DAINIK SAMANA 15-04-2018 झुकलेल्या मेणबत्तीची कथा...
समुद्रात उभ्या असलेल्या एका शिडाच्या नौकेवर एक खून होतो. मेंढ्या चारण्यासाठी नि त्यांच्या लोकरीपासून महागडे कपडे बनवण्याचा व्यवसाय असणाऱ्या फ्रेड मिलफिल्ड नावाच्या माणसाचा खून होतो. मिलफिल्ड आणि त्याचा व्यावसायिक साथीदार ॅरी व्हॅन न्युई हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातल्या एका विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेत असतात. कशासाठी? तर मेंढ्या चारण्यासाठी.
फौजदारी कायदा कोळून प्यालेला नामवंत वकील पेरी मेसन याच्याकडे हा खटला येतो. पहिल्या सलामीलाच मेसनच्या लक्षात येते की, मेंढ्या चारणे नि लोकरीचे उत्पादन करणे हे बहाणे आहेत. मग इतकी जमीन खरेदी कशासाठी? तर या भागात तेल मिळाले असावे. एकदा हे नक्की झाल्यावर खुनाचा उद्देश स्पष्ट होतो. पण खून केला कुणी? मेसनला खुनाच्या ठिकाणी जवळपास नव्वद अंश झुकलेली. एक विझलेली मेणबत्ती दिसते. त्या बारीकशा धाग्यावरून, समुद्राच्या भरती-ओहोटीचे, नौकेच्या हेलकाव्यांचे आणि प्रेत इकडून तिकडे गडगडल्यामुळे, खालच्या गालिच्यावर पडलेल्या रक्तांच्या डागांचे अफलातून गणित बांधून काढत मेसन खुन्यापर्यंत पोहोचतो.
अर्ल स्टॅन्ले गार्डनर या जगप्रसिद्ध अमेरिकन डिटेक्टिव्ह कथा लेखकाच्या ‘द केस ऑफ द क्रुकेड कॅण्डल’ या पेरी मेसन कथेचा प्रस्तुत अनुवाद बाळ भागवत यांनी त्याच नावाने मराठीत आणला आहे. सर आर्थर कॉनन डॉयलचा कथानायक जसा शेरलॉक होम्स. अॅगाथा खिस्तीचा कथानायक जसा हरक्यूल पायरो, तसा अर्ल स्टॅन्ले गार्डनरचा हा कथानायक पेरी मेसन, शेरलॉक होम्स आणि हरक्यूल पायरो हे व्यवसायाने डिटेक्टिव्हच आहेत. पेरी मेसन हा कॅलिफोर्नियातला नामवंत वकील आहे. अमेरिकन फौजदारी कायदा त्याने कोळून प्यालेला आहे. पॉल ड्रेक या आपल्या व्यावसायिक डिटेक्टिव्ह मित्राकरवी तो एखाद्या प्रकरणाचा गुप्त तपास करतोच; पण डेला स्ट्रीट या आपल्या चिटणीस तरुणीसोबत तो स्वत:ही गुप्त तपासावर निघत असतो. अवघड प्रकरणात उडी घ्यायची त्याला फार आवड असते. दैव धारिष्टास धार्जिणे. या म्हणीनुसार त्याच्या धाडसाला हमखास यश मिळतेच.
गार्डनर हा स्वत:च नामवंत वकील होता. वकिली पेशातल्या आपल्या अनुभवांवर आधारित कथालेखनाला त्याने १९२३ साली सुरुवात केली. लेस्टर लीथ, केन कॉर्निंग आणि अखेर पेरी मेसन या त्याच्या कथानायकांनी अमेरिकन वाचक वेडा झाला. अमेरिकेच्या ‘बेस्ट सेलिंग ऑथर्स लिस्ट’मध्ये गार्डनर वर्षांनुवर्षे जणू मुक्काम ठोकून होता. गार्डनर १९७० साली वारला. प्रस्तुत कथा मुळात १९४४ सालीची आहे, पण संगणकाच्या वेगवान काळातली ती वाचनीय, पकडून ठेवणारी आहे. हे गार्डनरच्या कथाबांधणीचे वैशिष्ट्य.
-मल्हार गोखले ...Read more
DAINIK SAMANA 15-04-2018 विज्ञानाशी करूया दोस्ती...
विज्ञान विश्वात सतत रंजक प्रयोग केले जात असतात. त्यांचा शैक्षणिक जीवनावर अधिक प्रभाव पडतो. अवघड विषयांच्या धास्तीने विद्यार्थी अभ्यासात मागे पडू नयेत म्हणून विज्ञानविषयक अभ्यासक्रमबाह्य पुस्तके मुलांनी वाचावीत म्हणून ‘विज्ानातील गमती जमती’ हे पुस्तक डी.एस. इटोकर यांनी लिहिले आहे.
बाटलीतील कारंजे, परावर्तनाची गंमत, चुंबकीय खेळाडू, थर्मामीटरचे तत्त्व, गरम आणि थंड पाणी, गरगर फिरणारी बाटली या शीषकांवरूनच प्रस्तुत पुस्तकातील प्रयोगांचा अंदाज येतो. विज्ञानासारखा कठीण विषय या प्रयोगाद्वारे रंजक पद्धतीने समजतो. शास्त्रीय तत्त्वाने घडणाऱ्या घटनांची योग्य माहिती कळते. या मुलांमध्ये असलेले दडपण कमी करून त्यांना विज्ञान विषय सोपा वाटावा यासाठी प्रयत्न करणारे असेच हे पुस्तक म्हणावे लागेल.
यातील सर्व प्रयोग साधे, सोपे आणि स्वस्त आहेत. या माध्यमातून विज्ञान विषयाबाबत गोडी वाढू शकते. स्वनिर्मितीचा आनंद वेगळा असतो. शिवाय विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढीसाठी उपयुक्त आहे. इतरांना हे प्रयोग जादूचे वाटतील इतके मजेदार आहे. फावल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आणि ‘नेट’ प्रॅक्टिस टाळण्यासाठी विज्ञानाशी दोस्ती करणे केव्हाही उत्तम. टीव्हीसमोर तासनतास ‘पोगो’ बघण्यापेक्षा अशी ही शैक्षणीक करमणूक केव्हाही चांगली असते, असे मुलांचे मानसतज्ज्ञ सांगतात.
खेळणी, वाचनातून विज्ञान, छंदातून विज्ञान अशा मालिकेतील हे एक पुस्तक सप्रेम भेट देण्यासारखे! ...Read more