागणूक मोहिनीला माहेरी सर्वांकडून मिळते. तिच्या मुली, जावई, नातवंडे यांच्या भेटीचे सुखही तिला मिळत जाते. प्रतापरावही तिला आपल्या घरी न्यायला नकार देतात. त्यांचे मोहिनीवरचे प्रेम त्यांना कायमच अस्वस्थ ठेवते. ते दुसऱ्या पत्नीशीही घटस्फोट घेतात.
मोहिनीला घरी परतल्यानंतर काही दु:खद घटनांना तोंड द्यावे लागते. आईचा मृत्यू, पतीचा मृत्यू या दोन्ही घटनांना ती कमालीच्या संयमाने तोंड देते. वडिलांच्या इच्छेनुसार ती स्वत:ला अध्यात्म्याच्या विश्वात रमवते.
या कादंबरीत काही प्रसंग चांगले चित्रित झाले आहेत. रुग्णालयात मोहिनी आपल्या मोठ्या झालेल्या मुलींना भेटते, तेव्हा त्यांना ओळखत नाही. हा प्रसंग चटका लावून जातो. मोहिनीचे पती प्रतापराव, त्यांची रसिकता, सतारवादनातील कीर्ती, हळवेपणा,मुलींवरील प्रेम, मोहिनीवरील प्रेम, त्यांना सोसावे लागलेले दु:ख - यांचाही ठसा वाचकाच्या मनावर उमटतो. मोहिनीच्या भावाला निवडणुकीत यश मिळून मंत्रिपद मिळते आणि स्वप्नात आळंदीला जाऊन आलेली मोहिनी स्वप्न आणि वास्तव यातील सीमारेषा सहज ओलांडते - अशा टप्प्याशी कादंबरीचा शेवट होतो.
मनोरुग्ण व्यक्ती वास्तवाचा स्वीकार सहजी कसा करत नाही. तिच्या लेखी वेगळे वास्तव अस्तित्वात असते; बरी झाल्यावरही ही व्यक्ती काही अंशी आपल्या जगात राहणे कसे शक्य असते... इत्यादी बाबी यातून प्रकट होत जातात. मनोरुग्णांना मिळणारी वागणूक, त्यांच्यावरील ट्रीटमेंट यांचेही तपशील येतात.
या कादंबरीत काही गोष्टी सुसंगत वाटत नाहीत. २२ वर्षे एवढा मोठा कालखंड मोहिनी हॉस्पिटलमध्ये असते. तो कालखंड कादंबरीत त्यामानाने पटकन संपतो. या काळात तिला तिचे आईवडील, प्रतापराव भेटत नाहीत आणि नंतर स्वत:ला अपराधी समजतात, असे का? वास्तविक ही सर्व माणसे प्रेमळच आहे. बरी झालेली मोहिनी माहेरी परतल्यानंतर कादंबरीत काहीच नज्ञट्यपूर्ण घटना नाहीत. त्यामुळे कादंबरी अकारण पसरट होते. लेखिका वास्तुचित्रणात अजिबात रस घेत नाही. इनामदारांचा वाडा असो वा हॉस्पिटल असे, त्याचे चित्र वाचकाच्या मन:पटलावर उभे राहत नाही. लेखिकेची शैली लाडिक वळणाची आहे. ‘मोहिनी लाजली’ हे वाक्य कादंबरीत अनेकदा, मोहिनीच्या प्रौढ वयातही सतत येत राहते. तरीही पदार्पणात वेगळ्या विषयावर लेखन करायचे धाडस लेखिकेला पेलले आहे. लेखिका रणजित देसाई यांची कन्या असल्यामुळे तिच्याकडे साहित्यगुणांचा वारसा आलेला आहे. कादंबरीतील पात्रे व प्रसंग काल्पनिक असल्याचे सुरुवातीला म्हटले आहे. पण काही ठिकाणी वास्तवाचे कवडसे उमटलेले दिसतात.
- DAINIK SAKAL 08-04-2006
छिन्नमनस्कतेचा साहित्यातील मागोवा…
काही नावं, काही विषय नेहमीच लक्ष वेधून घेतात. पारू नाईक यांची कादंबरी येते आहे असं कळल्यावर असंच झालं.
पण पारू नाईक नाव लक्षात केव्हा आलं?
तपशिलात थोडं मागं-पुढं होईल, पण पारू – पारू नाईक असा उल्लेख बहुधा माधवी देसाई यांच्या बहुचर्चित ‘नाच ग घुमा’ या आत्मकथनात आला होता. रणजित देसाई यांची पहिली पत्नी सुनंदा यांच्या मुलीच्या संदर्भात हा उल्लेख होता. सुनंदा यांच्या मनाचा कोंडमारा झाल्यामुळे त्याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला, त्यांना झटके यायला लागले. तसे उपचारदेखील सुरू झाले... आणि अशा अस्वस्थ काळातच रणजित देसाई ‘स्वामी’ कादंबरीचं लेखन करीत होते. विशेषत: रमा-माधव यांच्या मुग्ध प्रेमाची कहाणी रंगवताना स्वप्न आणि वास्तव अशा विलक्षण कुतरओढीत ते जगत होते.
अशा वावटळीत वाढणारी ती पारू...
खरं तिचं नाव पार्वती. या पार्वतीचं प्रेमानं झालं पारू!
रणजित देसाई यांच्या आठवणीतदेखील कुठे कुठे पारू आलेली आहे, असं वाटतं.
मग पारू नाईक हे नाव आलं ते रणजित देसाई गेल्यानंतर. ‘स्वामी’ची जी आवृत्ती आली त्यात कॉपीराइट देसार्इंच्या दोन मुलींच्या नावावर आहे. त्यातली एक पारू नाईक म्हणजे रणजित देसाई यांच्या कन्येची कादंबरी येते आहे. या कादबंरीचं नाव आहे ‘मोहिनी.’ कथावस्तू आहे ‘मोहिनी’ खानदानी संस्कारांनी संपन्न असलेली स्त्री. पती प्रतापरावांसमवेत पारंपरिक संस्कार, जीवनमूल्ये जपत मनसोक्त आनंद व सुख उपभोगत असते.
मोहिनीला एकापाठोपाठ एक अशा दोन मुलीच होतात. मग इनामदारांच्या वंशाला वारस कोण? मोहिनीच्या मनात हे भय खोलवर रुजते. कारण त्यामुळे तिची प्रतिष्ठा पणाला लागते. तिच्या भावी जीवनाचे अस्तित्व त्यावर अवलंबून राहते.
बऱ्याच कालावधीनंतर तिला मुलगा होतो. मात्र तो अल्पायुषी ठरतो. त्यामुळे मोहिनी स्किझोफ्रेनियाने ग्रस्त होते. मनोरुग्ण नायिकेचे रंगरूप उलगडून दाखवणारी पारू नाईक यांची पहिलीच स्वतंत्र कलाकृती.
पारू नाईक लिखाणाला कशा उद्युक्त झाल्या, हे पाहणं कुतूहलजनक नक्कीच ठरेल. या कादंबरीतील पात्र, घटना, सर्वस्वी काल्पनिक असून, यदाकदाचित कुणाशी त्यात साम्य आढळले, तर तो योगायोग समजावा...’ असा अनेक कादंबऱ्यांमध्ये असलेला खुलासा या कादंबरीमध्ये आहे, हेही बघायला हवे. ‘स्किझोफ्रेनिया’ संबंधात ही कादंबरी आहे हेदेखील त्याचं वैशिष्ट्य म्हणायला हवं.
‘स्किझोफ्रेनिया’ हा विषय तसा आपल्याकडे दुर्लक्षित राहिला आहे. काल-परवापर्यंत अशा केसेस वेड, उन्माद, डोक्यावर परिणाम झाला, अशा कप्प्यात टाकून त्यावर इलाज होत असे. साहित्यातदेखील त्याच्या बऱ्या-वाईट खुणा सापडू शकतील.
पण ‘स्किझोफ्रेनिया’ असा नेमका उल्लेख होऊन त्याची पाहणी झाली ती ‘स्किझोफ्रेनिया’ कहाणीत.
गणेश चौधरी डांभूर्णी या जळगाव जिल्ह्यातल्या गावचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, संपन्न घराण्याचा वारसा लाभलेले आणि बी.एस्सी.पर्यंत शिक्षण झालेले. पण दुर्दैवानं असाध्य वेडाने त्यांच्या मनाचा कब्जा घेतला आणि त्यांच्या हातून पत्नीची-मुलांची हत्या घडली. तीही मुसळाने. गणेश चौधरीला फाशीची शिक्षा झाली. मग गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त काही कैद्यांना शिक्षेत माफी मिळाली. त्यात चौधरींना फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेप देण्यात आली. ही पहिलीच शोकांतिका आहे, असं म्हणता येणार नाही. अशा केसेस पूर्वीदेखील झाल्या आहेत. गणेश चौधरीच्या बाबतीत एकच गोष्ट झाली की, त्यांना काही डॉक्टर असे भेटले की, त्यांनी त्यांच्यातला माणूस जागा करण्याचा प्रयत्न केला. तसं त्यांना थोडं यशही मिळालं. चौधरींमधील सृजनशक्ती त्यामुळे जागी होऊ लागली.
पण मुळात हे सगळं का उद्भवलं?
स्वत:चं वेड खुद्द गणेश चौधरी यांनी लपवून ठेवलं. काही डॉक्टरांनीदेखील त्याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी एका असाध्य रोगाचे चौधरी बळी ठरले. त्यातून त्यांची सुटका मृत्यूनेच केली. अर्थात, या घटनेचा ताप सगळ्या चौधरी कुटुंबाला सोसावा आणि भोगावा लागणं अटळ होतं. खचलेली मनं, सामाजिक निंदानालस्ती, न्यायालयात मारावे लागणारे हेलपाटे, त्यातून होणारा खर्च याचे हादरे सगळं घर मोडून पडायला निमित्त होणं स्वाभाविक होतं. हे सगळं सोसलं आणि ही तगमग शब्दबद्ध केली ती गणेश चौधरींच्या बंधूंनी – दिवाकर चौधरींनी. ही कहाणी ‘स्किझोफ्रेनिया’ वाचकांपर्यंत पोचली हे विशेष. गणेश चौधरींना त्यामुळे सहानुभूती मिळाली. त्यामुळेच मग दिवाकर चौधरींनी ‘काचेचं मन’ हे पुस्तक धाडसाने प्रकाशकांकडे दिलं. यामध्ये गणेश चौधरींची पत्रं आहेत.
शास्त्रीय, सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक अशा गुंतागुंतीत सापडलेला गणेश चौधरी आणि त्याची मानसिक घालमेल त्यांनी विविध लोकांना लिहिलेल्या पत्रांत दिसतं. त्याचे संपादन आणि प्रस्तावना दीपक घारे यांची होती. त्यात त्यांनी नेमकं म्हटलं होतं, ‘क्षणाक्षणाला बदलणाऱ्या मनाच्या अवस्था आणि भास-भ्रम-चक्कर-वेड यांचा सतत फिरणारा पंखा हे या साऱ्याच लेखनाचं वैशिष्ट्य आहे आणि ते वाचकालाही चक्रावून टाकतं!’
‘स्किझोफ्रेनिया’च्या शेवटी लक्षात राहतो तो दिवाकर चौधरींचा आकांत...’ वादळही संपलेलं आहे; पण आहे एक प्रचंड पोकळी! तिला सामोरं कसं जावं तेच कळत नाही.
स्किझोफ्रेनिया – छिन्नमनस्कता यासंबंधातील ललित कलाकृतीचा विचार करताना अमेरिकन गणिती, नोबेल पारितोषिक विजेता जॉन वॅश यांची कर्मकहाणी सांगणारी कहाणी ‘ए ब्युटिफुल माइंड’ ही विसरता येणंच अशक्य. सिल्विया नासर यांनी जॉन वॅशची चरित कहाणी साक्षेपानं लिहिली आहे. स्किझोफ्रेनियानं त्यांचं उद्ध्वस्त झालेलं जीवन आणि यथायोग्य वेळीच उपचार झाला, तर हा रोग काबूत ठेवता येतो याचा ताळमेळ सिल्वियानं यशस्वीपणे मांडला आहे. ही कहाणी केवळ स्किझोफ्रेनिया पीडितांनाच नव्हे, तर त्यांच्या नातेवाईकांना, ते ज्या समाजात वावरतात, त्या समाजालादेखील प्रेरणादायी ठरेल. म्हणून या कादंबरीचं महत्त्व आहे. या कादंबरीचा संक्षिप्त भावानुवाद कमलिनी फडके यांनी ‘सुंदर ते मन’ नावाने केला आहे. स्किझोफ्रेनिया अवेरनेस असोसिएशन, पुणे आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांच्यातर्फे तो प्रकाशित झाला आहे, यातच या भावानुवादाचं यश अधोरेखित झालं आहे.
स्किझोफ्रेनियासंबंधात विचार करताना ‘देवराईच्या सावली’त पण विसरून चालणार नाही. अशा या मोजक्याच कलाकृती ओझरता उल्लेख करायचं कारण म्हणजे स्किझोफ्रेनियासंबंधात जेवढं ललित लेखन झालं आहे हे पुरुषकेंद्री झालेलं आहे. स्किझोफ्रेनिया ही केवळ पुरुषालाच होणारी व्याधी आहे काय? निश्चितच नाही; पण तसं चित्रण का झालं नाही? ‘मोहिनी’चं वेगळेपण इथंच आहे. खुद्द लेखिका पारू नाईक यांनी ते जीवन जवळून अनुभवलं आहे. साहजिकच त्या खाणाखुणा ‘मोहिनी’च सापडतीलच.
‘मोहिनी’ची मोहिनी ही अशी आहे. आपण त्याची वाट पाहू या. मोहिनीचे वेगळेपण म्हणून राहणार आहे.
-रविप्रकाश कुलकर्णी
- DAINIK TARUN BHARAT 18-06-2006
‘हृदयस्पर्शी मोहिनी’...
जीवनसत्याचे कलापूर्ण आविष्करण करून जीवनदर्शन घडविणारा कादंबरी हा आकृतीबंध पारू मदन नाईक यांनी आपल्या ‘मोहिनी’ कादंबरीत यशस्वीरित्या हाताळला आहे. मोहिनीच्या जीवनावर बेतलेली ही कादंबरी! एका सरळ मनाच्या, निष्पाप, लावण्यवतीच्या भावसौंदर्याचे सौहार्दाने केलेले हे चित्रण! खानदानी कुटुंबात जन्म- संस्कार व प्रेम प्राप्त करून, विवाहानंतर पतीच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी जाणाऱ्या व प्रेमाची प्रसन्न पखरण करणाऱ्या युवतीचे मनाचे विलोभनीय चित्र लेखिकेने ‘मोहिनीत’ शब्दांकित केले आहे. सासर-माहेरच्या नातेसंबंधातील जिव्हाळा, स्नेहस्निग्ध-वात्सल्यपूर्ण-उत्कट प्रेम या कादंबरीत आलेखित होते. परंतु मनोरुग्ण अवस्थेतील नायिकेच्या भावशून्य व भावपूर्ण अनुभवविश्वाचे सूक्ष्म- सखोल व तपशीलात्मक चित्रण या कादंबरीचे बलस्थान ठरते. कारुण्याच्या काजळरेषांतून प्रकर्षाने व प्रभावीपणे प्रस्फुटित होत राहते ती पती-पत्नीच्या प्रेमातील रमणीयता व परिचित आणि कुटुंबीयातील स्नेहबंधांची मधुरता. नियतीच्या आघाताने पती-पत्नीतील जीवनात निर्माण झालेला विरह त्यांच्या परस्परांवरील उत्कट प्रेमासमवेत उदातत्तेचा पारदर्शी आंतरिक पदरही प्रकट करतो. मनोरुग्णांच्या मानसिकतेचे त्यांच्यातील मूलभूत सत्प्रवृत्ती– सद्विचारांच्या आवर्तनांचे आगळे-वेगळे रेखांकन ‘मोहिनी’त प्रत्ययाला येते. नियतीच्या दुर्दैवी फटकाऱ्यांनी होरपळून निघालेली व आपल्या अस्थिर-असुरक्षित जीवनक्षणांची नोंद करणारी ‘मोहिनी’ची जीवनगाथा शृंगार व करुणरसात भिजली आहे.
विवाहघटनेमुळे दोन खानदानी कुटुंबांच्या जुळणाऱ्या व दृढ होणाऱ्या नातेसंबंधांचे चित्रण जसे या कादंबरीत आकारते तसेच त्या त्या कुटुंबात वावरणाऱ्या नोकरांचे, परिचितांचे, मित्रांचे, हितचिंतकांचे व्यक्तिचित्रणही लेखिका अशी कौशल्याने करते की त्यातून ती ती व्यक्तिमत्त्वे उमलत जातात. खेळकर, सहजस्वाभाविक प्रेमप्रसंगांचे आलेखन नायक-नायिकेच्या मनातील प्रेम पैलूंना गडद व मनोरम करते तसेच कादंबरीचा सूर घनगंभीर करते. पिता, पती, भावंडे, भावजया, द्रविडबाई, मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर पडलेल्या मैत्रिणी यांची भावनिक उंची अशा स्तरावरची की जिथं स्वार्थाचा गंध नाही परंतु आनंदाचा निर्मळ खळाळ आहे. नायिकेच्या लज्जाशील, मुग्ध हावभावांचे, हालचालींचे हळूवार भावस्पर्शी रेखाटन लेखिकेने जसे केले आहे तसेच मनोरुग्ण अवस्थेतील प्रक्षुब्ध, क्रौर्य व क्रोधाने परिपूर्ण भावावेगांचे, शारीरिक हालचालींचे प्रत्ययकारी रेखाटन लेखिका या कादंबरीत करते. परस्परविरोधी भावावेग, जाणिवा, संवेदना, शारीरिक क्रिया यांच्या ताण्याबाण्यातून नायिकेचे व्यक्तिमत्त्व असे साकारते की वाचकांकडून तिला सहानुभूतीचा ओलावाच मिळावा. परस्परविरोधी भावस्पंदने व तद् नुषंगिक क्रिया दर्शविताना लेखिकेने साधलेला समतोल कौतुकास्पद असून नायिकेच्या व्यक्तिमत्त्वाची उंची ढासळू देत नाही.
दोन जीवांतील निर्मळ प्रेमाचे व भावावेगांचे गडद चित्र रेखाटणारी ‘मोहिनी’ कादंबरी नाट्याने परिपूर्ण असूनही संघर्षाच्या स्थूल– ठळक रेषा– बिंदू क्वचितच रेखाटते. परंतु नियतीच्या क्रूर आघातामुळे निर्माण झालेला परिस्थितीशी टक्कर देताना व्यक्तिमनात आकारणारा संघर्ष कादंबरीच्या केंद्रस्थानी आपले अस्तित्व राखत अत्यंत टोकदार होतो. व्यथा-वेदनेचे, कारुण्याचे स्रोत आंतरमनात झरते ठेवून प्रेमाचे उदात्त रूप चित्रीत करतो.
अनलंकृत, प्रासादिक सरस भाषाशैली, घरंदाज वातावरणातील आदब-प्रसन्नता विवाह समारंभात विविध प्रसंगी गायिल्या जाणाऱ्या गीतांचे आयोजन करून निर्माण केलेले औचित्य, रीतीरिवाज दर्शविणारे कौटुंबिक वातावरण, मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमधील वातावरण, चित्रदर्शी शब्दशैली या कादंबरीची लक्षणीय गुणवैशिष्ट्ये म्हणता येतील. मनोरुग्णांच्या मानसिकतेचा आंतरिक जिव्हाळ्यानं घेतलेला वेध मनोज्ञ असून मनोरुग्णाच्या मनोवस्थेतील भावनिक चढ उतारांचे नेमकेपणाने केलेले रेखांकन लेखिकेच्या सुजाण व संवेदनशील मनाची साक्ष देणारे आहे. रणजित देसार्इंच्या साहित्यिक गुणांचा वारसा जपत स्वतंत्र प्रतिभाशक्तीतून साकारलेली ‘मोहिनी’ क्वचित कुठे ‘स्वामी’ व ‘श्रीमान योगी’ ची आठवण करून देते. एकंदरीत नाट्यपूर्ण, हळूवार भावांदोलनांनी सजलेली ‘मोहिनी’ वाचकांवर मोहिनी घालणारी आहे.
- DAINIK AIKYA 06-08-2006
खिळवून ठेवणारी ‘मोहिनी’…
मनोरुग्ण स्त्रीची कहाणी कादंबरीतून मांडण्याचे मोठे आव्हान पारू मदन नाईक यांनी समर्थपणे पेलले आहे. या कादंबरीत लेखिकेने या नायिकेचे विश्व ज्या पद्धतीने मांडले आहे, ते पाहता नाईक यांची ही पहिलीच कादंबरी आहे यावर विश्वास बसणार नाही.
मोहिनी ही या कादंबरीची नायिका. एका सुखवस्तू इनामदाराची पत्नी. दोन्ही सरकार घराणी असल्यामुळे परंपरागत इनामदारी संस्कारात ती वाढली आहे. खानदानी मोहिनीचा विवाह प्रतापराव या संगीतप्रेमी सतारवादकाशी होतो. मोहिनीलाही ते सतारवादन शिकवतात. त्यांचे आयुष्य सुखाचे सुरू होते. मोहिनीला दोन मुलीच होतात. त्यामुळे वंशाला ‘वारस’ मिळावा यासाठी हे इनामदार दापत्यं झुरत असतात. मोहिनी पुत्रप्राप्तीसाठी वेडीपिशी झालेली आहे. आपली प्रतिष्ठा, भावी जीवनाचे अस्तित्व इनामदार घराण्याचा वंशवेल पुढे वाढावा यावर अवलंबून आहे, अशा भयगंडात मोहिनी जगत असते. त्यासाठी तिचे देवदेवतांना नवस-उपास, तापास सुरूच असतात.
अखेर थोड्याफार उशिरानेच तिला दिवस जातात आणि अपेक्षेप्रमाणे गुटगुटीत मुलगा होतो. मोहिनीच्या आनंदाला पारावार राहता नाही. पण चार महिन्यातच या मुलाचा अकल्पित मृत्यू होतो. मोहिनीचे सारे भावविश्वच हादरते. तिच्या आईवेड्या मनावर याचा गंभीर परिणाम होतो. तिला वेडाच झटके येतात. मोहिनीच्या अशा वागण्यामुळे सासर-माहेर उद्ध्वस्त होते. निष्पाप भोळ्या भावनाशील मोहिनीला ‘स्क्रिझोफोलिया’ या दुर्धर रोगाने पछाडले. अधूनमधून त्याचे झटके तिला येतात, तेव्हा ती हिंस्त्र बनते. घरातील सारेजण तिच्या अशा या वागण्यामुळे घाबरून गेलेले असतात. मोहिनीच्या सासर-माहेराकडील घरचे वातावरण पूर्ण बदलून जाते. दोन्ही घरातील भावभावनांचा कल्लोळ लेखिकेने या कादंबरीतून अचूक मांडला आहे. मोहिनीचे आई-वडील, बहीण-भाऊ, मुलं, नोकर-चाकर, सासू-सासरे, पती यांच्या वागण्यात बोलण्यात हळूहळू अंतर पडू लागते. बदललेल्या वातावरणाचा गंभीर परिणाम मोहिनीवर पडत असतोच. शेवटी तिला मनोरुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात येतो.
लेखिकेने मोहिनीच्या मनोरुग्णालयातील वास्तवाचे एक वेगळे विश्व या कादंबरीतून उलगडलेले आहे. मोहिनीने या रुग्णालयात एक-दोन नव्हे तर उणीपुरी एकवीस वर्षे काढली. शॉक ट्रिटमेंट, इतर रुग्णांचे वागणे, घरापासून दूर, अनोळखी लोकांमध्ये मोहिनीने काढलेले हे वेगळे आयुष्य वाचले तर तिच्याबद्दल आपुलकी वाटायला लागते. या काळात मोहिनीने स्वत:चे गोकुळ या रुग्णालयात निर्माण केलेले असते. या संपूर्ण काळात ती घरच्यांना विसरलेली नकळत आपण त्यांच्यातले असूनही ते घर आपल्याला मिळू शकणार नाही ही तिला जाणीव आहे. या साऱ्या प्रवासात ती आपल्या मुला-मुलींना विसरलेली नाही. तो अजूनही जिवंतच आहे, या भ्रमात ती जगत असत. पती प्रतापराव अशा काळातच तिच्याशी घटस्फोट घेतात आणि दुसरा विवाह करतात. मोहिनी हतबल होते. तिने ज्या विश्वासाने आपले रुग्णालयातील आयुष्य सुरू केलेले असते, त्यालाच तडा जातो. मोहिनीचे आई-वडिल, माहेरची सारी माणसे हताश होतात. मोहिनी हा आघात हळूहळू पचवते. लेखिकेने मोहिनीचे वागणे, तिच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे केलेले वर्णन अप्रतिम आहे. मोहिनीविषयीचा लळा, प्रेम, जिव्हाळा या साऱ्यांचे वर्णन लेखिकेने या कादंबरीतून जिवंत केले आहे. रुग्णालयातून बरे होऊन माहेरच्या घरी येण्याचा प्रसंग भावपूर्ण आहे. मोहिनीची सवत, मोहिनीच्या दोन्ही मुली, त्यांचे पती, नातू या साऱ्या नातेसंबंधात मोहिनी पुन्हा गुरफटते. या काळातही मोहिनी आपल्या पतीला विसरलेली नाही. घटस्फोटानंतरही ती प्रतापरावांवर प्रेम करत असते. प्रतापरावही केवळ वृद्धावस्थेतील सोबत म्हणूनच दुसरा विवाह करतात, पण त्याचे पहिले प्रेम मोहिनीच असते. या काळात प्रतापरावांचाही मृत्यू होतो, तेव्हा मोहिनीवर दुसरा आघात होतो. या धक्क्यातून ती सावरते. वडिलाच्या मायेच्या सावलीत आपले उर्वरित आयुष्य घालवणाऱ्या मोहिनीवर तिच्या वडिलांच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा आघात होतो. पण मोहिनी आघातावर आघात झेलूनही आता संयमी बनलेली आहे. संवाद हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. वेगळा व गंभीर विषय हाताळताना लेखिकेने या कादंबरीची गती कमी होऊ दिलेली नाही. गंभीर प्रसंगातून एका मनोरुग्ण स्त्रीचे जीणे उलगडून दाखवलेले आहे. मनोरुग्ण होण्यापूर्वीचा काळ, प्रत्यक्ष मनोरुग्णाचा काळ, त्यातून सावरलेली नायिका, तिचे पूर्ण बरे होणे, त्यानंतर सातत्याने होणारे आघात झेलत जगणाऱ्या नायिकेला हा प्रवास वाचनीय झाला आहे.
-संदीप आडनाईक
- DAINIK LOKSATTA 09-04-2006
मनोरुग्णाची मानसिकता सांगणारी ‘मोहिनी’…
स्किझोफ्रेनिया हा कायमस्वरूपी आजार नाही. हे आता वेगवेगळ्या माध्यमांतून स्पष्ट होऊ लागले आहे. असे असतानाही स्किझोफ्रेनियासारखा आजार झालेले रुग्ण कालांतराने बरे होतात तरी समाज किंवा त्यांचे कुटुंबीय त्यांना पुन्हा आपले म्हणून स्वीकारत नाहीत. यामुळे अनेक मनोरुग्ण बरे झाल्यावरही इस्पितळामध्येच आपल्या चांगल्या आयुष्याच्या प्रतीक्षेत तिष्ठत राहतात. स्किझोफ्रेनिया आजारातून बरे झालेल्या रुग्णांना समाजाने पुन्हा स्वीकारले तर ते रुग्ण सर्वसामान्य आयुष्य पूर्वीसारखेच जगू शकतात हे पटवून देण्यासाठीच पारू मदन नाईक यांनी ‘मोहिनी’ ही कादंबरी लिहिली आहे. एका अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या जीवनावरील ‘मोहिनी’ ही कथा त्यांनी रेखाटली आहे. एका ज्येष्ठ साहित्यिकाच्या घरात ही घटना घडली आहे. आपला सहा महिन्यांचा मुलगा अकस्मात मरण पावतो, ही घटना त्या मुलाच्या आईची मानसिकता पार कोलमडून टाकते आणि त्यातूनच ती मनोरुग्ण बनते.
त्या महिलेला मानसिक आजारातून बाहेर काढण्यासाठी तिच्या नवऱ्यासह अनेकजण प्रयत्न करतात, पण त्या मानसिक धक्क्यातून ती बाहेर पडत नाही. अखेर तिला पुण्याच्या वेड्याच्या इस्पितळात दाखल केले जाते. तब्बल २२ वर्षे ती महिला त्या इस्पितळात उपचार घेते आणि पूर्ण बरी होते. दरम्यान प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला तिचा पती दुसरा विवाह करतो. तिच्या दोन मुली मोठ्या होतात. माहेरी तिचे भाऊ मोठे होतात. वेगवेगळ्या क्षेत्रात ते स्थिरावतात. मात्र त्या महिलेल्या आठवणीत आपल्या लहान मुलीच असतात. नवरा अद्यापही आपलाच आहे, याच आठवणीत ती असते. आपली बहीण आता बरी होत आहे, हे कळताच त्या महिलेचे भाऊ तिला घरी घेऊन येतात. त्यांच्या पत्नीदेखील आपल्या नणंदेचे स्वागत करतात.
सर्वसामान्य माणसारखे आयुष्य ती महिला जगू लागते. मात्र आपल्या दोन्ही मुलींना ती ओळखू शकत नाही. आपल्या मुली अद्यापही लहान आहेत. याच कल्पनेत ती वावरत असते. हळूहळू ती पूर्ववत हिंडू फिरू लागते. दरम्यान तिच्या पतीचे निधन होते. असे असूनही ती मानसिकदृष्ट्या खचत नाही. आपल्या भावंडांच्या मुलींच्या कुटुंबात ती सहज रमते, याचे मुख्य कारण तिला त्या सर्वांनी स्वीकारले होते. आपण आता पूर्वीसाखे जगू शकतो, हा आत्मविश्वास तिच्यामध्ये आला होता.
असाच आत्मविश्वास बरे झालेल्या आणखीही बरे झालेल्या आणखीही अनेक मनोरुग्णांना मिळावा हीच अपेक्षा लेखिका पारू नाईक यांची आहे. त्यांनी लिहिलेली ही पहिलीच कादंबरी आहे. कै. रणजीत देसाई यांची कन्या असल्याने पारू नाईक यांना कादंबरी लिखाणाचे बाळकडू मिळाले आहे. तरी ही कादंबरी नवोदित लेखिकेने लिहिली असल्याचे लगेच लक्षात येते. कादंबरी लिहिताना तिची मांडणी काहीशी विस्कळीत स्वरूपात झाली आहे. इस्पितळातील वातावरण असो किंवा परत कुटुंबात आल्यावर त्या महिलेची तसेच तिच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची मानसिकता ही केवळ संवादातून स्पष्ट होऊ शकत नाही. त्यासाठी अधिक सखोल लिखाणाची आवश्यकता आहे. जवळच्या नातेवाईकाच्या जीवनावर लिखाण करताना लागणारी तटस्थ भूमिका अनेकदा सुटल्यासारखी जाणवते आणि कादंबरीची नायिका आणि लेखिका यांच्यातील नाते उघड होण्याच्या भीतीने लेखिकेने काही प्रसंग घाईने संपवल्यासारखे वाटतात. असे असले तरी ‘मोहिनी’ कादंबरी लिहिण्यामागील लेखिकेची भावना पारदर्शक असल्याने ती वाचकांना निश्चितच आवडेल.
-प्रसाद मोकाशी