* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
A bench, a temple, a village, people like you or me and a blind old man-These are some of the set ups in Mrs. Sudha Murty`s compilation of short stories from people across India. The Old Man And His God: Discovering The Spirit of India is a collection of individual accounts gathered by the writer from people who have their own stories to tell. The stories are such that they are very simple to understand and written in a simple way. They describe the incidents that are recorded by Mrs. Murty during her journey, which she subsequently summarized in her easy to read book. Her stories are a part of the very soul of human beings. For instance, there is one about how an old blind man gave her shelter in a storm when there was nowhere else to go. Another story is about how brothers turned away from each other when somewhere else two people, who were not even related became closer than brothers. There are also stories of young people trying to make a career for themselves and also about the oppression of women who struggle for their rights. Many different lives touched the heart of Mrs. Sudha Murty and entitled her to write The Old Man and His God. Mrs. Murty has explored the spirit of India with her set of short stories. The spirit of India is in the people, their lives and their stories which can impact the way of the world. The Old Man and His God: Discovering the Spirit of India was published by Penguin in 2006. It is available in paperback editions.
‘‘लोक मला अनेकदा विचारतात, ‘एवढ्या सगळ्या चित्रविचित्र गोष्टी नेमक्या तुमच्याच बाबतीत कशा काय घडतात?’ त्यावर त्या सर्वांना माझं एकच सांगणं असतं– जीवनाच्या या प्रवासात आपल्याला सर्वांनाच नानाविध माणसं भेटतात, कितीतरी अनुभवांना सामोरं जावं लागतं... त्यातले काही अनुभव आपल्याला स्पर्शून जातात, काही अंतर्बाह्य बदलूनसुद्धा टाकतात. तुमच्यापाशी जर संवेदनाक्षम मन असेल आणि तुम्ही या अनुभवांची नियमितपणे नोंद करून ठेवत असाल, तर तुमच्याही लक्षात येईल... तुमचं आयुष्य हासुद्धा एक विविध कथांचा खजिना आहे...’’ खेड्यापाड्यात जाऊन तेथील गोरगरिबांसाठी, झोपडपट्टीवासियांसाठी आणि सामान्य माणसांसाठी कार्य करत असताना सुधा मूर्ती, एक समाजसेविका, लेखिका आणि प्राध्यापिका– त्या सर्वांशी बोलतात, त्या लोकांचं म्हणणं त्या नोंदवून ठेवतात. या माणसांचा जीवनसंघर्ष, त्यांच्या आयुष्यात आलेले खडतर प्रसंग, त्यावर त्यांनी केलेली मात, कधीतरी त्या संकटांपुढे त्यांनी मानलेली हार... हे सगळं लेखिकेने आपल्या प्रवाही भाषेत या पुस्तकात मांडलं आहे. सर्वसामान्य माणसांच्या ठायी लेखिकेला दिसून आलेल्या असामान्य दातृत्वाच्या, नि:स्वार्थी वृत्तीच्या कथा यात आहेत. सुनामीसारख्या निसर्गाच्या प्रकोपाशी झुंज देणारी माणसं असोत, अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी उभ्या राहिलेल्या सबला असोत, स्पर्धेच्या युगात वरवर जाण्याची धडपड करणारे तरुण असोत– या सर्वांच्या गोष्टीतून मानवी स्वभाव आणि प्रवृत्तीच्या विविध पैलूंचं नेमकं चित्रण आपल्याला दिसतं. भारतीय समाजाचा आत्माच या पुस्तकाच्या रूपानं प्रतिबिंबित झाला आहे.
Keywords
Customer Reviews
 • Rating StarDAINIK LOKSATTA 18-11-2007

  अनुभवांचा इंद्रधनुषी शब्द आलेख... सुधा म्हणजे मध. मूर्ती म्हणजे प्रकट झालेले. जीवनातील मधासमान दृष्टी आणि अनुभव एकत्र होऊन शब्दरूपाने प्रकट होतात तेव्हा सुधा मूर्तीचे लेख जन्म घेतात. सुधा मूर्तींनी समाजात वावरताना आलेल्या अनुभवांचे, मधमाशीच्या मध गोा करण्याच्या वृत्तीने संकलन केले आहे. हे करताना त्या चांगल्या गोष्टींचे भरभरून कौतुक करतात तर चांगल्या गोष्टी दाखवून देताना त्यांच्यातील अनुकंपा आणि दया यांचे दर्शन होते. प्रत्येक लेखाला मानवी स्वभावाच्या विश्लेषणाचे अस्तर आहे. हे विश्लेषण कोरडे आणि शुष्क नाही; त्याला दयार्द्र दृष्टीचा ओलावा आहे. लेखिकेला आलेल्या अनुभवांचे चित्रण सर्वच्या सर्व खरंखुरं आहे... प्रामाणिकपणे जसंच्या तसं लिहिलं आहे... काही लोकांना त्यामुळे ते भावलं आहे... असं सुधा मूर्ती मनमोकळेपणानं सांगतात. मातृत्व, वात्सल्य, संतानप्रेम हे एकाच भावनेचे अनेक पैलू. निरनिराळ्या अनुभवातून त्याचे वेगवेगळे कंगोरे दिसून येतात. कधी आनंदाने मन उचंबळून येतं. तर कधी विदारक अनुभव वाचताना मन विषण्ण होतं. मानवी मनोव्यापाराचे विश्लेषण हेच या सबंध पुस्तकाचे मूलसूत्र आहे. नोकरी ही कहाणी अशीच आहे. मुलाखतीतून निरनिराळ्या उमेदवारांची मनोवृत्ती कळते. एक हुशार, सधन घरातली मुलगी, ‘मला स्वतंत्रपणे रहायचे आहे, कार ठेवायची आहे, तेव्हा जास्त पगार हवा’ असे सांगते, तर दुसरा हुशार, श्रीमंत डॉक्टरचा मुलगा मात्र ‘मला याच गावात दुसरं देखील काम होतं, मी आत्याच्या घरी उरतलो होतो’ असे कारण सांगून प्रवासभत्ता घेण्याचे नाकारतो. या संदर्भात ‘वाइज अ‍ॅण्ड अदरवाइज’ या सुधा मूर्तींच्या दुसऱ्या पुस्तकांतील एका हुशार पण बढाईखोर सॉफ्टवेअर इंजिनीयरची आठवण होते. धारवाडच्या इंजिनीअरींग कॉलेजात सुवर्णपदक मिळाल्याचे खोटंच सांगणाऱ्यांची मनोवृत्ती लेखिकेला आणि वाचकांनासुद्धा कोड्यात टाकते. परस्पर विरोधी घटना समोरासमोर उभ्या करून जणू वाचकांपुढे सुधा मूर्ती प्रश्न उभा करतात. त्या प्रतिपादनात कुठेही समस्या सोडविण्याचा अभिनिवेश असतं नाही पण वाचकांच्या मनात खळबळ मात्र जरूर निर्माण होते. हुशार दत्तक मुलीच्या शिक्षणासाठी स्वत:च्या सोन्याच्या बांगड्या गहाण टाकायला निघालेली लीलाम्मा बघून आनंद होतो. त्याच लेखात अमानुष रामप्पा या बापाचे वर्णन येते. रामप्पा स्वत:च्या लहान मुलाच्या कॅन्सरचे भांडवल करतो, लाखो रुपये चंदा गोळा करतो. मुलाच्या इलाजासाठी एक पैसाही खर्च करीत नाही. घर-वाहन विकत घेऊन मौज करतो हे वाचून मन खिन्न होते. फाटके कपडे घालून फुकट वैद्यकीय सेवेसाठी दोन गाड्यांची श्रीमंत मालकीण त्या पाहतात. गरीब वस्तीत ब्लँकेट वाटताना परत मागण्यासाठी पण श्रीमंतांची क्षुद्र वृत्ती आणि मनाची गरीबी त्यांना जास्त दु:ख देते. एका पाकिस्तान भेटीच्या वेळी, तेथील लोक, हिंदी सिनेमाच्या गाण्याची धून गुणगुणारा टॅक्सी ड्रायव्हर, मेजवानीतील चना-भटुरा, आलू पराठा, जिलेबी, सगळं सगळं कसं घरच्यासारखं वाटत होतं. त्या तक्षशीला येथे म्युझियम पाहायला जातात. तिथे परदेशी पाहुण्यांसाठी तिकीट जास्त आहे. आपण जणू भारतातच आहे असं समजून त्या विचारतात, ‘माझ्याकडून दोनशे का घेतले?’ तेव्हा ‘तुम्ही भारतीय म्हणजे परदेशी’ हे उत्तर त्यांना वास्तवाची जाणीव करून देते. दुसऱ्या एका भेटीच्या वेळी चेन्नईच्या मिसेस कपूर त्यांच्याबरोबर असतात. मिसेस कपूरचं बाळपण, खेळणं बागडणं सुरुवातीचं शिक्षण, फाळणीपूर्व पंजाबात झालं. त्यांची जन्मस्थानाला - पिंडीला भेट देण्याची अनावर ओढ, ते घर आता तिथे नसल्यामुळे व्यथित झालेल्या मिसेस कपूर, शेजारी डॉ. सलीम यांचे अगत्यशील वागणं, हे सगळं सुधा मूर्ती अत्यंत भावूकपणे वर्णन करतात. इन्फोसिस ही कॉम्प्युटर क्षेत्रातील फक्त भारतातील नव्हे तर जगातील अग्रगण्य व श्रीमंत कंपनी आहे. इन्फोसिस फौंडेशन ही त्या कंपनीची समाजिक आणि धर्मादाय कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या प्रमुख या नात्याने सुधा मूर्तींचा विविध क्षेत्रातील संस्थांचा आणि व्यक्तींचा संबंध येतो. हिरालाल जैन हे व्यावसायिक नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर फौंडेशनला मदत पाठवित असतात. त्यांच्यानंतर दुसरी पिढी व्यवसायाची धुरा सांभाळते. नवीन व्यवस्थापन इन्फोसिस फौंडेशनला विचारते, आम्हाला या मदतीमुळे काय प्रसिद्धी मिळेल? बदलत्या व्यक्तिगत, सामाजिक आणि व्यावसायिक मूल्यांची चुणूक या लेखाद्वारे आपणास कळून येते. या पुस्तकातील प्रत्येक लेख एक आरसा आहे. प्रत्येकात वेगवेगळे प्रतिबिंब आहे. पण प्रत्येकात माणसांच्या वृत्ती प्रवृत्तींच्या वेगवेगळ्या रंगाचे दर्शन आहे, जणू भारत दर्शन आहे. या साऱ्या गोष्टी मनाला स्पर्शून जातात; सरळ सच्चेपणा भावतो. सगळ्याच लेखांचा परिचय देणे शब्दमर्यादेत बसत नाही. पण ‘तू शंभर मुलांची आई हो!’ हा त्यांच्या आजीचा आशीर्वाद त्यांनी वेगळ्या संदर्भात अनेकांना मदत करून सार्थ केला असे वाटते. कर्मठ आणि प्रगत विचारसरणी एकत्र नांदू शकतात याचा सुधा मूर्तींच्या आजीमध्ये सुंदर संगम आढळतो. असा आहे सुधा मूर्तींच्या अनुभवांचा इंद्रधनुषी शब्द आलेख! द ओल्ड मॅन अ‍ॅण्ड हिज गॉड (डिस्कव्हरींग द स्पिरीट ऑफ इंडिया) या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद लीना सोहोनी यांनी सरसरित्या केला आहे. तळमळीने लिहिलेले अनुभव आणि ओघवती भाषा यामुळे हाती घेतलेले पुस्तक केव्हा संपते ते कळतच नाही. उगाच नाही एकवीस भाषात भाषांतर झालं! कॉम्प्युटर युग माणसाला समाजापासून अलग करते आहे असं म्हणतात पण ही बाई तर पूर्णपणे समाजमय झाली आहे. लेखनाचे मानधन सुधा मूर्ती सामाजिक कार्याला अर्पण करतात. -मधुसूदन आदवाणीकर ...Read more

 • Rating StarDAINIK SAMANA 13-05-2007

  समाजमनाची गमतीदार निरीक्षणे... सुधा मूर्ती या मूळच्या सुधा कुलकर्णी. म्हणजे मराठी नव्हे; कानडी भाषिक. इन्फोसिस या आंतरराष्ट्रीय ख्यातनाम संगणक कंपनीचे जनक नारायणमूर्ती यांच्या त्या पत्नी. आपण मराठी माणसं जरासं दक्षिणी वळणाचं नाव दिसलं की ‘मद्रासी’ कंवा ‘साऊथ इंडियन’ असा एक शेरा मारून मोकळे होतो. प्रत्यक्षात दक्षिण हिंदुस्थानात कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र आणि केरळ असे चार प्रांत आहेत. तिथल्या भाषा वेगवेगळ्या आहेत. किंबहुना कोटेकोरपणे बोलायचं तर आपला महाराष्ट्रही दक्षिण हिंदुस्थानातच मोडतो ही सगळी वस्तुस्थिती आपल्या गावीही नसते. तर सुधा मूर्ती या कन्नड भाषिक असून स्वत: अव्वल दर्जाच्या सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेत. इन्फोसिसच्या उत्तुंग यशात आपल्या पतीइतकाच त्यांचाही वाटा आहे. अलीकडे त्या समाजकार्य आणि लेखनाकडे वळल्या आहेत. वेगवेगळ्या इंग्रजी नियतकालिकांमधून त्यांचे स्तंभ नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांचे लेखन लोकप्रिय आहे. श्रीमंताच्या बायकांना वेळ घालवण्यासाठी समाजकार्य करणं आणि इंग्रजीतून(च) लेखन करणं यात नवीन काहीच नाही. हा ब्रिटिश मडमांचा वारसा आहे. आपल्याकडे त्यांची ‘अतिविशाल महिला मंडळ’ म्हणून टिंगल होत असते. पण सुधा मूर्तीचे काम आणि लेखन या दोहोंची जातकुळी वेगळी आहे. एकतर त्या श्रीमंत नवऱ्याची कर्तृत्वशून्य बायको नाहीत. उलट प्रचंड गुणवत्ता आणि प्रचंड कर्तबगारी गाजवून आता त्या सामाजिक कार्यात उतरल्या आहेत. अशा लोकांचं लक्ष बहुधा कायम युरोप-अमेरिकेकडे लागलेलं असतं. तिथलं ते सगळं चांगलं नि इथलं ते सगळं टाकाऊ अशी त्यांची धारणा असते. सुधा मूर्तींची इथल्या समाजासाठी काहीतरी काम करण्याची भावना, तळमळ अस्सल आहे. त्या कामाला त्यांनी पाश्चिमात्त्य पद्धतीच्या शिस्तीची योजनाबद्धतेची उत्तम जोड दिल्यामुळे सोन्याला सुगंध लाभला आहे. या सामाजिक कार्यात सतत येणाऱ्या कडू-गोड गमतीदार अनुभवांवरच त्या सतत लिहित असतात. प्रस्तुत ‘पुण्यभूमी भारत’ हे अशाच अनुभवकथांचं अतिशय वाचनीय पुस्तक आहे. हिंदुस्थानला जगाचं लघुरूप (मिनिएचर ऑफ दि वर्ल्ड) म्हटलं जातं. जगातल्या सर्व प्रकारच्या वृत्ती-प्रवृत्ती इथे आढळतात. टोकाची बदमाशगिरी आणि टोकाचा प्रामाणिकपणा, आत्यंतिक श्रीमंती आणि आत्यंतिक दारिद्र्य, अस्सल साधू आणि पक्के भोंदू असे सर्व मानवी नमुने इथे सापडतात. सुधाबार्इंच्या अनुभवकथांमधून त्यांच्या स्वत:च्या सुंदर भाष्यासह ते आपल्यासमोर येतात. त्या भाष्यामधून आपल्या हेही लक्षात येतं की, लेखिकेची काही चिरंतन अशा मानवी मूल्यांवर दाट श्रद्धा आहे आणि काळ कितीही बदलला तरी ही मूल्यं अचल, अढळ, शाश्वत अशीच राहणार आहेत. ती मूल्यंच चांगलं जीवन जगू पाहणाऱ्यांना आत्मबळ देणार आहेत. हिंदुस्थान ही पुण्यभूमी असल्याचा हाच तर निकष आहे. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

 • Rating StarDAINIK AIKYA 27-05-2007

  संवेदलशील मनाची प्रचिती... ‘पुण्यभूमी भारत’मध्ये सुधा मूर्ती यांनी वेगवेगळे अनुभव सांगणाऱ्या ३१ लेखांचे संकलन केले आहे. त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत आणि विश्ववस्तनिधीद्वारे अनेक समाजोपयोगी कार्यांना सक्रिय मदत देत असतात. कर्नाटकात लहान लहन खेडेगावातही फाउंडेशनद्वारे त्यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय’ हा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबवला आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत, आपत्तिग्रस्तांना मदत, वसतिगृहांना मदत, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, वृद्धाश्रमांना सहाय्य, रुग्णालयांना इमारती व उपकरणे यासाठी अनुदान अशा निरनिराळ्या मार्गांनी समाजाकडून जे मिळते ते समाजाला परत देण्याचा धर्म त्या निभावत आहेत. मात्र हे दान सत्पात्री असावे यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्या वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होतात; सेवाभावी व्यक्ती आणि संस्था यांच्या कामाची प्रत्यक्ष माहिती घेतात; चांगल्या कामासाठी योग्य ती मदत करतात. कुठल्याही प्रकारची बडिवार न माजवता, प्रसिद्धीची अपेक्षा न धरता त्या मदतीसाठी तत्पर असतात. सुधा मूर्ती यांचे अनुभव रेखाटणारे तीन-चार पृष्ठांचे लेख. पण ते वाचकांच्या हृदयाला भिडतात. त्यामुळेच त्यांच्या या पुस्तकांचे अनुवाद वीस-बावीस भारतीय भाषांमध्ये अल्पावधीतच झाले. सुधा मूर्ती यांचे हे बरेचसे अनुभव इन्फोसिस फाउंडेशनच्या निमित्ताने भेटणाऱ्या व्यक्तींबद्दलचे आहेत आणि त्याद्वारे मानवी स्वभाववृत्तीच्या वेगवेगळ्या पैलूंचे जे दर्शन त्यांना घडते; ते कधी त्यांना विस्मयचकित करणारे ठरले तर कधी उद्विग्न करणारे वाटले; आपल्याला जाणवलेले. हे भलेबुरे अनुभव लिहून काढण्यात आणि सांगण्यात त्यांना स्वारस्य वाटते. ते अनुभव आपल्या वाचकांना वा सुद्धा कथाकथन करण्यात, शेअर करण्यात त्यांना आनंद वाटतो. आपल्याला आले तसेच अनुभव इतरांनाही येत असणार आणि त्यायोगे त्यांनाही मानवी स्वभाववृत्तीतील चांगुलपणा किंवा उथळपणा, नि:स्वार्थीपणा किंवा आपमतलबीपणा, आत्मियता किंवा तुटकपणा जाणवला असणार... त्यावरून योग्य तो बोध घेणे, सावधगिरी घेणे आणि वाईट अनुभव आले तरी त्यामुळे आपले चांगुलपण न विसरता काम करीत राहणे; नकारात्मक अनुभवांमुळे मानवतेवरचा विश्वास डळमळीत होऊ न देणे... या दृष्टीने त्या वाचकांचे मनोबलही जणू परिपुष्ट करतात. खूप माणसे बघितल्याने प्रामाणिक माणूस कोण आणि ढोंगी माणूस कोण हे सहजपणे ओळखता येते आणि ढोंगी माणसाला ‘एक्स्पोझ’ करण्याची संधीही त्या वाया दवडत नाहीत. तिबेटच्या ल्हासा शहरातील जोखांग मंदिरात गेल्यावर तेथील मठाधिकारी सुधा मूर्तींशी हस्तांदोलन करून एक पांढरा स्कार्फ त्यांच्या खांद्यावर ठेवतात; तर तेथे दर्शनाला आलेली एक वृद्ध स्त्री त्यांचा हात हाती घेऊन त्याचे चुंबन घेऊन काहीतरी पुटपुटते; आणि तिचा नातू इंग्लिशमध्ये सांगतो, ‘माझ्या आजीचं वागणं मनावर घेऊ नका. ते विचित्र वाटेल तुम्हाला... पण ती तुमचे आभार मानते. तुमच्या देशाने आमच्या दलाई लामांना सन्मानपूर्वक आश्रय दिला आहे. आम्ही दलाई लामांना साक्षात परमेश्वर मानतो. माझी आजी त्यांची नि:स्सीम भक्त आहे. ती तुम्हाला ‘भारत ही पुण्यभूमी आहे’ असे सांगत होती. इन्फोसिस फाउंडेशनच्या कामाच्या निमित्ताने भेटणाऱ्या व्यक्ती, देणगीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या व्यक्ती, खोटे कारण सांगून मदत मिळवणाऱ्या व्यक्ती, मदतीच्या कार्यात अडथळा आणणारे महाभाग, चांगल्या कामाला मदत देण्याची संधी असूनही त्याबाबत अनुत्साह वा तिटकारा दाखवणाऱ्या व्यक्ती, सवलतीत वा मोफत उपचार मिळविण्यासाठी फाटके कपडे घालून येणाऱ्या सुखवस्तू कुटुंबातील व्यक्ती, एकापेक्षा अधिक वेळा रांगेत उभे राहून ब्लँकेट्स वगैरे दोन-दोनदा घेऊ पाहणाऱ्या व्यक्ती यांचे किस्से या लेखांमध्ये आले आहेत. आपल्या मुलाला– सोमनाथाला कॅन्सर झाला आहे, उपचारासाठी पैसे हवेत म्हणून मदत घेऊन जाणारा त्याचा बाप रामप्पा सुधा मूर्ती यांजकडून मिळालेल्या मदतीच्या आधारे इतरांकडूनही पैसे गोळा करतो आणि सोमनाथवर उपचार न करता स्वत:चं घर बांधतो; सोमनाथ मरणारच आहे तर त्यावर उपचारापोटी उगाच खर्च कशाला करा, असा रामप्पाचा युक्तिवाद असतो.’ (वात्सल्य) चार हप्त्यात पैसे परत करीन असे आश्वासन देऊन गणपती हा इन्फोसिसकडून एक लाख रुपये गावातील पाणपोईसाठी नेतो. इमारतीचे उद्घाटन सुधा मूर्तींच्या हस्ते होते. त्यावेळी इन्फोसिसच्या ‘मदतीचा चेक’ म्हणून दहा हजार रुपये देतो व उरलेल्या ९५ हजार मध्ये पाणपोईचे काम झाले असे सांगतो. मात्र तेथील संगमरवरी शिलेवर ‘गावच्या प्रेमासाठी गणपतीकडून भेट’ असा मजकूर असतो. पैसा इन्फोसिसचा, श्रेय स्वत:ला असा प्रकार (देणगी). इन्फोसिस फाउंडेशनमुळे सुधा मूर्ती यांना सेलिब्रेटी स्टेट्स लाभलेली आहे. लोक सुधा मूर्ती यांना कार्यक्रमांना बोलावतात, फोटो वगैरे काढून घेतात; पण कधीकधी साध्या चहाचे वा जेवणाचेही आतिथ्य करायचे विसरतात. याचेही काही मजेदार नमुने ‘दुधारी सुरी’ मध्ये आले आहेत. सुधा मूर्ती यांच्या अनेक जुन्या-नव्या मैत्रिणींचे किस्सेही या पुस्तकात येतात. बोलकी राधा व अबोल शांत रोहिणी या त्यांच्या विद्यार्थिनी म्हणून हाताखालून गेल्यावर काही काळाने भेटतात, तेव्हा त्यातील रोहिणीमध्ये न्यूनगंडाची भावना प्रबळ दिसते; त्याबद्दलची कारणमिमांसा ‘निवडीचं’ स्वातंत्र्यामध्ये आलेली आहे. संपन्न ‘राधा, रोहिणीच्या मुलांसाठी भारी भेटी आणते तेव्हा ती आपल्याला हिणवते आहे, असे रोहिणीला वाटत राहते. सुधा मूर्ती तिला सल्ला देतात, ‘भेटीमागची भावना लक्षात घे. उगाच न्यूनगंड बाळगू नकोस. त्यामुळे तुझ्यात वा राधामध्ये दुरावा निर्माण होईल. सावित्री ही कॉलेजमधील सहकारी प्राध्यापिका. ती दुसऱ्याबद्दल कायम टीकात्मक बोलत असते. अफवा पसरवत असते. तेव्हा लेखिका तिला एकदा सांगते, ‘अशा अफवांमुळे कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे तिच्याविषयी बोलणं, अफवा पसरवणं ही वाईट गोष्ट आहे. अशा व्यक्तींपासून लोक नेहमी चार हात दूर राहणं पसंत करतात. (गॉसिप) आपली आजी अंबाबाई... अंबाक्का... हिनं गावात शंभरावर बाळंतपणं केली. त्यामुळे तिला लोक शंभर मुलांची माता म्हणत. आजी एकदा लेखिकेला म्हणते, ‘मला फक्त दहा मुलं झाली; पण या दोन हातांनी मी गावातल्या शंभरावर मुलांना जनम दिला आहे. अक्का, तू तुझ्या आयुष्यात तुझ्या पोटच्या कितीही मुलांना जन्म दे. पण तरीही तू सुद्धा शंभर मुलांची आई हो.’ या पुस्तकातील काही लेख हे पाकिस्तान, तिबेट, दक्षिण आफ्रिका, ब्लॅक फॉरेस्ट येथील भेटीच्या संदर्भातील आहेत. पाकिस्तानात अगदी भारतात असल्यासारखे वाटते. पण तेथील म्युझियमच्या प्रवेशासाठी शुल्क मात्र ‘परदेशी’ म्हणून भरमसाट घेतले जाते असा अनुभव त्या नमूद करतात. सुधा मूर्ती यांच्या व्यक्तिमत्वातील प्रांजल, निरपेक्ष पैलूंमुळे त्यांच्या या अनुंभवांमध्ये वाचकांनाही सहजपणे सहभागी होता येते. त्यांच्या मैत्रिणी, त्यांचे प्रवास, त्यांचे इन्फोसिसमार्फत चाललेले कार्य, त्यांची समाजसेवा याबद्दल जाणून घेता आल्याने त्यांच्याबद्दलची जवळीक वाटते. त्यांच्या या लेखात अनेक सुविचार, सुभाषिते विखुरलेली आहेत. ती लक्ष वेधून घेतात. जो माणूस स्वत: असमाधानी असतो तो दुसऱ्याला कधीच आनंद देऊ शकत नाही. तुमचा दृष्टिकोन जर चांगला असेल तर तुम्ही स्वत:भोवती स्वर्ग निर्माण करू शकता... तुम्ही कुठेही असलात तरी! माणसाचं सौंदर्य त्याच्या चेहऱ्यावर जे तेज असतं त्यातच असतं. ते काही दागिन्यांमध्ये नसतं. पैसा, संपत्ती या गोष्टी काळानुसार येतात, जातात. पण खरी घट्ट धरून ठेवायची असते ती मात्र मैत्री. निरागसपणा हा माणसाच्या ठायी असणारा विश्वास आणि श्रद्धा यामुळे आलेला असतो. लहान मूल हे नेहमीच निरागस असतं. आपण मोठी माणसं अज्ञानी असलो तरी निरागस नसतो. आपण स्वत: संकटांशी झुंजत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळाच! इथे तुमचे शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाकशाचा संबंध नसतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. ही सर्व निरीक्षणे आपल्याला अंतर्मुख लागते. ही सर्व निरीक्षणे आपल्याला अंतर्मुख करतील, आपल्याला विशिष्ट कसोटीच्या वेळी मार्गदर्शन करतील. ‘पुण्यभूमी भारत’ मधील लेखांमुळे जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश पडतो. सुधा मूर्ती यांच्या अनुभवविश्वात सहज प्रवेश मिळवून देणारे हे पुस्तक आहे. संवेदलशील मनाची प्रचिती ...Read more

 • Rating StarMAHARASHTRA TIMES 26-11-2006

  सुधा मूर्ती यांची एकच एक ओळख नाही. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या समाजकार्य करतात, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आवडीने वाचल्या जातात, आता तर त्या मालिकांमध्येही काम करू लागल्या आहेत! त्यांचं मूळ लेखन इंग्रजीत असलं तरी त्याच्या अनुवादित पुस्तकानाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. अशाच त्यांच्या एका पुस्तकासंदर्भात... अनुभवाची शिदोरी … ‘पुण्यभूमी भारत’ या पुस्तकात सुधा मूर्ती यांनी ‘इन्फोसिस’च्या माध्यमातून तसंच भटकंती करताना आलेल्या अनुभवांविषयी लिहिलं आहे. वेगवेगळ्या घटना आणि प्रसंग एका समान धाग्यात बांधले आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनच्या निमित्ताने त्यांनी समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी संवाद साधला. त्यांच्यासाठी काम करताना अनेक चांगलेवाईट अनुभव त्यांच्या वाट्याला आले. त्यातले अनेक प्रसंग आपल्याला व्यथित तर कधी चकीत करतात. मूर्ती यांच्या लेखनाचं वेगळेपण म्हणजे त्यांनी आपल्या अनुभवांचा बडेजाव न बाळगता ते स्पष्टपणे मांडलं आहे. कधी कधी वाईट अनुभवांमुळे त्या व्यथितही होतात, तर काही ठिकाणी तडजोड करतात. अशी तडजोड करणं ही गरजच होती, हेही त्या मान्य करतात. कदाचित त्यामुळेच या पुस्तकातले छोटे-छोटे प्रसंगही अत्यंत परिणामकारक ठरतात. त्सुनामीग्रस्ताना मदत करणाऱ्या घटनांतून जगात काही चांगली आणि काही पोकळ डौल मिरवणारी माणंस आहेत, हे दिसून येतं. तर गरीब, झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांची आभाळाएवढी मनं पाहायला मिळतात. तर श्रीमंतीत वाढणारी काही विचारी तर समाजाशी काही देणंघेणं नसलेली. माणसंही त्यांनी मांडलेल्या प्रसंगातून दिसून येतात. अगदी आपल्या मैत्रिणींच्या स्वभावातले गुणदोषही त्या एखाद्या घटनेच्या निमित्ताने लिहून जातात. त्यातून त्यांना, असंही वागणारी माणसं असतात बरं का, असंच जणू सांगायचं असतं. किंबहुना लोकांच्या अशा वागण्याला आपल्याकडे काहीच उत्तर नाही, त्यामुळे आपण आपलं काम करत जायला हवं, वेळप्रसंगी आपल्याला त्यांच्या विरोधात जावं लागलं तरी चालेल, असा पवित्रा त्या प्रत्येक प्रसंगातून मांडतात. काहींना हे प्रेरणादायी वाटेल तर काहींना आपल्याच मैत्रिणींचा केलेला उद्धारही वाटू शकेल. मूर्ती यांच्या पुस्तकातली पात्रं केवळ खरीच नाही तर वैशिष्ट्यपूर्ण आहेत. शिवाय अधूनमधून त्यांच्या अध्यात्मिक मतांना थोडक्यात वाट करून दिली आहे. केवळ कोणाच्या तरी भजनी लागण्यापेक्षा आपल्या देशवासियांची जमेल तशी सेवा करण्याचा मंत्र मात्र कोणी घेईल का, हाच प्रश्न आहे. अनुवादक लीना सोहोनी यांनी पुस्तकातल्या भाषेचा साधेपणा कायम ठेवला आहे, ही दखल घ्यावी अशी बाब आहे. -अपर्णा पाटील ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

MAZE TALIBANI DIWAS
MAZE TALIBANI DIWAS by ABDUL SALAM ZAEEF Rating Star
DAINIK LOKSATTA (LOKRANG) 20-01-2019

तालिबानचे अंतरंग... अफगाणिस्तान हा भारतीय उपखंडातील एक महत्त्वाचा देश. असंख्य समस्यांनी ग्रासलेला. राजेशाहीपासून साम्यवादी एकाधिकारशाहीपर्यंत सर्व प्रकारच्या राजवटींचे दशावतार पाहिलेला. या ना त्या कारणाने गेली तीन ते चार दशके सतत आंतरराष्ट्रीय स्तरार चर्चेत राहिलेला. अशा या देशातून सोव्हिएत आक्रमक फौजेला परतवून लावण्याच्या इराद्याने उभी राहिलेली कट्टर मुजाहिदीनांची संघटना- ‘तालिबान’! इस्लाममधील ‘जिहाद’च्या संकल्पनेची झिंग चढलेल्या या फौजेला अमेरिकेने पोसले नसते तरच नवल मानावे लागले असते. रशियन कैद्यांच्या शरीराची सालडी ते जिवंत असताना सोलणाऱ्या आणि त्या सैनिकांच्या आक्रोशात आसुरी आनंद मानणाऱ्या या तालिबान्यांना एके काळी अमेरिकेने गौरवलेदेखील. तथापि, एकदा सोव्हिएत फौजा माघारी परतल्यानंतर या मुजाहिदीनांना जाणीव झाली ती अमेरिका तिच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या रक्षणाच्या नावाखाली अफगाणिस्तानात करत असलेल्या घुसखोरीची. मग ते अमेरिकेच्या साम्राज्यवादाविरुद्धही त्याच त्वेषाने लढू लागले. अमेरिकेने लष्कर पाठवून आणि आपल्या मर्जीनुसार राज्य चालवायला तयार असणाऱ्या नेत्यांना सत्तास्थानांवर बसवून तालिबानचे आव्हान मोडून काढायचा बरीच वर्षे प्रयत्न केला, पण तो सपशेल फसला. त्या देशातून बाहेर कसे पडायचे, हा अमेरिकी प्रशासनाला भेडसावणारा एक मुख्य प्रश्न आहे. अफगाणिस्तानच्या ७० टक्के प्रदेशावर तालिबानची हुकमत तरी आहे किंवा धोक्याचे सावट तरी आहे. अशी ही संघटना, तिची ध्येयधोरणे, तिची अंतर्गत रचना आणि सत्तासंघर्षांबद्दल आपल्याला पुरेशी माहितीच नसते. विशेषत: पाकिस्तानबरोबर या संघटनेचे नेमके संबंध कसे आहेत, याबद्दल भले भले राजकीय नेतेही अंधारात चाचपडताना दिसतात. त्या दृष्टीने अब्दुल सलाम झैफ या तालिबानी राजनैतिक अधिकाऱ्याचे आत्मकथन- ‘माझे तालिबानी दिवस!’ हे अनुवादित स्वरूपात का होईना, मराठी वाचकांना आता उपलब्ध झाले आहे. ‘माय लाइफ विथ द तालिबान’ हे मूळ इंग्रजी पुस्तक २०१० सालीच प्रसिद्ध झाले होते आणि चर्चेतही होते. पुस्तकाच्या प्रारंभीच झैफची अवघ्या सात ओळींची, परंतु ‘स्वातंत्र्य’ आणि ‘लोकशाही’ या दोन मूल्यांच्या व्यावहारिक आविष्कारातील प्रचंड अंतर्विरोधांवर अत्यंत तीव्र, बोचरी टीका करणारी कविता वाचायला मिळते. ग्वान्टानामो तुरुंगात असताना झैफने लिहिलेल्या या कवितेचा प्रमोद जोगळेकरांनी केलेला उत्कृष्ट भावानुवाद झैफबद्दल आस्था निर्माण करतो. पुढे मूळ पुस्तकाच्या संपादकांनी लिहिलेला प्रदीर्घ परिचयपर लेख आहे. त्यात झैफचे कंदहार शहराशी, त्या शहराचे अफगाण इतिहासाशी, त्या शहरात जन्मलेल्या तालिबान चळवळीच्या मूळच्या व नंतर बदलत गेलेल्या स्वरूपाचे त्या अभागी देशातल्या रक्तरंजित संघर्षांशी असणारे जवळचे नाते उलगडून सांगितले आहे. त्यापाठोपाठ असलेली पुस्तकातील पात्रांची यादी वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यानंतर न्यू यॉर्क विद्यापीठातील ‘आंतरराष्ट्रीय सहकार्य केंद्रा’तील एक तज्ज्ञ बार्नेट रुबिन यांची प्रस्तावना थोडक्यात झैफच्या या आत्मकथनाचे महत्त्व स्पष्ट करते. पाठोपाठ वाचायला मिळते खुद्द झैफची भूमिका. या नऊ पानी निवेदनात ज्या चार कारणांसाठी तो हे आत्मकथन लिहायला तयार झाला, त्या कारणांचे स्पष्टीकरण मिळते. यापुढील मुख्य पुस्तकाच्या २२ प्रकरणांमध्ये झैफने अफगाणिस्तानातील संघर्षांचे असंख्य कंगोरे उलगडून दाखवले आहेत. त्या निवेदनात त्याच्या वैयक्तिक जीवनाचे उभे-आडवे धागे असे विणले गेले आहेत, की हे पुस्तक एकाच वेळी दोन स्तरांवरील घटनाचक्राचे बहुमिती चित्रण करते आहे असे आपल्याला जाणवते. आपण त्यात अधिकाधिक गुंतत जातो. असंख्य प्रसंगांतले थरारनाटय़ पोहचवण्यात अनुवादक चांगलेच यशस्वी झाले आहेत. प्रत्येक पानावरील मजकुराशी संबंधित संपादकीय टिपा त्याच पानावर तळटिपांच्या स्वरूपात वाचायला मिळत असल्यानेही वाचकांची बरीच सोय झाली आहे. अफगाणिस्तानच्या भू-सामरिक महत्त्वामुळे गेली कित्येक दशके तो देश बडय़ा देशांच्या सत्तासंघर्षांत तर पिसला गेला आहेच; परंतु प्रत्येक सत्तांतरानंतर सत्ताधारी अफगाण नेत्यांच्या विरोधात काही अफगाण नेते उभे राहिलेच आहेत. या अंतर्गत यादवीमुळे त्या देशात निर्माण झालेली विदारक स्थिती पुस्तकभर एखाद्या पार्श्वभूमीप्रमाणे सतत आपल्याला जाणवत राहते. अफगाणिस्तानातील परस्पर विरोधी गटांपैकी कुणाला तरी हाताशी धरून आपापले राष्ट्रीय स्वार्थाचे घोडे पुढे दामटू पाहणारे अन्य देशांचे नेते झैफच्या संतापाचे लक्ष्य बनावेत यात नवल नाही. परंतु पाकिस्तानचे लष्करशाह जनरल मुशर्रफ यांच्याबद्दल झैफने या पुस्तकात लिहिले आहे, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. झैफ पाकिस्तानमध्ये तालिबानचा वकील म्हणून काम करत होता, तेव्हा त्याची मुशर्रफ यांच्याशी एकूण चार वेळा भेट झाली होती. त्या चारही भेटींचे अगदी थोडक्यात वर्णन करून झाल्यावर झैफने अवघ्या एका परिच्छेदात मुशर्रफ यांच्या हिडीस राजवटीबद्दल जी आगपाखड केली आहे, ती मुळातूनच वाचण्याजोगी आहे. ‘पाकिस्तान बीफोर एव्हरीथिंग’ या आत्मकथनपर पुस्तकात मुशर्रफ यांनी तालिबान्यांना व इतरही काही मुसलमानांना आपण कसे निर्दयपणाने वागवले, याची कबुली दिली होती. मुशर्रफ यांनी पैशाच्या मोबदल्यात अनेक अफगाण मुजाहिदीनांना अमेरिकेला विकले होते. ते लोक ग्वान्टानामोत खितपत पडले होते. त्या यमयातना भोगाव्या लागलेल्या अफगाणी कैद्यांमध्ये खुद्द अब्दुल झैफचाही समावेश होता आणि तब्बल चार वर्षांच्या तशा तुरुंगवासातून काही मित्रांच्या प्रयत्नांमुळे २००५ साली तो सुटला. हा संदर्भ लक्षात घेतला म्हणजे २०१० साली लिहिलेल्या या आत्मकथनात झैफने ‘मुशर्रफ म्हणजे पाकिस्तानच्या इतिहासाला लागलेला काळा डाग आहे’ असे म्हटल्याबद्दल मुळीच आश्चर्य वाटत नाही. मुशर्रफना ‘इस्लामशी गद्दारी करणारा ढोंगी, क्रूर नेता’ असे म्हणणारा झैफ अमेरिकेवरील विध्वंसक हल्ल्याबद्दल चुकूनही पश्चात्ताप व्यक्त करत नाही, हेही लक्षात घेण्याजोगे आहे. इस्लामचा नारा देत पुढे सरसावणारे सर्व जण एकाच झेंडय़ाखाली एकत्र उभे ठाकत नाहीत. त्या झुंडीत अनेक जण आपापले स्वतंत्र झेंडे मिरवत पुढे घुसण्याच्या प्रयत्नात असतात, हे वास्तव झैफच्या आत्मकथनामुळेही पुन्हा प्रकर्षांने पुढे येते. असे अनेक मुद्दे विचारासाठी समोर येत जातात आणि तालिबान हे प्रकरण कसे आणि का जगावेगळे आहे, हे हळूहळू समजू लागते. हे या आत्मकथनाचे यश आहे. -आनंद हर्डीकर ...Read more

VANSHVRUKSHA
VANSHVRUKSHA by S. L. Bhairappa Rating Star
Smita Pawar

Vachla ahe...nice book👌