नंदकिशोर कि. उमक‘मंत्र श्रीमंतीचा’ हे पुस्तक खूपच आकर्षक झाले आहे. त्यातील अक्षरही खूपच सुंदर आहे.
तसेच टाइपही स्पष्ट समजेल असाच आहे. आपणास असंख्य शुभेच्छा.
SAPTAHIK SAKAL 23-07-2005शून्यातून यशाचा किनारा गाठण्यासाठी...
इंग्रजीत ‘हाऊ टू डू इट’ पुस्तकांची नेहमीच चली असते. त्यातला दादा माणूस म्हणजे डेल कार्नेजी. त्याची ‘हाऊ टु विन् फ्रेंड्स अँड एनफ्ल्यूयन्स पीपल’ किंवा ‘हाऊ टू स्टॉप वरीइंग’ ही पुस्तके शेक्सपिअरच्या नाटकाइतकीच लोकप्रिय आहेत. त्यातच पोहणे, क्रिकेट, बुद्धिबळ वगैरे शिकविणारी अनेक खेळ वा व्यवसायांची पुस्तकं सारखी प्रसिद्ध होत असतात. मराठीतही शेअर बाजार, संगणकापासून ‘मजेत जगावं कसं’ यांसारख्या पुस्तकांस कथा-कादंबऱ्यांपेक्षा अधिक मागणी आहे. आध्यात्मिक विषयावरच्या पुस्तकांचीही चलती आहे. श्याम भुर्के यांचं ‘मंत्र श्रीमंतीचा’ हे त्यातलंच एक पुस्तक. ते मूळचे कॉमर्सचे अभ्यासक; पण त्यांना साहित्य, कला, नाट्य यांचीही आवड आहे. त्यांनी त्यावर हजारभर जरी उभारण्यानं दिली. शेवटी प्रत्येकाला कुठं सांगणार, म्हणून आपल्या अनुभवांना त्यांनी चक्क कादंबरीचं स्वरूप दिलं आहे. अर्थात त्यात कादंबरीचे घटक नावालाच आहेत. धनेश्वर आणि मनोहर या दोन गुरू-शिष्य संबंधांवर आधारित दोन व्यक्तिरेखांच्या आधारे त्यांनी श्रीमंतीचं रहस्य सांगितलं आहे. अर्थात अशा पुस्तकाचं मर्यादित स्वरूप लक्षात घेऊनच हा श्रीमंत होण्याचा मंत्र प्रत्यक्षात आणायला हवा. शेवटी ‘पोहावे कसे’ वाचून काही पोहता येत नाही. त्यासाठी पाण्यातच उडी ठोकावी लागते.
मनोहर बुद्धिवंत याचे वडील अत्यंत बुद्धिवंत, पीएच. डी., एका विद्यापीठात विषय विभागप्रमुख. त्यामानाने धनेश्वर सामान्य त्यात आज ते अमाप श्रीमंतीचे धनी. ही किमया कशी घडली? त्याचे कारण आजचे शिक्षण हे कारकुनी घडविणारे आहे. त्यासाठी नोकरीच्या ‘स्कूटर रेस’मध्ये न पडता व्यवसाय केला पाहिजे. त्यासाठी अनेक वाटा आहेत. शाळेत शिकत असतानाच फटाके विकणे, स्टेशनरी शॉप चालविणे यांतून मनोहर स्वत:ची कमाई करतो. त्यातूनच धनेश्वर एकेक रहस्ये उघड करीत जातात.
यशस्वी व्हायचं असेल तर परिश्रमांना, कष्टांना पर्याय नाही, हा धनेश्वरांचा मुख्य मंत्र आहे. ‘खावी बहुतांची अंतरे’ हा दुसरा आणि दोन कारखाने चालवायचे हा तिसरा. त्यातला एक बर्फाचा नि दुसरा साखरेचा. म्हणजे डोकं थंड ठेवणं नि गोड बोलणं. यामुळेच ग्राहक राजा प्रसन्न होतो. मग गुंतवणुकीची विविध क्षेत्रं खुली होतात. त्यात बँका, मार्केटिंग, पर्यटन, ट्रेकिंग, चित्रकला वगैरे दिशा त्यांनी दाखविल्या आहेत. संगणक हा तर आज एक कल्पवृक्ष आहे.
आणखी एक म्हणजे श्रीमंत स्वत: कधीच काम करीत नाहीत. ते फारसा कर भरत नाहीत. ते पंचतारांकित हॉटेलांत पाट्याग झोडत असतात. खरं काम त्यांचे पगारी नोकर करतात. कर कमीत कमी भरावा म्हणून ते तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घेतात. त्यांच्या सगळ्या बिलांचा अंतर्भावही ते कंपनी खर्चत करून उत्पन्न व कर कमी दाखवतात. पगारदार मात्र स्वत: कर भरतात. त्यांची ओढाताण होते. श्रीमंत कधीही पैशासाठी काम करीत नाहीत. पैसाच त्यांच्यासाठी काम करतो, हे सत्य आहे.
चिकाटी, श्रम, आळसाचा अभाव हे तीन मंत्रही महत्त्वाचे. त्याच जोरावर पुढं सिंधी मारवाड्यांपुढं गेले. जेवतानाही गिऱ्हाईक आलं तर ते पाटावरून उठतील. दुपारी एक ते चार दुकानाला विश्रांती देणारा माणूस त्याला कायमच विश्रांती देतो, हे धनेश्वरांचं निरीक्षण आहे. अॅसेट्स हे नेहमीच अॅसेट्स कसे नसतात, हे त्यांनी एका स्वतंत्र प्रकरणात नफा-तोटा, ताळेबंद, बॅलन्सशीट यांच्या उदाहरणांनी स्पष्ट केलं आहे. श्रीमंत पैसा मिळविण्यासाठी संपत्ती खर्च करतात. गरीब फक्त खर्चच करतात. मध्यमवर्गीय जी संपत्ती समजून खरेदी करतात ती अखेर लायबिलिटी ठरते. ती कशी टाळावी, हेही लेखकानं सांगितलं आहे.
व्यवसायाला चिंतन, मनन याप्रमाणेच वाचनाची ही गरज आहे. त्यासाठी शंतनुराव किर्लोस्कर, टाटा कुटुंबीय, कॅमलचे दांडेकर, कल्याणी पगडीचं आत्मकथन, सिपोरेक्सचे बाबूराव शिर्के, तसेच अनेक पाश्चात्त्य यशस्वी उद्योगपतींच्या पुस्तकांची लेखकाने यादी दिली आहे. अशा प्रकारे नोकरीच्या मागे लागता श्रीमंत कसं व्हावं, हे अनेक किस्से, विनोद, हकिगती व प्रसंगांच्या रूपानं सांगितलं आहे. त्यामुळे हे पुस्तक कुठेही कंटाळवाणं होत नाही.
प्रमोद पो. डोसा‘मंत्र श्रीमंतीचा’ हे पुस्तक वाचले. आपण आपल्या पुस्तकात अनेक गोष्टींचे ज्ञान, व्यवहार कुशलता, श्रीमंत होण्यासाठी लागणारी तळमळ, कष्ट करण्याची तयारी अशा अनेक गोष्टीचा योग्य पद्धतीने मांडणी केली आहे.
हे पुस्तक वाचून माझ्या मनात माझ्या व्यवहारात अनेक बदल घडले आहेत. मी आपल्या पुस्तकाचा आधार घेण्याचे ठरवले आहे. आलेला रुपया मी पुढील रुपया कमवण्यासाठी वापरणार आहे.
मला या पुस्तकाच्या रूपाने गुरू मिळाला आहे. मला खात्री आहे की आपले पुस्तक माझ्या जीवनात एक क्रांती घडवणार आहे.
आपण पुस्तक लिहिल्यामुळे अनेक गरीब श्रीमंतीचा अभ्यास करणार आहे. या पुस्तकामुळे तुमचे कोटी कोटी आभार मानत आहे.
प्रवीण निलजकरदि. ४ जानेवारी २०११ रोजी शहरातील पुस्तक प्रदर्शनास गेलो असता तेथे आपले `मंत्र श्रीमंतीचा` हे पुस्तक खरेदी केले, मला आपल्या पुस्तकातील मनोगत आणि कथा आवडली. माझ्या मनात व्यवसाय करण्याची इच्छा होती ती आणखीन तीव्र झाली.
आशा करतो की अशाच प्रकारची आपली मार्गदर्शक पुस्तके आपणाकडून मिळत राहतील.
SAHITYA SUCHI - SEPT 2005मंत्र श्रीमंतीचा, विचार करा श्रीमंत व्हा...
कादंबरीत माहितीचा भाग पुष्कळ आहे; परंतु माहितीच्या जंत्रीचे स्वरूप नाही किंवा अर्थशास्त्रीय संकल्पनाव्यूह आलेले नाहीत. अनेक गोष्टी सुरस पद्धतीने सांगितलेल्या आहेत. स्वतंत्रपणे व्यवसाय या एकाच विषयावरची ही एकमेव कादंबरी असावी.
बँक ऑफ महाराष्ट्र म्हटले की, श्याम भुर्के हे नाव आठवले. बँकेने मराठी भाषेकरीता केलेल्या कामाची माहिती ते सतत देत असतात; परंतु आपण एक लेखक आहोत हे सांगत नसतात. त्याची फेब्रुवारी २००५ मध्ये ‘मंत्र श्रीमंतीचा’ या नावाची कादंबरी प्रकाशित झाली आहे. ‘मंत्र श्रीमंतीचा’ या अनवट नावामुळे वाचायला लागेपर्यंत ती कादंबरी असल्याचे कळत नाही. पैसा आणि पैसा असा विचार करणाऱ्या लोकमानसात ‘मंत्र श्रीमंतीचा’ला स्थान मिळेल. रास्त मार्गाने पैशाचा विचार करणे चुकीचे नाही कारण आज सर्वांना नोकरीची संधी मिळू शकणार नाही. म्हणून व्यवसायाचा विचार करणे आणि तो करण्याचे धाडस दाखविणे महत्त्वाचे आहे. ‘मंत्र श्रीमंतीचा’ मधून तशा प्रकारची ऊर्मी मिळते.
कादंबरीत छोटी-छोटी ३४ प्रकरणे आहेत. मनोहर बुद्धिवंत हा नायक आत्मनिवेदनात्मक पद्धतीतून कादंबरी साकार करतो. मनोहरचे फिलॉसॉफर अँड गाईड असलेले लक्ष्मीकांत धनेश्वर, मनोहरचे आईवडील इतक्याच व्यक्तिरेखा या कादंबरीत आहेत. घटना-प्रसंग, स्वभावदर्शन, मनोविश्लेषण, भाषाशैली इत्यादी कादंबरीच्या घटकांचा अभाव या कादंबरीत आहे. विषयाचा ओघ आणि सादरीकरणातील उमाळा हीच काय ती जमेची बाजू आहे. एका ध्येयाने प्रेरित झालेला आणि त्याप्रमाणे ते साध्य केलेला तरुण मनोहर लक्षात राहतो.
मनोहर बुद्धिवंत हा दहावीच्या वर्गात गेलेला विद्यार्थी आहे. व्यक्तिमत्त्व विकास शिबिराला तो जातो. शिबिरात लक्ष्मीकांत धनेश्वर यांचे व्याख्यान ऐकून प्रभावित होतो.
‘‘जगातील बहुसंख्य मोठी माणसं शाळेत वा कॉलेजात अभ्यासात फारशी चमकली नाहीत.’’
‘‘जगातील श्रीमंत माणसे शिक्षणामुळे श्रीमंत झाली असे नाही.’’
‘‘तुमच्या शिक्षणामुळे तुम्ही मोठे व्हाल याची खात्री नाही.’’ असे वास्तवदर्शी; पण सामान्य अशा विचारांमुळे मनोहर प्रभावित होतो व आपल्या जीवनाची दिशा निश्चित करतो. पैसा कमावणं आणि श्रीमंत होणं हे ध्येय निश्चित करतो. ध्येयासाठी मंत्र जपत, पठण करीत बसत नाही, तर चिकाटीने धनेश्वरकाकांची भेट घेतो. लक्ष्मीकांत धनेश्वर मनोहरला कसाला लावत श्रीमंत होण्याचा एकेक मंत्र देत राहतात. त्याप्रमाणे तो निश्चयी वाटचाल करतो.
मनोहरच्या ध्येयाकांक्षेचा आलेख चढता आहे. दहावीचं वर्ष असतानासुद्धा सुट्टीत तो कामाला लागतो. शिकवणीचे वर्ग घेण्याचा प्रयत्न फसतो. दिवाळीत फटाके विकतो. विकण्याची कला त्याला सापडते. दुसऱ्या दिवाळीत फटाकेवाला मनोहरचे घर शोधत येतो. सुरुवातीलाच प्रत्येक कामात त्याला पैसा दिसतो. सूर लागतो. चांगल्या गुणानं दहावी उत्तीर्ण होतो. अकरावीत प्रवेश घेतो. कॉलेजच्या भांडारात जातो. गर्दी बघून त्याच्यातला धंदेवाईक जागा होतो. प्राचार्यांना भेटून विक्रेत्याचे काम मिळवतो. आपल्यातील कौशल्याने भांडाराची मांडणी करतो, विक्री वाढवतो. प्राचार्य कार्यक्रमात त्याचे कौतुक करतात. ७६ टक्क्यांनी बारावी उत्तीर्ण होतो. त्याने आपला मार्ग निवडलेला होताच. फटाके विकणे, भांडारात विक्रेता, मग पुढे ट्रॅव्हल विंग, रिअल इस्टेट, खरेदी-विक्री, इनव्हेस्टमेंट, शेअर ट्रेडिंग असे अनेक व्यवसाय तो करतो.
मनोहर बुद्धिवंत पैशाच्या मागे लागलेला नसतो. लक्ष्मीच त्याच्याकरिता काम करीत आहे. शेअर, इस्टेट एजन्सी, यासारखे धंदे असतानाही तो जीवनाचा मुक्त आनंद घेत असतो. कोट्याधीश असतानाही पुण्यातून भणंगासारखा पायी फिरत असतो. सतत दृष्टी भिरभिरते. जगप्रवास करतो, पण तो प्रवाससुद्धा व्यवसायाला लाभदायकच ठरतो. प्रत्येक व्यवसाय मौजेखातर करावा तसेच करतो.
या आत्मनिवेदनात मनोहर आपले व्यवसायाचे गमक सांगत आहे. श्री. श्याम भुर्के हे बँकेत अधिकारी आहेत. अनेक प्रकारचे अनुभव त्यांना आले आहेत. ते सगळे पैसा, व्यवसाय यांच्याशी निगडित आहेत. त्या अनुभवातून ‘मंत्र श्रीमंतीचा’ ही कादंबरी साकारली. कादंबरीत माहितीचा भाग पुष्कळ आहे; परंतु माहितीच्या जंत्रीचे स्वरूप नाही किंवा अर्थशास्त्रीय संकल्पनाव्यूह आलेले नाहीत. अनेक गोष्टी सुरस पद्धतीने सांगितलेल्या आहेत. स्वतंत्रपणे व्यवसाय या एकाच विषयावरची ही एकमेव कादंबरी असावी. व्यवसाय म्हटले की बाई-बाटली, ताडी-माडी-गाडी असे समीकरण असते. या सव्यंगतेचा शिरकाव भुर्के यांनी होऊ दिलेला नाही. वाईट उद्देशाने कथानक रचनेत स्त्री न आणता कादंबरी आकृष्ट करून घेणारी ठरू शकते, हे श्याम भुर्के यांनी प्रतिभावंतांना दाखवून दिले आहे. कादंबरीची भाषा व्यवहारातील आहे. तरीही तिला एक लय आहे. मनोहर सतराव्या-अठराव्या वर्षी व्यवसायाची मोठी गणितं मांडतो तेव्हा ते अतर्क्ययुक्त, बटबटीत वाटू लागते. भावनागुंठीत शुद्ध वाङ्मयगुणांचा आनंद मिळत नाही, हेही तितकेच खरे.
-प्रा. राजशेखर शिंदे
DAINIK SAKAL 04-12-2005श्रीमंतीचा मंत्र देणारे पुस्तक...
‘मंत्र श्रीमंतीचा’ या नावातच पुस्तकाचे सार आहे. श्रीमंत होण्यासाठी नोकरीचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा व्यावसायिक व्हा, हा मंत्र देणारे हे पुस्तक आहे. जीवन म्हणजे केवळ पैसा कमावणे हे बहुधा मराठी माणसाला मान्य नसते; पण केवळ व्यावसायिकच श्रीमंत होऊ शकतो, हे लेखक या पुस्तकाद्वारे वाचकाला पटवत जातात. पैसा मिळविण्यासाठी कला शिकण्यास सांगतात. पैसा त्यांच्यासाठी काम करतो. हे वाचकांच्या मनावर ठसवत राहतात. कथेचा नायक शाळेत असल्यापासूनच छोटे-मोठे व्यवसाय करू लागतो. शिक्षण घेताना व्यवसायाचा अनुभव घेण्याला महत्त्व देतो. त्यातून श्रीमंत होण्याचा मार्ग शिकत जातो आणि वाचकाला सुचवत जातो. करांचे नियोजन, वेळेचं महत्त्व, शेअर्स आदी गोष्टी समजावून सांगतो.
DAINIK PUDHARI 13-03-2005प्रसिद्ध लेखक श्याम भुर्केलिखित ‘मंत्र श्रीमंतीचा’ हे पुस्तक वाचायला घेतलं, पूर्ण केलं आणि प्रश्न पडला, समजा आपलया लाडक्या लतादीदी जर कुठे आकाशवाणीवर निवेदिकेची नोकरी करत बसल्या असत्या तर आणि ‘ब्रिटानिया’ कंपनीतील उच्चपदावरची नोकरी सोडून आजचा सुपरस्टार अमिताभ बच्चन जर मुंबईत आला नसता तर, काय झाले असते? या आपल्या लाडक्या मंडळींनी जर कुठेतरी फुटकळ पगारावर नोकरी केली असती तर आमची गानकोकिळा लता मंगेशकर दिसलीच नसती तर ‘कौन बनेगा करोडपती’ आणि अनेकांना करोडपती बनविणारा ‘अमिताभ हरिवंशराय बच्चन’ दिसलाच नसता. भुर्के यांनी एका यशस्वी उद्योजकाची, व्यावसायिकाची व्याख्या आणि त्यांनी अनुभवलेले चढउतार यांचे जे वर्णन केले आहे ते या वरील व्यक्तींच्या आयुष्यात ‘फिट बसतं.’
लेखकाला आलेले अनुभव, ‘व्यवसायाच्या’ सुरुवातीला लोकांचे टोमणे मारणे, हे भुर्के यांनी खुमासदाररीत्या सांगितले आहे तर स्टेशनरी दुकानचे ‘हार्मनी’ शॉपपर्यंत प्रवास लेखकाने सोप्या सुलभरीतीने मांडला आहे. सिंधी समाजाची व्यवसायातील सचोटी सोदाहरण दिली आहे आणि कुठेतरी चित्रकला शिक्षकाची नोकरी शोधणाऱ्या चित्रकारांना आपल्या कलेला किती जागतिक मार्केट आहे आणि कसे मिळविता येईल, हे सोदाहरण मांडले आहे. नोकरी करूनही धंदा करता येतो तो कसा? हे पण दाखविले आहे.
यशस्वी धंद्याची कसोटी मालाला गती हवी, मार्केटिंगची किमया, चित्रकलेत गुंतवणुकीला वाव, वेळेचे नियोजन, शंकेखोर गरीबच राहतो, राशिचक्र नव्हे धनचक्र ही सदरे तर फारच वाचनीय आहेत.
शेवटी श्रीमंतीचा मूलमंत्र म्हणजे श्रीमंतांशी, विद्वानांशी आणि यशस्वी माणसाशी मैत्री करणे. आज नोकरीच्या मागे फिरणाऱ्या बेकार तरुणांना निराश होऊ नका, तुमच्यासाठी पण यशाचे एक नभांगण वाट पाहत आहे, असा संदेश देऊन लेखक आजच्या युवकांना, व्यवसायिकांना आणि द्विधामन:स्थितीत सापडलेल्या व्यक्तींना योग्य संदेश आणि मानसिक आधार देऊन एका मोठ्या सामाजिक प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करीत आहे. पुस्तकाची मांडणी उत्कृष्ट, उदाहरणेही आकृती, नकाशे काढून दिली आहेत तर मुखपृष्ठ आणि पुस्तकाचे शीर्षक लक्षवेधक आहे.
DAINIK LOKSATTA 19-06-2005श्रीमंतीची गुपिते...
अलीकडे व्यक्तिमत्त्व विकास, शिष्टाचार, वागावे कसे, मित्र कसे जोडावे आदी विषयांवर अगणित पुस्तके प्रसिद्ध होताना दिसतात. ती वाचून त्याप्रमाणे वर्तन केले तर त्याचा कितपत फायदा होतो, असा प्रश्न असला तरी त्यातून काही ‘टिप्स’ मिळतात, हे निश्चित. याच पठडीत ‘मंत्र श्रीमंतीचा’ हे पुसतक लिहून श्याम भुर्के यांनी आर्थिक सुबत्तेची रहस्ये वाचकांपुढे खुली केली आहेत. भुर्के हे बँकेत काम करीत होते. त्यामुळे समाजाच्या विविध थरांतील लोकांशी आर्थिक व्यवहाराच्या निमित्ते त्यांचा दैनंदिन संपर्क येत होता. ही माणसे व्यवहारात कोठे चुकतात, कोणत्या गफलती करतात, याचे वास्तव अनुभव भुर्के यांना त्या काळात आले. या विषयावर त्यांनी ठिकठिकाणी व्याखनेही दिली. या सर्वांचे सार म्हणजे ‘मंत्र श्रीमंतीचा’ या पुस्तकाची निर्मिती.
आज पैसा सर्वांनाच हवा आहे. ‘जोवरी पैसा, तोवरी बैसा’ ही खूणगाठ प्रत्येकानेच मनाशी बांधलेली असते. अशा परिस्थितीत हा पैसा कसा कमवावा, कसा टिकवावा, त्याची वृद्ध कशी कशी करावी, याचे मूलमंत्र भुर्के विविध लेखांमधून देतात. शेअरबाजार, त्यांचे व्यवहार कसे करावेत. वेळेचे नियोजन कसे करावे, याबद्दलही भुर्के महत्त्वाच्या ‘टिप्स’ देतात. मार्केटिंग, त्याच्या खाचाखुणा याचाही वेध भुर्के यांनी घेतला असून, शंकेखोर कसे आपले नुकसान करू घेतात, यावर भुर्के झोत टाकतात.
MAHARASHTRA TIMES 17-04-2005पैसा येई छन् छन्...
‘धट्टीकट्टी गरिबी अन् लुळीपांगळी श्रीमंती’ ही म्हण मराठीत कोणी जन्माला घातली कुणास ठाऊक! पण धट्टीकट्टी श्रीमंती असाही निरोगी पर्याय असू शकतो, असे का कुणाला वाटले नाही? गरिबीचे उदात्तीकरण आणि श्रीमंतीची अवहेलना करणे हा जणू मराठी माणसाचा अनुकदत्त गुण झाला होता. आता स्थिती हळुहळू पालटत आहे. स्वत्त्व टिकवून, बुद्धी वापरून, परिश्रम व चिकाटीने श्रीमंत होता येते आणि असे श्रीमंत होणे वाईट नसते, हे ही मराठी माणसाला पटू लागले आहे. अशा नव्या हवेला साजेसे असे हे पुस्तक श्याम भुर्के यांनी लिहिले आहे.
काल्पनिक कथेचा आधार घेत ते श्रीमंतीचा मंत्र हसत-खेळत सांगतात. सुरक्षित नोकरी, सारी देणी चुकवून येणारी मन:शांती, धोका टाळण्याचा भिऊपणा या साऱ्यावर ते छानदार उदाहरणे देत हल्ला करतात. भुर्के हे एका राष्ट्रीयकृत बँकेत उच्च पदावर असल्याने त्यांनी उद्योजकांना अर्थसाहाय्य देण्याची शेकडो प्रकरणे पाहिली आहेत. त्यातूनच त्यांनी तरुणांना मार्गदर्शन सुरू केले. त्यातूनच या पुस्तकाचा जन्म झाला. नव्या संधी शोधण्याची वृत्ती, प्रामाणिक उद्योग करण्याची तयारी, चिकाटी, कष्ट आणि सेवातत्परता या साऱ्या श्रीमंतीच्या वाटेवरच्या पायऱ्या आहेत. लहानपणी रस्त्यावर उभे राहून कापड विकणारा आणि आज कापडविक्रीतील दादा झालेला उद्योजक, टेलिफोनमध्ये सुगंधी पट्ट्या बसवून सुरुवात करणारा आणि आज नामांकित बिल्डर झालेला जिद्दी तरुण, केवळ छंदापायी रेल्वेगाडीत पुस्तके विकण्याची सुरुवात करून आता भरपूर कमावणारा नोकरदार, खचाखच भरलेल्या दुकानात रॉकेल आहे का, असे विचारणाऱ्या ग्राहकाची चेष्टा न करता दुसऱ्या दिवशी रॉकेल आणून देणारा दुकानदार अशी अनेक उदाहरणे लेखकाने दिली आहेत. ती श्रीमंतीचा मार्ग दाखविणारी आहेत.
कोणत्याही धंद्यात धोका हा असतोच आणि तो घेतला तर त्याचे फळही मिळू शकते. पण कातडीबचाऊ माणसे तो टाळतात. त्याचमुळे त्यांचा संपन्न होण्याचा मार्गही खुंटतो. नवे ज्ञान घेण्याची दारे बंद करणे हा ही मोठा गुन्हाच आहे. तो करणाऱ्यांना श्रीमंतीवर हक्क सांगण्याचा अधिकारच नाही. मात्र, भुर्के यांनी दिलेले मंत्र वाचले, अंगिकारले आणि अनुसरले तर मराठी माणूसही श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही.
DAINIK AIKYA 05-11-2006श्रमाने श्रीमंत होण्याचा मंत्र...
बँकेतील नोकरीमुळे कर्मचाऱ्यांना काय काय लाभ होतात या प्रश्नाला अनेक उत्तरे मिळू शकतील. परंतु श्याम भुर्के यांना बँकेतील नोकरीमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत कसे होतात हे पहायला मिळाले, तसेच अनेक मध्यमवर्गीय हे हुशार असूनही मागे का राहिले हेही बघायला मिळाले; आणि आपल्याला मिळालेले हे सर्व ज्ञाप सर्वसामान्यांना सांगून त्यांनाही युक्तीच्या या चार गोष्टी सांगून शहाणे आणि शक्यतर श्रीमंत बनविण्याचा विचार त्यांनाही मनात आला. परंतु लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण असे कोणी म्हणून नये, त्यांनी श्रीमंत होण्याचा मंत्र स्पष्ट करण्यासाठी कादंबरी ह्या वाङ्मय प्रकाराचा वरकरणी वापर करून उदाहरणाद्वारे नियम सिद्ध करण्याचा आणि ते प्रभावीपणे वाचकांच्या मनावर बिंबवण्याचा मार्ग अनुसरुन ‘मंत्र श्रीमंतीचा’ हे पुस्तक लिहिले आहे.
आपल्या मुलीला वडिल म्हणतात, ‘तुझे हे धनेश्वरकाका आणि मी एकाच शाळेत शिकायला होतो. तो अभ्यासात बेताचाच होता. जेमतेम पास व्हायचा.. माझा नेहमी पहिला नंबर असायचा. एम. ए. ला पहिला आलो. प्रोफेसर झालो... धनेश्वरनं इनव्हेस्टमेंट कंपनी काढली. जमिनीच्या खरेदीविक्रीत खूप पैसा मिळवला. पुण्यात त्याचा मोठा बंगला आहे. त्याचे वडील श्रीमंत नव्हते. पण त्याने स्वत:च्या कष्टाने आणि हुशारीने प्रचंड कमाई केली. धनेवश्वरकाका अभ्यासात हुशार नव्हते तर एवढे श्रीमंत कसे झाले? असा प्रश्न मनोहरला पडतो आणि त्याचे उत्तर मिळवण्यासाठी तो धनेश्वरकाकांना भेटायला जातो. धनेश्वरकाका त्याला विचारतात, ‘श्रीमंत व्हावं असं तुझ्या मनात कधी आलं?’ ‘तुमचं भाषण ऐकलं तेव्हा... पण त्यानंतर एक प्रसंग घडला; आणि आपण श्रीमंत व्हायचंच असा मी निश्चिय केला. ‘तो प्रसंग असतो लोणावळा ट्रिपच्या वेळी व्हॅनमध्ये आपल्याला वगळले गेल्यामुळे झालेला अपमानाचा... त्यावेळी मनोहरला जाणवते, या जगात गरिबाची अवहेलना होते, पैशाला किंमत आहे... श्रीमंतीला मान आहे... आपणही एक दिवस कार घ्यायची... धनेश्वरकाका त्याला सांगतात, ‘तू दहावीला आहेस, मेरिटमध्ये येण्याच्या खटपटीला लागलास तर कमाई करता येणार नाही. वरच्या मार्कांच्या मागे लागण्यापेक्षा काही पैसे कमावून दाखव... हा माझा पहिला धडा. मी सांगितलेला गृहपाठ पूर्ण कर.. मग पुढचा धडा...’ ‘दिवाळी जवळ आल्यावर फटक्याचे दुकान दिसते. आपण फटाके विकले तर? तो दुकानदाराकडे काम करतो... नंतर फटाक्यांचे नमुने घेऊन घरोघर जाऊन ऑडर्स मिळवतो. नमुन्याला माल रोखीने विकून. नवीन माल घेऊन विकतो. बारा हजार रुपयांची विक्री. अठराशे रुपये फायदा. मनोहर श्रीमंतीच्या मार्गातील पहिली पावले टाकू लागतो. स्वकष्टाने कमाई केल्यावर भेट असे धनेश्वरकाकांनी सांगितले असते. तो भेटीसाठी वेळ मागतो. ‘व्हेरी गुड. तू मोठा होशील. श्रीमंतही होशील. श्याम भुर्के यांनी याच धर्तीवर मनोहरला उत्पनाचे वेगवेगळे मार्ग आणि त्यातील खाचाखोचा जाणून पैसा मिळवण्याची संधी वापरणे यावर प्रकाश टाकला आहे. धनेश्वरकाकांच्या तालमीत असे धडे गिरवत, मनोहरची जडणघडण होत जाते. गुणवत्ता हा आपला स्वभाव झाला पाहिजे. सचोटी पाहिजे. स्पर्धेच्या युगात हातोटी हवी. व्यवसायाचं पूर्ण ज्ञान हवं. व्यवसाय चालायलाच हवा.. प्रत्येकाला काही ना काही विकता यायला पाहिजे हे महत्त्वाचे. त्याचप्रमाणे लिखोटी हवी. खरेदी, विक्री, उधारी, शिल्लक, नफा, येणी देणी. घरखर्च नफ्यातून करायचा; विक्रीच्या पैशातून नव्हे. विक्रीचे पैसे पुढील मालखरेदीसाठीच वापरायला हवे... यशस्वी धंद्यासाठी हे सर्व आवश्यक. बारावीत ७६ टक्के गुण मिळवून मनोहर पास होतो. कॉलेज अॅडमिशनला अडचण नसते. यूथ हॉस्टेलतर्फे हिमालय ट्रेकिंगची जाहिरात मनोहर वाचतो. पंधरा दिवस. पंधरा हजार खर्च... मनोहर त्या ट्रेकला जायचे ठरवतो. चौकशी करतो, ग्रुप बुकिंगला प्रत्येकी हजार रुपये सवलत... मनोहर पंचवीस सदस्य मिळवतो. त्याच्या ट्रेकचा खर्च परस्पर निघतो. व किंग एजन्सी सुरू करतो बी. कॉमच्या शेवटच्या वर्षात ५० टक्के गुण मिळवून यशस्वी होतो. धनेश्वरकाका त्याला १५ हजार दरमहा पगाराची मॅनेजरची नोकरी ऑफर करतात. तो त्याना म्हणतो, नोकरीच्या स्कूटररेसमध्ये अडकू नका असे तुम्ही सांगत होता. मी नोकरी नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक, जमिनीचे व्यवहार, यातही पुढे मनोहर रस घेतो. जगात सर्वात शक्तिमान संपत्ती म्हणजे आपलं मन. त्यासाठी शिक्षण हवे. आपला प्रत्येक रुपया पुढील रुपया कमवत राहयला हवा. स्वत:ची इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी तो सुरू करतो. उद्घाटनाच्या समारंभात धनेश्वरकाकांचे भाषण ठेवतो. गुंतवणूक कशी करावी?’ एका बँकेची थकबाकीपोटी एका बंगल्याच्या लिलावाची जाहिरात येते. मनोहर लिलावात भाग घेतो. त्या व्यवहारात तेरा लाख रुपयांचा लाभ होतो. श्याम भुर्के कमाईचे वेगवेगळे मार्ग उघड करतात. पैशाशिवाय जगात काहीही चालत नाही. संपत्ती आणि देणी यांच्यातल फरक ओळखयला शिका. धनेश्वरकाका मनोहरला शेवटी सांगतात. आज तू माझ्यापेक्षाही श्रीमंत झालायस. तुला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर या महाराष्ट्रात असे अनेक श्रीमंत निर्माण कर. ‘मंत्र श्रीमंतीचा’ हे पुस्तक असे प्रेरणा देणार आहे. मनोहर या तरुणाच्या मनात श्रीमंतीबद्दल ओढ निर्माण होणे आणि पैसा मिळवण्यासाठी विविध मार्ग त्याने चोखाळत राहून अर्थार्जनाचे भक्कम नेटवर्क उभारण्यात त्याला यश लाभणे हा सगळा प्रवास या पुस्तकात भुर्के यांनी दाखवला आहे. श्रीमंत कसे व्हावे याविषयी मार्गदर्शन करणारे हे पुस्तक मनोहर आणि धनेश्वरकाका यांच्या परस्परचर्चांमुळे नाट्यपूर्ण आणि वाचनीय झाले.
DAINIK AIKYA 04-09-2005‘उद्योगी’ करणारा... मंत्र श्रीमंतीचा…
सख्यानों आज आपल्या मित्राच्या पहिल्या कमाईचा अनुभव तुम्ही वाचलाच असेल, तुम्हांलाही हा अनुभव घ्यावा अशी उर्मी नक्कीच झाली असेल. खरंतर कॉलेजचे दिवस हे आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारे असतात, याच दिवसात नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा आणि उत्साह असतो, ध्येय ठरवून त्यानुसार मार्गक्रमण करण्याचे हे दिवस प्रत्येकासाठी आठवणींचा खजाना ठरतात. मी तुम्हाला एक प्रॉमिस केले होते की, आपल्या जल्लोष ग्रुपच्या माध्यमातून योग्य पुस्तके तुमच्यापर्यंत पोहोचवेन. गेल्या पंधरा दिवसात मी किमान ७-८ पुस्तके वाचलीत. सगळीच तुमच्याशी चर्चा करावीत, अशी योग्य आहेत. आज त्यातल्याच एका त्यातल्याच एका पुस्तकाविषयी...
साताऱ्यालाच श्याम भुर्के या बँकिग क्षेत्रातील एका यशस्वी तरुणाने लिहिलेलं मंत्र श्रीमंतीचा’ हे उल्लेखनीय पुस्तक माझ्या वाचनात आले. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेले हे पुस्तक तरुण वर्गाने आपले ध्येय ठरविण्यापूर्वी आवर्जून वाचावे. असे मला प्रामाणिकपणे वाटते. नोकरी की व्यवसाय, अशा पूर्वापार घोळात अडकवलेल्या सर्वच मराठी तरुणांना साध्या-सोप्या व परिणामकारक पद्धतीने व्यवसायच कसा श्रेष्ठ आहे हे समजावून व पटवून देणारे हे पुस्तक म्हणजे धाडसी निर्णय घेणाऱ्या व आव्हान पेलण्याची तयारी असलेल्या तरुणांना दिशादर्शकच आहे.
या पुस्तकाचा नायक मनोहर बुद्धिवंत एक तुमच्यासारख्याच विद्यार्थी आहे. याच्या १०वीपासूनच्या मानसिकतेचा अभ्यास यात आहे. नोकरीलाच प्रतिष्ठा व सुरक्षित जगणे मानणारे वडिल आणि व्यवसायासाठी उद्युक्त करणारे त्याचे आयडॉल काका. दोघांमध्ये शेवटी काका जिंकतात आणि हा नायक एक यशस्वी उद्योजक होतो.
या पुस्तकात दडलाय श्रींमत होण्याचा मंत्र! यातल्या नायकाचे वडील प्रा. बुद्धिवंत म्हणतात, ‘खूप अभ्यास कर. गुणवत्ता यादीत ये’ तर त्यांचेच मित्र धनेश्वर सांगतात, ‘परीक्षेत उत्तीर्ण होण्याइतपत अभ्यास पुरेसा आहे. लवकरात लवकर पैसे कमविण्याची कला शिक. पैसे मिळविण्यापेक्षाही पैसे कमविण्याची कला प्राप्त होणे हे महत्त्वाचे.’ नायकाने ही कला कशी प्राप्त केली. येणारा प्रत्येक रुपया पुढील रुपया कमविण्यासाठी कसा वापरला, हे इथं उलगडून दाखवलंय. हे पुस्तक वाचेल त्याला आपण श्रीमंत व्हावे, असे वाटेल. तो गरिबीत जन्माला आला असेल तरीही श्रीमंतीचा मार्ग धरेल. जर हे पुस्तक श्रीमंतानोच वाचले तर आपण अधिक श्रीमंत होण्यासाठी कोणते मार्ग चोखाळायला हवेत, याचे त्याला ज्ञान होईल.
जे नोकरीच्या चक्रामध्ये अडकले आहेत, त्यांनाही आहे त्या परिस्थितीत श्रीमंत कसे व्हावे, याचा मार्ग सापडेल. नोकरी न मिळाल्याने हताश झालेल्या युवकांमध्ये उद्योजकता निर्माण होईल.
हे पुस्तक लिहित असताना लेखकाने आपले अनुभव आणि सध्याची मानसिकता यांचे वास्तव रेखाटले आहे. नोकरी करणारा गरीबच राहतो तर व्यापारीवर्ग लाखोंची कर्जे असूनही श्रीमंत कसा राहतो? नोकरदारांची देण फेडण्याची घाई, आळस, सबबी सांगण्याची व कृती करताना टाळाटाळ करण्याची वृत्ती, जबाबदारी व धाडस स्वीकारण्याची अनास्था, गुंतवणूक करताना सुरक्षित क्षेत्र बघून कमी फायदे मिळाले तरी चालतील अशी मानसिकता, व्यवसायाबद्दलचा दृष्टिकोन अशा सर्वच बाजूंवर कथारूपाने बारकाईने केलेले लिखाण अभ्यासू व विचार करायला लावणारे आहे. कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करण्यापूर्वी त्याची चौरस माहिती आपल्याला असणे धंद्याच्या भविष्यावरही परिणामकारक असते. लेखकाच्या मते आवड असली की सवड होतेच. वेळेचे नियोजन, आत्मविश्वास, शोधण्याची जिज्ञासा, अशा काही महत्त्वाच्या गोष्टींच पालन करणे ही यशस्वी व्यावसायिकाची पहिली पायरी आहे. जाता-जाताप या पुस्तकातून लेखक सांगतात की, नानाविध माध्यमे आज आपल्या ज्ञानात भर घालायला उपलब्ध आहेत. डोळे कान उघडे ठेवून आपण त्यांचा लाभ घ्यायला हवा. यशस्वी उद्योजकांची आत्मचरित्रे वाचा. त्यांच्याइतके प्रभावी शिक्षण नाही. मोठा विचार करण्यानेच माणसे मोठी होतात, हे लक्षात ठेवा.
तर मित्रांनो असे हे श्रीमंतीचा मंत्र प्रभावीपणे मनावर ठसविणारे पुस्तक जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर वाचून काढाल आणि रुटीन नोकरीच्या मागे न लागता आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करून एखादा योग्य व्यवसायच तुम्ही निवडाल. ही माझी अपेक्षा...
हे पुस्तक परीक्षण तुम्हाला कसे वाटले? तुम्ही एखादे पुस्तक वाचले असेल तर त्याचे परीक्षण माझ्यापर्यंत पोहोच करा.
-अनन्या