* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MALANGATHA : BHAG 2
  • Availability : Available
  • ISBN : 9788171661442
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 316
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE EARLY MORNING HOURS IN THE SMALL VILLAGE IN THE MIDST OF THE HILLS AND MOUNTAINS. ALL THE HOUSES LOST IN THE SWEET DREAMS AT THOSE EARLY HOURS, WITH JUST SOME CANDLE LIGHT IN THE `PADWEE` OR `OSARI`; IN THAT DIM LIGHT IS SITTING MALAN, NEAR THE STONE GRINDER; HER ONE HAND WITH THE COLOURFUL BANGLES RESTING ON THE WOODEN BAMBOO MAKING THE GRINDER MOVE IN A CIRCULAR MOTION AND THE OTHER INSERTING HANDS FULL OF `JONDHALE` FROM THE SACK KEPT ON HER SIDE. THE RHYTHMIC SOUND OF THE GRINDER, MALAN`S CURVY MOVEMENTS AND MALAN HERSELF LOST IN IT; HER WORDS STARTED FLOWING OUT LIKE THE FLOUR OUT FROM THE GRINDER, SMOOTHLY, RHYTHMICALLY. IN THE RHYTHM, SHE HARDLY REALIZED THAT HER WORK WAS FINISHED, ONE AFTER THE OTHER THE STANZAS WERE BLENDED IN EACH OTHER, HARMONIOUSLY, MAKING IT DIFFICULT TO DISTINGUISH THEM FROM EACH OTHER. THESE STANZAS WERE FULL OF THE EVENTS FROM HER LIFE; WRITE FROM HER CHILDHOOD TO THE MATURITY OF A WOMAN, FROM LOVE TO AFFECTION, FROM LIFE TO DEATH, FROM THE BIRTH OF A CHILD TO THE DEATH OF SOMEONE NEAR AND DEAR...LEAVING NOTHING OUT.
‘...पहाटेची वेळ. एका डोंगरदरीत विसावलेले एक खेडेगाव. सर्व घरे साखरझोपेत असलेली. पण घरातील ओसरीशी वा पडवीशी एक ठाणवई मिणीमिणी उजळत असलेली. त्या प्रकाशात जात्याशी बसलेली एक मालन. एक मांडी घालून, एक पाय लांब सोडलेला. तिचा काकणांनी भरलेला हात जात्याचा खुंटा धरून जाते फिरवीत असलेला. दुसरा हात मधून मधून बाजूच्या सुपातील जोंधळे मुठीने घेऊन जात्याला भरवीत असलेला. जात्याचा तो मंद सुरातील घर्र घर्र असा वळणे घेणारा आवाज. दळतानाच्या हालचालींची मालनीची वळणदार लय आणि यात एकरूप झालेली ती मालन. जसे पीठ जात्यातून झरत जाते, तशा तिच्या ओठांतून शब्दकळ्या उमलू लागतात. ओव्यांमागून ओव्या गात असता दळण कधी संपते, तिला कळत नाही. त्या ओव्याही ओळीला ओळ जोडून, घोळून घोळून, उंच स्वरात गायच्या. ओवीच्या शेवटच्या ओळीच्या अखेरीस एक लांब असा हेल देऊन त्याच्या टोकानेच दुसरी ओवी उचलायची. या ओवीत काय नसायचे? अवघ्या स्त्रीजीवनाला त्यांनी स्पर्श केलेला असायचा. सुपली-कुरकुळीच्या खेळापासून घाण्याच्या बैलासारख्या ओढलेल्या कष्टांपर्यंत. न्हाणवलीच्या सुखद सोहळ्यापासून मरणवेळेच्या काळापर्यंत. शृंगाररसापासून ईश्वराशी जडलेल्या सौहार्दरसापर्यंत. पुत्रजन्मापासून वैधव्याच्या आकांतापर्यंत, जे जे म्हणून स्त्रीला भावले, ते सर्व या ओवीत आहे. ते एक अमृतानुभवाचे अथांग असे मानससरोवर आहे...’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MALANGATHABHAG2 #MALANGATHABHAG2 #मालनगाथा भाग२ #REFERENCEANDGENERAL #MARATHI #INDIRASANT #इंदिरासंत "
Customer Reviews
  • Rating StarAjinkya Vishwas

    कंथ पूशीत्यातीऽ रानी माह्यारवास कसाऽ केळीच्या पानावरऽ जिरेसाळीचा भात तसाऽऽ एका कार्यक्रमात डॉक्टर अरूणा ढेरे यांनी कवितेबद्दल बोलताना इंदिराबाईंच्या कामातल्या या ओळी म्हणून दाखवल्या. ऐकताना कानाला फार सुंदर वाटत होत्या. सर्वांची नकळत दाद निघून ेली. त्यापुढे त्या सांगताना म्हणाल्या,त्याचा अर्थ थोडक्यात देत आहे. (खाली फोटोमध्ये देखील आहे तो.) आपल्याला केळीच्या पानावर वाढलेला भात आवडतो, ती भावनाही आवडते. पण सासर-माहेरचे अंतर दाखवताना त्यांनी हेच उदाहरण का निवडले असावे, तर केळीचे पानही सुंदर असते, जिरेसाळी भातही सुरेख चवीला असतो, पण तो केळीच्या पानावर वाढला असता, त्याची आणि पानाची काही प्रक्रिया होऊन एक कळत-नकळत अशी कडवट चव उतरते त्या भातात. आयुष्य असेच चांगले असले तरी मनाला कुठेतरी ती हलकी चव जाणवत असते, केळीच्या पानावरच्या जिरेसाळी भातासारखी! पूर्ण सभागृह थोडा वेळ स्तब्ध झाले होते. शब्द ओळखीचे असतात, त्यामागच्या भावना, त्या त्या काळात ज्या उपमा असतात त्याप्रमाणे येत राहतात. आपले राहणीमान बदलते, वाचन बदलते, जुन्या संस्कृतीतील काही शब्द नजरेआड होतात. शब्द जातातच, पण त्यामागच्या काळजाला हात घालणारे अर्थ पण सोबत घेऊन जातात. अरुणाबाईंना नंतर ही आठवण करून दिली असताना, त्यांनी कविता कशी असावी आणि कशी उमजून घ्यावी याचे एक छानसे उदाहरणच, त्या इंदिराबाईंच्या सहवासात असताना शिकल्या होत्या ते दिले. या ओळी शोधता शोधता ‘मालनगाथा’ मिळाली. संतकाव्य, पंतकाव्य आणि इतर काव्यप्रकार हे काळानुरुप कमी-अधिक प्रमाणात जिवंत राहतात. पण गावात राहणार्‍या स्त्रिया- त्या मालन स्त्रिया, ज्या पहाटे जात्यावर बसून दळण दळताना, त्यांची नित्यनेमाची कामं करत असताना ज्या ओव्या गुणगुणतात, त्या कुठे अशा शब्दबद्ध होतात? त्या ओव्या, त्या स्त्रियांच्या शतकानुशतकं चालत आलेल्या अनुभवांची शिदोरी इंदिराबाईंनी या ‘मालनगाथे’त एकत्र केली आहे. काय नाहीये त्यात? पहाट आहे, पाऊस आहे. सासर आहे, माहेर आहे, शृंगार आहे, ग्रहण आहे, देव आहे, चंद्रभागा आहे, आणि सर्वांचा पाठीराखा विठू माऊलीही आहे! कुठून-कुठून जमवलेल्या आणि नुसत्याच जमवलेल्या नसून त्यांचे अर्थ सोप्या भाषेत प्रभावीपणे आपल्या मनात उतरावेत अशी शब्दकळा लेऊन ‘मालनगाथा’ उभी आहे. दोन भागात असणार्‍या मालनगाथेचा नक्की आस्वाद घ्या आणि आपल्या वाडवडिलांनी, मायमाऊलींनी आपल्या मागे ठेवलेला हा समृद्ध ठेवा नक्की जपा. मालनगाथा भाग १ आणि २- मेहता पब्लिशिंग हाऊस (‘मालनगाथा’ पुस्तक आणि इ-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे. ) रवि राजेंद्र पवार ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 06-10-2002

    नवी गाथा... सुमारे हजार-पंधराशे वर्षांपूर्वीची कथा. महाराष्ट्रात सातवाहन हे प्रख्यात राजकुल राज्य करीत होतं. राज हाल सातवाहन हा मोठा रसिक, कलांचा, काव्यांचा भोक्ता. त्याने खास आज्ञा काढून आपल्या राज्यातल्या असंख्य लोककविता एकत्र केल्या. राजा स्वत: दखील कवी होता. काव्याचं मोल तो जाणत होता. म्हणूनच तर त्याने एवढा खटाटोप केला. हा कवितासंग्रह प्राकृत भाषेत आहे. तत्कालीन महाराष्ट्राचं समृद्ध लोकजीवन त्यातून मोठ्या सौष्ठवाने प्रकटलं आहे. मानवी स्वभावातले सर्व रस, सर्व विचार-विकार त्यांत दिसतात. त्या कवितांना म्हणतात गाथा. गाथांचे रचयिते समाजाच्या सर्व थरांमधले असले पाहिजेत, त्यात पुरुषांबरोबरच स्त्रियाही असल्या पाहिजेत, असं त्या गाथा वाचताना जाणवतं. सातवाहन घराण्याच्या मूळ पुरुषाने शालिवाहनाने महाराष्ट्राला स्व-राज्य दिलं. त्याच्याच कुळातल्या हाल राजाने या गाथा संग्रहाच्या रूपाने महाराष्ट्राल काव्याचं एक देशीकार लेणं दिलं. त्या संग्रहाचं नाव गाथा सप्तशती. शंभर कवितांचं एक अशी सात प्रकरणं म्हणून सप्तशती. शिवाय उत्तर विभागात तीनशे सहा कविता आहेत. म्हणजे या संग्रहात एकूण एक हजार सहा कविता आहेत. महाराष्ट्रातले एक विद्वान लेखक वैâ. सदाशिव आत्माराम जोगळेकर यांनी ‘गाथा सप्तशती’चं उत्तम संपादन, संकलन करून त्याचा एक सुंदर ग्रंथ बनवला तो १९५६ साली. सध्या तो अर्थातच दुर्मिळ आहे. महाराष्टातल्या एक नामवंत कवयित्री कै. इंदिरा संत यांनी राज हालाप्रमाणेच एक महत्त्वाचं कार्य केलं आहे. ते म्हणजे जात्यावरच्या ओव्यांच्या संकलनाचं. यंत्रयुगाने दळणदळण्याचं जातं हा प्रकारच हद्दपार केला. साहजिकच जात्यावरची ओवी हा प्रकारही रद्दबातल झाल. वासुदेव, गोंधळी, भारूडवाले, शाहीर हेही इतिहासजमा होत चाललेत. पण त्यांची कला ही आता सांस्कृतिकला ठरल्यामुळे तगून आहे. लोकांना ती गाणी आवडतात असं लक्षात आल्यामुळे आता त्यांचे जाहीर कार्यक्रम होतात. त्यांच्या ध्वनिफिती, चित्रफिती निघतात. एक चांगली कला त्यामुळे मृत होण्यापासून बचावली. पण जात्यावरच्या गाण्यांचं तसं नाही. जात्यावर प्रत्यक्ष बसल्याखेरीज त्या बायकांनाही ती गाणी आठवत नाहीत. त्यामुळे ती गाणी मिळवणं, साक्षेपाने त्यांचं संकलन, संपादन करणं हे काम फार निकडीचं आणि तितकंच संयमाची, चिकाटीची आवश्यकता असणारं होतं. जात्यावरच्या गाण्यांना जात्याच्या फिरण्याच्या लयीचा एक खटका असतो. त्या लयीवर त्यांची शब्दरचना बांधलेली असते. त्यामुळे ‘भरतार’चा ‘भ्रतार’ केला तर लयीचा खटका चुकतो नि सगळी कविताच भरकटल्यासारखी होते. जात्याच्या फिरण्याच्या विशिष्ट लयीवर बांधलेल्या या गीतांत साहित्यातले नवरस नुसते ओसंडून वाहत आहेत. महाराष्ट्राचं भाग्य खरोखरच थोर म्हणून ही जात्यावरली गाणी एकत्र करण्याची इच्छा इंदिरा संतांसारख्या जाणत्या कवयित्रीला झाली. शब्द, लय आणि रस यांची रसिक जाण असलेल्या इंदिराबाई गेली कित्येक वर्षं मिळतील तिथून या जात्यावरच्या गाथा गोळा करीत होत्या. त्यांचं एक मोठं बाडच बनलं होतं. पुष्कळ परिश्रमांनी, अनेक जाणत्या नि विद्वान सुहृदांच्या साहाय्याने इंदिराबार्इंनी एकशे सदुसष्ट गाथा, अतिशय सुंदर, साक्षेपी संपादनासह प्रसिद्ध केल्या. त्या संग्रहाचं नाव ‘मालनगाथा’ मालन म्हणजे मालिनी. घरोघरच्या मालिनी किंवा नेहमीच्या भाषेत लक्षुम्या पहाटे जात्यावर बसून दळताना ज्या ओव्या गात, त्या ओव्यांचा, गाथांचा संग्रह म्हणजे ‘मालनगाथा’. हे पुस्तक आलं १९६६ साली. आता २००२ साली मालनगाथेचा दुसरा भाग ‘मालनगाथा-२’ या नावाने आला आहे. दरम्यानच्या काळात इंदिराबाई अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या आहेत. प्रस्तुत संग्रहात सेहेचाळीस गाथा आहेत. पहिल्या संग्रहातल्या गाथा सासर-माहेर आणि पांडुरंग, भक्ती, खुद्द जातं हेच ईश्वराचं रूप अशा विषयांवर होत्या. या संग्रहातल्या गाथा ग्रामीण जीवनातल्या पाऊस, गुरंढोरं अशा विषयांप्रमाणेच स्त्री-जीवनातला शृंगार आणि मानवी जीवनाची अखेर मृत्यू अशा विषयांभोवती गुंफलेल्या आहेत. मुद्दाम वाचावीत, संगही ठेवावीत अशी ही पुस्तकं आहेत. हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक धन आहे. ‘गाथा सप्तशती’ तून ज्याप्रमाणे आपल्याला हजार-दीड हजार वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राच्या लोकजीवनाचं जिवंत चित्र दिसतं; तसंच या मालनगाथेतून यंत्रयुगापूर्वीच्या महाराष्ट्रीय स्त्रीच्या जीवनाचं अस्सल चित्र दृष्टीस पडतं. मेहता पब्लिशिंग हाऊसने पहिल्या भागाप्रमाणेच हाही भाग अत्यंत देखण्या स्वरूपात काढला आहे. ‘चंद्रमोहन कुलकर्णींचं मुखपृष्ठ आकर्षक. मात्र अजूनही पुढचे भाग येणार आहेत की काय, याचा उल्लेख हवा होता. कारण शिवकालीन मावळातल्या काही वरीरस प्रधान गाथा या दोन्ही संग्रहांत आलेल्या नाहीत. हा दुसरा भाग पाहायला इंदिराबाई आपल्याला असायला हव्या होत्या, असं राहून-राहून वाटतं. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    लोकसाहित्यातून उलगडणारे विविधरंगी स्त्रीरूप... लोकसाहित्य म्हणजे समूहमनाचा अशरीरिणी आविष्कार. येथे विशिष्ट व्यक्तीची नाममुद्रा नसली, तरी अनेक मनांचे जणु ते भावचंदन असते. काळाचा जणु एक अखंड प्रवाह लोकसाहित्याच्या अंतरंगातून वाहत राहिलेला असतो. म्हणून सृजनशील कलावंतालाही लोकसाहित्याच्या झळाळत्या रूपाचा मोह होत राहतो. इंदिरा संत हे मराठी काव्यक्षेत्रातील एक अत्यंत ठसठशीत नाव. त्यांनी लोकसाहित्याअंतर्गत काव्यक्षेत्रात डोकावून या निसर्गकन्यांच्या मालनीच्या मनात प्रवेश करून या मालनींच्या अनंक व्यथा आपल्यापुढे उलगडल्या आहेत. ‘मालनगाथा’ या ग्रंथात चार गाथागंठन आहेत. मालनी म्हणजे निसर्गकन्या. या निसर्गकन्यांचे जीवन विविध ऋतूंशी, पावसाशी, चंद्र-सूर्याशी निसर्गातील वृक्षसृष्टीशी बांधलेले. त्या भावसंबंधाची विविध लावण्यकळा या विविध गाथांमधून व्यक्त होतात. सुख - दु:ख, प्रेम, हुरहुरे, अपमान, सोसावा लागणारा छळ, आपल्या सृजनशीलतेच्या जाणिवेतून दाटणारे आपले वेगळेपण, वंशसातत्य.. अशा कितीतरी भावच्छटा येथे व्यक्त झाल्या आहेत. या मालनी निसर्गकन्या. त्यामुळे या लोकगीतांमधून व्यक्त झालेले विविध भाव अत्यंत मोकळेपणाने सहजपणाने व्यक्त झाले आहेत. कृत्रिमतेचा येथे स्पर्श नाही. येणाऱ्या प्रतिमाही जीवनातून सहज उमटलेल्या. त्यामुळे डोंगरातून झरणाऱ्या निर्मळ झऱ्यासारखे हे लख्ख अक्षरधन वाचताना आनंदाची एक वेगळी अनुभूती आपल्याला जाणवते. गाथागंठन एक चा विषय ‘वर्षागान’ असा आहे. पावसाळा हा या मालनींचा अत्यंत प्रिय विषय. मालनींची जीवनधारा हा वर्षाधारेशी संवादी अशीच. त्यामुळे स्त्रीमनाचे इतके उत्कट आणि हृद्य आविष्कार या ‘वर्षागान’ मध्ये आपल्याला भेटतात. वर्षागानमध्ये एकूण ५८ गाथांचा समावेश आहे. या गाथांमधून स्त्रीच्या भावनाची संवादी रूपात सृष्टीवर उमटणारी भावचित्रे अन्यत्र कुठे आढळणार नाहीत. इतकी विलक्षण आहेत. ‘शेताला जाईन उभी ऱ्हाईन बांधाला हाळी देईन भरतारला. माझ्या दूरच्या चांदाला. दुसरे गाथागंठन आहे मालनीच्या साजशृंगाराविषयी. हळद-कुंकू, चुडा आणि मंगळसूत्र यांचे कौतुक, लावण्य अनेक गाथांतून प्रकट होणे. हा सारा साजशृंगार कशासाठी, तर स्वत:च्या आनंदासाठी आणि मुख्य सजणासाठी. या गाथांमधून लोकजीवनातून व्यक्त होणारे जणु सांस्कृतिक वैभव आपल्यापुढे उलगडते. लोकसाहित्यातील स्त्रीची रूपे रेखाटावी अशा या चित्रमयी गाथा आहेत. आणि या साऱ्या साजशृंगारामागचे स्त्रीचे मनही येथे अलवारपणाने उलगडले आहे. तिसरे गाथागंठन ‘प्रणयचंद्राच्या कळा’ या नावाने आहे. प्रत्येक गाथाबंधन सहापासून पंधरा सोळापर्यंतही गाथांचा समावेश झालेला आहे. पाणवठ्यावर, ऋतुमतीचा सोहळा, मालनीचा रंगमहाल, उरता लागली भेटीची, मालनीची पहिली अस्मिता, डोहाळे. या शीर्षकांवरून या गाथागंठनामधील विषयाची सहज कल्पना येणे. विविध प्रणयरंगाचे लास्य या गाथांतून पाहायला मिळते. इंदिरा संतांनी या मालन गाथा (दोन) मध्येही लोकसाहित्याच्या अंतरंगातून प्रकट होणारी स्त्रीची खूपशी रूपे प्रकट केली आहेत. ही सारी रूपे माणसाच्या मूलभूत वृत्तीप्रवृत्तीशी नेमकेपणाने कशी जोडलेली असतात त्याचा आविष्कार येथे घडत राहतो. त्यामुळे आजही एकविसाव्या शतकात या गाथा सतेज वाटतात. कधीही हे पुस्तक हातात घ्यावे आणि अक्षरांच्या आरशातून ही स्त्रीरूपे न्याहाळत बसावे आणि माणसाच्या आदिबंधाशी आपली नाळ जोडून घ्यावी. मेहता पब्लिशिंग हाऊसने पुस्तक उत्तम काढले आहे. पांढरा शुभ्र कागद, उत्तम छपाई तर आहेच. चंद्रमोहन कुलकर्णीच्या रंगरेषांचे लावण्य मनात भरणारे असल्याने, पुस्तक हातात घेऊन न्याहाळावे असे निश्चित वाटते. हे ‘लोकधन’ रसिकांपुढे ठेवल्याबद्दल इंदिरा संत, मेहता निश्चितच अभिनंदनीय आहेत. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    ओव्यांमधून प्रकट होणारे ग्रामीण स्त्री जीवनाचे अथांग मानस सरोवर... ‘मालनगाथा’ द्वारे इंदिरा संत यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांच्या तोंडी असणाऱ्या ओव्यांचे संकलन करून त्यातील आशय आणि शैलीचे सौंदर्य उलगडून दाखवले आहे. ‘मालनगाथा’ चा पहिला भाग १९९८ मध्े प्रसिद्ध झाला. आता दुसरा भाग वाचकांच्या हाती पडतो आहे. तो पहायला इंदिरा संत आज आपल्यात नाहीत; ज्या दुर्गा भागवतांना तो अर्पण करण्यात आला आहे त्याही काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. त्यामुळे या पुस्तकातील गाथा वाचतानाही मन थोडेफार सैरभैर झाल्याशिवाय राहत नाही. इंदिरा संत यांनी या ओव्यांचे संकलन तवंदी या आपल्या गावी कॉलेजच्या दिवसात केले. बेळगाव - कोल्हापूर हमरस्त्यावर तवंदीचा घाट आहे, आणि डोंगरमाथ्यावर तवंदी हे इनामी खेडे आहे. त्याच्या पायथ्याशी एक ब्रम्हदेवाचे देऊळ आहे. जैन धर्मीयांचेही ते एक तीर्थस्थान मानले जाते. तेथे भागाबाई ही कामवाली बाई जात्यावर दळताना ओव्या म्हणत असे; त्या ओव्या इंदिराबाई मोठ्या आवडीने ऐकत आणि पुढे त्या ओव्या लिहून ठेवण्यास त्यांनी आरंभ केला. ‘‘ चांदीच्या ताटामंदी फुल दाशालाचं लाल । त्याच रंगाची चोळी धाड बंधूराया’’ ही ओवी ऐकून चांदीच्या ताम्हनात जास्वंदीचे ताजे फूल त्यांनी खरोखर ठेवून ते दोन्ही बाजूंच्या नंदादीपाच्या समयांच्या प्रकाशात पाहिले; तेव्हा त्या मालनीला केवळ लाल रंगाचा रेशमी खणच हवा होता असे नव्हे तर रेशमी खणाच्या नऊ तुकड्यांची चोळी आपल्या गोऱ्या कायेवर, दंडावर आणि पाठीच्या फाकांवर कशी रसरसून दिसेल याचीही तिला जणू खात्री होती - हेही या ओळीतून स्पष्ट होत होते हे जाणवले. जात्यावरच्या त्या ओव्या लिहून ठेवण्याचा परिपाठ त्यांनी ठेवला. आपल्या बी एडच्या विद्यार्थिनींनाही त्यांनी आपापल्या खेड्यातील बायकांच्या तोंडी असणाऱ्या ओव्या लिहून आणण्यास सांगितले... अशा प्रकारे मिळालेल्या ओव्यांचे पुढे काय करावे याचा विचार सुरू झाला; आणि त्यांचे वर्गीकरण भावबंधाच्या अनुषंगाने करण्याची कल्पना सुचली. आईबद्दलच्या भावबंधांच्या ओव्या वेगळ्या करून त्यातून जाणवणारे आईचे प्रेम, आईचे दु:ख, आईचे मोठेपण वगैरे भावबंध टिपले. नंतर बापाचे कर्तेपण, त्याचे कठोर व कोवळे मन भावबंध प्रकट करणाऱ्या ओव्यांचा वेगळा गट केला. प्रत्येक ओवी हा एक भावाचा आविष्कार; त्या भाववृत्तींच्या कविता करता येतील; प्रत्येक ओवी ही रांगोळीच्या ठिपक्यासारखी स्वयंपूर्ण व ठसठशीत; तर या ओव्यांचे ठिपके मांडून त्यांची रांगोळी चितारता येईल आणि ती अधिकच आशयसंपृक्त होईल - असाही आकृतिबंध समोर आला. त्यातून मालनगाथेची निर्मिती झाली. ‘मालन’च्या अवघ्या आयुष्याची कहाणी या एखादा चित्रपटासारखी मग उभी राहिली. पुस्तकाच्या रूपात या मालनगाथांचा पहिला आविष्कार व्हायला इंदिराबार्इंची सत्तरी उजाडली. मालनगाथाच्या दुसऱ्या भागात एकूण चार भावबंधांचे गाथागंठन आहे. वर्षागान, मालनीrचा साजशृंगार, प्रणय चंद्राच्या कला आणि स्त्रीजन्माचे भोग यावर भर देणाऱ्या एकूण ४७ गाथांचा आणि २०० ओव्यांचा ऐवज सामावलेला आहे. कुंकवाची चीरी कोरायाचा भारी त्रास सोस ग माझ्या सई कंथासाठी सासुरवास भरताराचा राग जसा इस्तव इंगळ सई मालिनी ग सासे तेची मरजी सांभाळ काळी चंद्रकळा नेस, ग रंगासाठी सई, ग मालनी सून सोसावी लेकासाठी भावज गुजरी नीरीनं पीठं लोटी अन्योव सोस सारा आपल्या ग बंधूसाठी सोसून सोसून ग जीव करावा तडीपार लेकी, नको, ग परतून जल्म सासर मरण या गाथेत मालनीने अस्तुरीच्या एकूण आयुष्याचेच सार प्रकट केले आहे असे इंदिराबाई म्हणतात. आपल्या कन्येला तिने पुढे कसे वागावे याचा उपदेश करताना अंतर्मुख होऊन आई स्वत:च्या आयुष्याचाही जणू ताळेबंद मांडते. आपल्या आईचा, आपल्या सखी शेजारणीचा जीवनपटही तिला दिसू लागतो. त्या सर्वांची गोळा बेरीज तिला जी दिसते, ती या गाथेतून उफाळून येते. ‘‘सईबाई, अस्तुरीच्या जल्माला आली आहेस. तुझे आयुष्य सोसण्यासाठी आहे. जे जे वाट्याला येईल ते सोस, सहन कर. पण सोसशील त्यात आर्त नको. मंगल असू दे. ते एक प्रकाशपूजन असू दे. सासुरवास सोसताना सौभाग्यचिन्ह जे कुंकू, त्याची चीर कोरते आहे असे समज. कंथाचा संताप, त्रास सोस पण मी पत्नीधर्माने त्याची मर्जी सांभाळते आहे हे एक प्रकारचे वात्सल्य मनाशी धर. मुलाच्या संसारात तुला जो त्रास, जी हेटाळणी भोगावी लागेल ती चंद्रकळा असे समज. रंगासाठी नेसलेली, पोटच्या पोराच्या मायेखातर नेसलेली. मायबाप गेले की माहेर उरत नाही. पण भावजयीने पायाने तुला बसायला पाट सारला तरी तो अपमान, तो अन्याय भावाची बहीण म्हणून सोस आणि भावासाठी माहेरी एखादी खेप घाल ’’ अशी सहनसिद्धी संपादन करत तडीपार व्हायचे; पुन्हा तो जन्म नको, माहेर नको, सासर नको. भारतीय स्त्रीच्या प्रातिनिधिक भागधेयाचे हे जणू वर्णन आहे. पावसाळ्याबद्दल भारतीय मालनीला विशेष अगत्य आणि आत्मीयता. पावसावर अवघे जीवन अवलंबून. पाऊस वेळेवर आला तर शेते पिकणार. धनधान्य घरात येणार. गुरांना चारापाणी मिळणार. म्हणून त्याला ती साकडे घालते. ‘‘पडपड तू पावसा वाट पाह्यताती सारं’’ या पावसाची वेगवेगळी रूपेही ती न्याहाळते. ‘‘पानी वरून पडतं तूर बारावर आली, बागल्या फांद्या खाली..’’अशी शेतातल्या तरारलेल्या पिकांची हालचाल ती टिपते. लक्ष्मीला मग ती मोत्याचं आसन देऊ करते. बारा बलुत्यांचे धान्याचे वाटे वेगळे काढते. गुऱ्हाळ घराला भेट देऊन भावाच्या समृद्धीवर सुखावते. गोठ्यातल्या धनसंपदेचे गुणगान करते. ‘‘चाल चाल शिंगी बाई’’ म्हणून ती आपल्या घोडीशी गूज करते. या मालनीच्या साजशृंगाराचाही नखरा काही न्याराच आहे. केशसंभाराचे त्यात कौतुक अमापच! बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी, कुंकू यांच्या नाना तऱ्हा! आणि साडी चोळीचेही किती प्रकार! त्यात पुन्हा काळ्या चंद्रकळेचा थाट काही आगळाच! पैठणीचा मान मोठा . आपल्या प्रणयाच्याही विविध छटा या ग्रामकन्या मोकळेपणाने ओव्यांमध्ये चितारतात. कधी सूचकपणे. कधी उघडपणे. पाणवठ्यावर जाऊ या. गोपीला जसा कृष्ण सखा भेटला तसा कुणी आपल्यालाही भेटेल अशी स्वप्ने ही मालन रंगवते. पान्याला जाऊ गड्या गळी सोनीयाची सरी आवळ झालं भारी पडती, ग भुजीवरी झाला उशीर उशीर वाट सोडा किस्नदेवा..’’ काही ओव्यांमध्ये पितळी पलंग आणि रंग महालांची वर्णने येतात. पितळी पलंग तेच्या भवताली जाळी कोन भाग्याची चाफेकळी ... माडीवर माडी तिचा गिलावा लाल लाल नटका भरताराचा हौशाचा रंगमहाल... गाडे भरताराचं सुख फाटी सांगते अंगनी बाई,ते,आयकून हसं नाजूक चांदनी... पहिल्यांदा गरोदर राहिलेल्या मालनीचे कौतुक तिची सासू करते. ‘‘पयल्यांदा गरोदरपण तिच्या तोंडावर लाली.’’ गरोदरपणाच्या आठ नऊ महिन्यातील अवस्थांचे वर्णन करणारीही एक गाथा यात आहे. पहिल्या तीन ओव्यात डोहाळ्यांचे तर पुढे सरीपूजन, बांगड्या भरणे, वनभोजन, माहेरला पाठवणी, इकडे सासूच्या मनाला लागून राहिलेला घोर यांचे वर्णन आले आहे. लेकीचा जन्म, सासुरवाशीण, स्त्रीसुलभ शिष्टाचार, सासरी होणारी उपासमार (भूक लागली पोटाला, धीर धर भूकबाई, परावं हे घर हितं आपली बया न्हायी), नणंदा-जावा आणि सासरे-दीर यांची बोलणी, कामाचा रगाडा, (कामाच्या कसाल्यात उचलीना मी पापनी, देर गुजराची मला वाघाची जाचती), अहे व मरणाची आकांक्षा - वगैरे भाव या गाथांतून प्रकट होतात; त्या वाचताना जीव गलबलतो. आपल्याला अहेव मरण यावे, तेही सोमवारी यावे, वाजंत्री बोलवून हिरवे लुगडे नेसवून, पतीच्या शेल्याच्या पदरात ओटीचे सामान बांधून आपली अंत्ययात्रा निघावी अशी इच्छा एका गाथेत व्यक्त झालेली आहे. अहेव मरणाची मला ग लयी हौस मागनं येतं गोत पुढं कुंकाचा पाऊस ।। अहेव मरणाचा उजेड पडला सव्वा कोस म्हनी माझा नेनंता, ग नगर पडलं वोस ।। इंदिराबाई या सगळ्या मरणगाथा देऊन भाष्य करतात, ‘‘अशी ही मालनींची अंतकाळीची संवेदने... त्यांच्या सोशिकपणा किती खोल आहे हे दाखवणारी. मरणसोहळा हा कितीही सुखकारक असला तरी तो सरणाच्या ज्वालांतून निर्माण झालेला... आणि त्याची मुळे मालनींच्या जीवनातल्या विविध समस्यांतून रुजून आलेली... या गाथा वाचल्या म्हणजे मृत्यूची टांगती तलवार मालिनींच्या वर सतत लटकत असते असे म्हणण्यापेक्षा जीवन जगणे हेच त्यांचे असिधाराव्रत असते, असे म्हणावेसे वाटते. या असिधाराव्रतातून सुटण्यासाठीच जिवंतपणी त्या मरणाची स्वप्ने बघत असाव्यात.’’ ‘‘अवघ्या स्त्रीजीवनाला स्पर्श करणाऱ्या या ओव्या, न्हाणवलीच्या सुखद सोहळ्यापासून मरण वेळेपर्यंत, शृंगार रसापासून ईश्वराशी जडलेल्या सौहार्दरसापर्यंत, पुत्रजन्मापासून वैधव्याच्या आकान्तापर्यंत जे जे म्हणून स्त्रीला भावले ते ते सर्व आपल्या कवेत लीलया घेतात.’’ या ओव्या म्हणजे अनुभवामृताचे एक अथांग मानस सरोवर असे इंदिरा संत म्हणतात. ते यथार्थच आहे. ‘मालनगाथा’ मधून प्रकट होणारे ग्रामीण स्त्रीचे अंतरंग हे वास्तव तर आहेच; ते जीवनातील सुखदु:खाचा जाणीवपूर्वक स्वीकार करणारेही आहे. या ओव्यांची निर्मिती करणाऱ्या स्त्रीमनाची प्रगल्भता क्षणकालही नजरेआड होऊ शकत नाही. या स्त्रिया साक्षर नसतील; पण त्या अडाणी नक्कीच नव्हत्या; आयुष्याच्या विशाल पाठशाळेत त्यांनी मिळवलेल्या अनुभवाचे भांडार हे आपल्या पुस्तकी कक्षांत सामावणे अवघडच! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more